आनंदाचा परीघ

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 11 मे 2017

आपण दुःखी का? - तर आनंदाच्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूभोवतीचा परीघ आपण विस्तारत नाही म्हणून! परीघाचा विस्तार म्हणजे आपल्याकडं जे चांगलं आहे, ते दुसऱ्यांपर्यंत पोचविण्याची आनंददायक कृती

संत एकनाथ महाराज आन्हिकं संपवून नदीकाठी वाळूवर ठेवलेल्या आपल्या पडशीजवळ येत होते. माध्यान्ह भोजनासाठी त्यांनी बरोबर आणलेली भाकरी तोंडात घेऊन पळणारं एक श्वान तेवढ्यात त्यांना दिसलं. एकनाथांनी काय करावं? - तुपाची वाटी हातात घेऊन श्वानामागं तेही धावू लागले. ते विनंती करीत होते ः कोरडी का खाता रोटी, मागे परता जगजेठी! तुपाविना नुसती भाकरी खाऊन पोट दुखू नये, म्हणून एकनाथ श्वानाला तुपाची वाटी देऊ इच्छित होते. त्यांच्या लेखी ते श्वान नव्हते; तर ते साक्षात जगजेठी म्हणजे परमेश्वर होते. केवढी ही भूतदया!
एकनाथांच्या या कृतीमध्ये आपापल्या सद्‌गुणांचा, सद्विचारांचा परीघ विस्तारण्याचा मोठा बोध आहे. श्वानामागं जाऊन एकनाथ आपल्या कारुण्याचं वर्तुळ मोठं करीत होते. म्हटलं तर कृती छोटी; पण उच्च मानवी मूल्याची उदात्तता त्यात भरलेली आहे.

सर्कशीत कसरतीचे खेळ सुरू असतात. श्वास रोखून, उत्सुक नजरांनी आणि विस्मयचकित होऊन प्रेक्षक ते पाहत असतात. कसरतपटू पुढल्या प्रत्येक टप्प्याला अधिकाधिक कठीण कसरती सादर करून टाळ्यांचं कौतुकधन मिळवितात. तेव्हा ते आपल्या कौशल्याच्या वर्तुळाचा परीघ अधिकाधिक रुंदावत असतात.

अलीकडचं एक संशोधन सांगतं ः प्रत्येक प्राणिमात्राभोवती एक प्रकाशवलय असतं. त्याचं मोजमापही करता येतं. हे तेजोवलय आपल्याला सहजपणानं दिसत नाही; पण तेजोवलयाचं किंवा आपल्या विचार-कृती यांतून निर्माण होणाऱ्या कंपनांचं वर्तुळ मात्र आपल्याला जाणवू शकतं. याखेरीजही इतर किती तरी वर्तुळांचे केंद्रबिंदू आपल्याजवळ असतात; पण ते लपलेले असतात. आपण दुःखी का? - तर आनंदाच्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूभोवतीचा परीघ आपण विस्तारत नाही म्हणून! परीघाचा विस्तार म्हणजे आपल्याकडं जे चांगलं आहे, ते दुसऱ्यांपर्यंत पोचविण्याची आनंददायक कृती. ग्राहकाला अपेक्षेपेक्षा किंचित अधिक देणं. मालाचं वजन करून घेताना वजनाचा आकडा वाढीकडं झुकता ठेवणारा विक्रेता आपल्या मनात नकळत घर करून राहतो.

अध्ययनानं आपल्या ज्ञानाचं वर्तुळ विस्तारित करता येतं. अध्यापनानं गुरुऋणातून काही अंशी मुक्त होण्याच्या ऋजूभावाचं वर्तुळ वाढविता येतं. सरावानं एखाद्या कलेत प्रगती करून, तो परीघही मोठा करता येतो. आपल्या दातृत्वाचं, सेवावृत्तीचं, संयमाचं, विनम्रतेचं, सभ्यतेचं, आनंदाचं, समाधानाचं, सुखाचं, निरामय शांतीचं, श्रमांचं वर्तुळ आपण सहज मोठं करू शकतो. माणूस म्हणून आपलं ते एक लक्षण व्हायला हवं. वर्तुळाचा केंद्रबिंदू एकच असतो. त्याच्याभोवती परीघरेषा रेखाटणाऱ्या पेन्सिलीचं केंद्रबिंदूपासूनचं अंतर वाढविलं, की परीघ मोठा होत जातो.

आनंदाचा परीघ विस्तृत करण्यापासून आपण ही सुरवात नक्कीच करू शकू.
काय वाटतं तुम्हाला?

Web Title: editorial article

टॅग्स