दिव्यत्वाची प्रचिती (परिमळ)

विश्‍वास सहस्रबुद्धे
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती... पण दिव्यत्व आधी का प्रचिती आधी? दिव्यत्व हे त्या गोष्टीमध्ये असते का आपल्या प्रचितिमध्ये? शेक्‍सपिअर म्हणतो, ‘ब्यूटी लाइज इन द आईज ऑफ बीहोल्डर’. सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये सामावलेले असते. एखाद्याला एखादी गोष्ट सुंदर भासेल, पण दुसऱ्याला ती तशी भासेलच असे नाही. काय विलक्षण प्रमेय आहे, नव्हे का? गोरा रंग, सरळ नासिका, निळे डोळे, रेशमाच्या लडीसारखे केस, अटकर बांधा... या उलट काळा कुळकुळीत रंग, चपटे नाक, लोकरीसारखा जाडाभरडा केशसंभार, थोराड देहयष्टी... कशाला सुंदर मानावे? या प्रश्नाला उत्तर एकच. प्रचिती. त्याला नियम नाहीत, निकष नाहीत. मनाचा कौल.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती... पण दिव्यत्व आधी का प्रचिती आधी? दिव्यत्व हे त्या गोष्टीमध्ये असते का आपल्या प्रचितिमध्ये? शेक्‍सपिअर म्हणतो, ‘ब्यूटी लाइज इन द आईज ऑफ बीहोल्डर’. सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये सामावलेले असते. एखाद्याला एखादी गोष्ट सुंदर भासेल, पण दुसऱ्याला ती तशी भासेलच असे नाही. काय विलक्षण प्रमेय आहे, नव्हे का? गोरा रंग, सरळ नासिका, निळे डोळे, रेशमाच्या लडीसारखे केस, अटकर बांधा... या उलट काळा कुळकुळीत रंग, चपटे नाक, लोकरीसारखा जाडाभरडा केशसंभार, थोराड देहयष्टी... कशाला सुंदर मानावे? या प्रश्नाला उत्तर एकच. प्रचिती. त्याला नियम नाहीत, निकष नाहीत. मनाचा कौल. बस्स! एवढा एकच निकष. अमुक एका गोष्टीला दिव्य मानावे, असे संस्कार आपल्या मनावर होत असतात; पण त्या संस्कारांना प्रचिती झुगारून देते. संस्कार म्हणजे आपल्या आदिम प्रेरणांवर चढवलेले लेप. ते वितळायला बस्स, दिव्यत्वाची प्रचिती पुरेशी असते. महाभारतामध्ये भीष्म आणि अंबेची कथा सांगितलेली आहे. अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन बहिणींचे स्वयंवर आयोजिलेले असते. ऊर्ध्वरेत ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केलेला भीष्म आपल्या विचित्रवीर्य या भावासाठी तीनही राजकन्यांचे हरण करतो. या प्रसंगी झालेल्या युद्धात अंबेच्या प्रियकराचा- शाल्वाचा भीष्म पराभव करतो. अंबिका आणि अंबालिका विचित्रवीर्याशी विवाह करण्यास संमती देतात; पण अंबा भीष्माला विनंती करते की त्याने तिला शाल्वाकडे जाऊ द्यावे. भीष्मही उदार अंतःकरणाने अंबेला शाल्वाकडे जाण्याची अनुमती देतो; पण भीष्माबरोबरच्या युद्धात पराजित झालेला शाल्व अंबेचा स्वीकार करण्यास नकार देतो. पुरुषी अहंकार, दुसरे काय? भीष्माच्या पराक्रमाने दिपलेली अंबा भीष्माला आपला स्वीकार करण्यासाठी विनंती करते. भीष्म आपल्या ब्रह्मचर्यपालनाच्या प्रतिज्ञेला स्मरून अंबेच्या विनंतीचा अव्हेर करतो. पुनश्‍च एकदा, पुरुषी अहंकार! पण अंबा त्याला सवाल करते की भीष्मा, तुला रूपवती अंबेचा मोह पडला नाही? त्यावर भीष्म अंबेला प्रांजळपणे उत्तर देतो, ‘अंबे, दिव्यत्वावर प्रेम करणे हा जर मानवी धर्म असेल, तर तेजस्विनी अंबेला पाहून भीष्माच्या हृदयात प्रीतीची उदात्त भावना उचंबळून आली यात नवल ते काय? भीष्मही माणूसच आहे, पाषाणात घडवलेली मूर्ती नव्हे. पण भीष्म आपल्या प्रतिज्ञेचा बांधील आहे.’
प्रचितीचा अव्हेर केल्याने एक श्रेष्ठ प्रेमकहाणी मुळातच खुडली गेली. हा अव्हेर शाल्वाने केला का भीष्माने? शाल्वावर प्रेम करणारी अंबा भीष्माच्या पराक्रमावर अनुरक्त झालीच कशी? भीष्माने नकार देताच अंबेच्या अनुरक्तीचे रूपांतर सर्वनाशक द्वेषात व्हावे आणि तिने शिखंडीच्या रूपात भीष्माच्या मृत्यूला कारण व्हावे? या सर्व घटनाक्रमांत दिव्यत्वाची आणि प्रचितीची सांगड कशी घालायची? कधी दिव्यत्वाची प्रचिती आलीच, तर कर जुळतील कसे?