कशासाठी? सुखासाठी! (पहाटपावलं)

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 19 मे 2017

समाजशीलता आणि स्वार्थीपणा या दोन्ही प्रवृत्ती माणसामध्ये एकाच वेळी जोमदारपणे कार्यरत असतात. बुद्धिच्या वापराने मिळवलेले ज्ञान या प्रवृत्तींना वेगळे वळण देत असते. या सगळ्यांमधून नीतिनियम ठरत असतात

चांगल्या जीवनाची आस सगळ्यांनाच असते, पण चांगले जीवन कशाला म्हणावे याबद्दल मतभेद असतात. व्यक्तीची परिस्थिती, कौटुंबिक - सामाजिक - सांस्कृतिक वातावरण, स्वभावधर्म यांवरही चांगल्या जीवनाची त्या व्यक्तीपुरती व्याख्या ठरते. कितीही फरक असले तरी सगळ्यांच्या कल्पनेतल्या चांगल्या जीवनाचे काही घटक समान असतात. सुबत्ता, आरोग्य, दीर्घायुष्य, प्रेम या गोष्टी सगळ्यांनाच हव्या असतात हे सारे (आणि अधिक किती काय-काय) आपल्याला का हवे असते? कशासाठी? या प्रश्‍नांचे सर्वमान्य उत्तर ""सुखासाठी,'' "सुखी होण्यासाठी'' असे आहे. ही सर्व सुखी होण्याची साधने आहेत. सुख हे साध्य आहे, ध्येय आहे. ज्या कशाला आपण जीवनात काही मोल आहे असे मानतो, ते बहुतेकवेळा या ना त्या प्रकारे ते आपल्याला सुखी करते म्हणून. सुख हे असे मूल्य आहे, की ते कशाचेच साधन नाही म्हणूनच "सुख कशासाठी हवे?' हा प्रश्‍न निरर्थक ठरतो.

सुखाची व्याख्याही व्यक्तीनुसार बदलत असते, हे खरेच. जेव्हा अनेक व्यक्तींच्या सुखाच्या कल्पनांमध्ये खूप फरक असतो. विसंगती असतात किंवा विरोध असतात, तेव्हा समस्या निर्माण होतात. या समस्या कमीत कमी निर्माण व्हाव्यात आणि ज्या अपरिहार्य असतील त्या सगळ्यांना मान्य होईल अशा पद्धतीने सोडवता याव्यात, म्हणून नीतिनियमांची चौकट उभी केली जाते. समूहात राहणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये काही एका प्रकारचे कायदे-कानून लागू असतात, त्याला माणूसही अपवाद नाही. समाजशीलता आणि स्वार्थीपणा या दोन्ही प्रवृत्ती माणसामध्ये एकाच वेळी जोमदारपणे कार्यरत असतात. बुद्धिच्या वापराने मिळवलेले ज्ञान या प्रवृत्तींना वेगळे वळण देत असते. या सगळ्यांमधून नीतिनियम ठरत असतात.

नीतिनियमांचे कार्य मनुष्याच्या वागण्याचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे, हे असते. कुठल्याही समाजाच्या केवळ प्रगतीसाठीच नव्हे, तर अस्तित्वासाठीही असे नियंत्रण गरजेचे असते. संकुचित दृष्टीने पाहिले तर असे नियंत्रण व्यक्तीसाठी जाचक, क्वचित अनावश्‍यक वाटू शकते. व्यक्तीला हवे ते सुख मिळवण्यात असे नियम, अडथळे आणतात असे मत होऊ शकते. काही विशिष्ट नियमांबाबत हे खरेही असू शकते. मात्र सर्वसाधारण नीतिनियमांची गरजच काय, या प्रश्‍नाचे उत्तर ते व्यक्तीच्या सुखासाठी, चांगल्या जीवनासाठी आवश्‍यक आहेत हेच आहे. व्यक्ती आणि समाज यांचे नाते एका अर्थी जैविक आहे, म्हणजे शरीराचा एखादा विशिष्ट अवयव किंवा एखादी पेशी आणि संपूर्ण शरीर यांमधील नात्यासारखे शरीराचे आरोग्य प्रत्येक घटकाच्या आरोग्यावर अवलंबून असते. तसेच रोगी शरीराचे घटक निरोगी राहू शकत नाहीत. म्हणजेच शरीर आणि त्याचे अवयव यांचे आरोग्य एकमेकांवर अवलंबून असते. व्यक्ती आणि समाज यांचे सुख, प्रगती, विकास हेही याचप्रमाणे एकमेकांवर अवलंबून असतात. व्यक्तीचे अस्तित्व पूर्ण अर्थाने समाजावर अवलंबून नसले तरी त्याचे मनुष्यत्व पूर्णपणे आकाराला येणे समाजातच शक्‍य असते. म्हणूनच जंगलबुकमधला मोगली अखेर माणसांच्या जगात रहायला येतो.

Web Title: editorial article