शृंखला की मेखला?

शृंखला की मेखला?

तीन कविता एकाच वेळी मनात रुंजी घालत असतात, तेव्हा त्या झुंबर होऊन विविधरंगी प्रकाशही आपल्या मनात फाकत असतात. त्या गुणगुणण्यातही मोठा आनंद असतो. बाबा आमटेंची कविता अत्यंत प्रेरणादायी आहे. ‘मधुर’ चालीचे त्यातील एक कडवे असे.
शृंखला पायी असू दे
मी गतीचे गीत गाईन
दुःख उधळायास आता 
आसवांना वेळ नाही.

जीवनाचे सर्व रस्ते मृदूमुलायम नसताना, खडबडीतपणा असला, तरच खरे आपण नीटपणे चालू शकतो. म्हणून खाचखळगे आणि अडीअडचणींनादेखील खूप महत्त्व आहे. परंतु त्याच बाऊ न करता अत्यंत धीराने आणि हसतमुखाने सामोरे जाण्याचे बळ असण्याची वा एकवटण्याची आवश्‍यकता असते. मग तो दुःख संकटांना म्हणेल, ‘या संकटांनो या’ आणि बाबा आमटेंच्या सुरात सूर मिसळून ती व्यक्ती उपयुक्त गाणे गात आपली मार्गक्रमणा करेल. 

त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ ‘बालकवी’ म्हणतात, जीव पाहतो वरवर जाया चैतन्यापाठी हाय सुटेना दृढ देहाची परि बसली गाठी.

येथे लौकिक आणि पारलौकिक जीवनातील संघर्ष दाखवलेला आहे. आपल्या मनाला, आत्म्याला चैतन्याची ओढ लागलेली असते. परंतु नाशवंत जगाच्या, देहाच्या मोहात गुंतून गेल्याने वा अडकून पडल्याने पारलौकिक जीवनापर्यंत आपली झेप जात नाही. 

पारलौकिक जीवनाच्याही पलीकडे गेलेला आवाज कविवर्य कुसुमाग्रजांना ऐकू आला. त्यामुळेच स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणाऱ्यांच्या हाता-पायतील बेड्या खळखळा तुटल्याचा आवाज त्यांना अत्यंत मधुर अन्‌ श्रवणीय वाटतो.

सामाजिक-पारमार्थिक अन्‌ राजकीय अर्थांनी परिप्लुत अशा या कविता आहेत. आशय आणि आविष्काराच्या दृष्टीने या कविता वेगळ्या असल्या, तरी सरतेशेवटी त्या आपल्याला एकाच ध्येयाकडे, एकाच मुक्तीकडे घेऊन जातात. आपल्याला गतीचे... प्रगतीचे... सतत चालत राहण्याचे... अन्‌ सतत परिवर्तनशील राहण्याचे गीत गायचे असेल, पारलौकिक मार्गातील मद-मोह-मत्सर-माया यांचे अडसर दूर करायचे असतील... अन्‌ मुक्तीच्या, मोकळेपणाच्या मार्गावर चालायचे असेल, तर या सर्व प्रकारच्या शृंखलांची मेखला तयार करून कवचकुंडलांसारखी आपल्या भोवती लपेटावी लागेल... सर्व प्रकारचा स्वार्थ स्वाहा करून आपल्याला व्यापक पातळीवरील ध्येयाकडे मार्गक्रमणा करावी लागेल. 

अशा प्रकारच्या प्रेरणादायी कविता एकाच वेळी आपल्या तनामनातल्या शृंखला झटकण्यास आणि उन्मत होण्यास मदत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com