फुलात न्हाली पहाट ओली

- शेषराव मोहिते
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

खेड्यातील एखादा मुलगा पहिल्यांदा गाव सोडून शिक्षणासाठी शहरात जातो, तेव्हा तेथील वसतिगृहातून त्याने घरी पाठविलेलं पहिलं पत्र तुम्ही कधी वाचलंय? ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल; शक्‍यतो त्यात लिहिलेलं असतं, ‘मला गाव सोडून इथं आल्यापासून थोडंसुद्धा करमत नाही. मला आजीची आठवण येत नाही, आजोबांची आठवण येत नाही. आई-बाबांची तर येतच नाही; पण मी इकडे येतानाच नुकतीच आपली गाय व्याली होती; तिच्या वासराची खूप आठवण येते.’

खेड्यातील एखादा मुलगा पहिल्यांदा गाव सोडून शिक्षणासाठी शहरात जातो, तेव्हा तेथील वसतिगृहातून त्याने घरी पाठविलेलं पहिलं पत्र तुम्ही कधी वाचलंय? ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल; शक्‍यतो त्यात लिहिलेलं असतं, ‘मला गाव सोडून इथं आल्यापासून थोडंसुद्धा करमत नाही. मला आजीची आठवण येत नाही, आजोबांची आठवण येत नाही. आई-बाबांची तर येतच नाही; पण मी इकडे येतानाच नुकतीच आपली गाय व्याली होती; तिच्या वासराची खूप आठवण येते.’

शाळेला दिवाळीची सुटी असली, की भल्या पहाटे उठून खिल्लाऱ्या या खोंडाला घेऊन चिकणीच्या शेताच्या बांधावर चारायला घेऊन जाणं हा माझा आवडता उद्योग. गड्यानं बैलं सोडायच्या आधी मी त्याला घेऊन जात असे. हा काळ्या रंगाचा खोंड, अधूनमधून मानेजवळ आणि कपाळावर पांढरे शुभ्र ठिपके असलेला. अत्यंत गुणी. आदल्या दिवशी संध्याकाळी शाळेतून गावाकडे येतानाच पोरांच्या घोळक्‍यात असतानाही मनात सारखं उद्याच्या पहाटेचं चित्र डोळ्यांपुढे तरंगत राहायचं. पावसाळ्यातलं पाणी अजून आरणीच्या पोटाला थांबलेलं, बांधावर राखून ठेवलेलं हिरवंगार गवत. दवात भिजलेलं. पिवळी ज्वारी, तूर अन्‌ बांधावरल्या गवताचा एक मस्त गावरान सुगंध आसमंतात भरून गेलेला. निरव शांततेत हातात खोंडाचा कासरा धरून दगडावर बसल्यावर त्याचं कोवळ्या दातांनी कोवळं गवत खातानाचा चुर्रऽऽ चुर्रऽऽ आवाज तेवढा कानावर यायचा. मग हळूहळू उजाडत जाईल, तसं कोवळ्या उन्हात चमकणारे दवबिंदू, रंगीबेरंगी गवतफुलं. नुकतीच जागी होऊन आकाशात घिरट्या घालणारी पाखरं. शरीराला आणि मनाला तेव्हा जे वळण लागलं, ते आजवर कायम राहिलं.

दररोजचा दिवस मावळतच असतो आणि दुसरा दिवस उगवतच असतो. मध्येच काही कसोटी पाहणारेही दिवस येतच असतात, जेव्हा आपले स्वत्व पणाला लागायची वेळ येते. पण आलेले दिवस काही घर बांधून राहत नाहीत, या भरोशावर आपण त्याही दिवसांवर मात करतो. या दिवस-रात्रीच्या रहाटगाड्यात फिरत राहणारे आपले जगणे एका पहाटेने कसे उत्सवात बदलून जाते ! काही कटू घटना, प्रसंगाने मनावर दाटलेले मळभ पहाटेच्या दवबिंदूत कसे विरघळून जाते ! पहाटेच्या वेळी रस्त्याकडेच्या शेतात ध्यानस्थ कुणी बसले आहे, हे बघणेदेखील किती आनंददायक असते !पहाटे उठून गावाबाहेर फिरायला जावे, रोजच्या धावपळीत गर्क असलेले अख्खे गाव त्या वेळी रस्त्यावर उतरलेले असावे, याचा अनुभव सध्या ज्या गावात राहतो त्या लातूरमध्ये तर मी रोजच घेतो. कधी तरी पहाटे फिरायला निघावे अन्‌ आकाशात चंद्र अजून डोईवरच असावा, असेही अनेकदा घडते, तेव्हा तेव्हा ना. धों. महानोरांच्या कवितेच्या ओळी हटकून आठवतात.
फुलात न्हाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलावर ओघळले.

Web Title: editorial artical sheshrao mohite