ज्याची-त्याची सोईस्कर शांतता!

ज्याची-त्याची सोईस्कर शांतता!

दहशतवाद हे जागतिक संकट आहे. त्याचा परिणामकारक मुकाबला का होत नाही, याकडे भारत लक्ष वेधतो आहे. आजच्या घडीला गरज आहे ती संकुचित राजकारणापलीकडे जाण्याची. 

जागतिक शांतता आणि स्थैर्याला तडे जाणाऱ्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झालेली असताना साहजिकच संयुक्त राष्ट्रसंघाकडे अपेक्षेने पाहिले जाते. या  संघटनेचे एक प्रमुख उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता आणि सुरक्षा हे आहे. सध्या पश्‍चिम आशिया धुमसतो आहे. इराक व सीरियात ‘इसिस’ची पीछेहाट झाली असली, तरी तेथे स्थैर्य दृष्टिपथातही नाही. या भागातून निर्वासितांचे लोंढे युरोपात जात आहेत आणि तेथेही नवे तणाव जाणवत आहेत. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा क्षेपणास्त्र चाचण्या करीत सुटला आहे.

महासत्तेला धमकावण्यापर्यंत निर्ढावला आहे. इराणही अण्वस्त्र कार्यक्रम पुढे नेण्यास अधीर झालेला दिसतो. चीनचे वर्चस्ववादी धोरण आशियातील सत्ता समतोल बिघडवते आहे. राष्ट्राराष्ट्रांतील विविध प्रकारच्या तंट्यांमध्ये राष्ट्र-राज्यविहीन अशा दहशतवादाच्या संकटाची भर पडली आहे. दुर्दैवाने ही भडकती आग विझविण्याच्या दृष्टीने कोणतेही ठोस वा व्यापक प्रयत्न दिसत नाहीत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील घणाघाती भाषणाला या परिस्थितीचा संदर्भ आहे आणि त्यांनी केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर बड्या देशांनाही काही कटू मात्रेचे वळसे दिले आहेत. त्या मुद्द्यांची खरे तर गांभीर्याने दखल घेतली जाण्याची गरज आहे. 

जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री या नात्याने आपली छाप पाडतात, हे पुन्हा एकदा दिसून आले. त्यांच्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांचे आमसभेत भाषण झाले. त्यांच्या पूर्वसुरींनी या व्यासपीठावरून केलेल्या भाषणापेक्षा वेगळे त्यात काही नव्हते. त्यांनी काश्‍मीर प्रश्‍नाची टेप वाजविली आणि तशी ती वाजविताना पाकिस्तान हा जणू काही मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी झगडणारा देश आहे, असा आव आणला. त्यांच्या भाषणात होती ती पाकिस्तानला सोईस्कर अशी तथ्ये. भारतीय लष्कर काश्‍मीर खोऱ्यातील चळवळ दडपून टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचा परामर्श सुषमा स्वराज यांनी घेणे ओघानेच आले. हे करताना त्यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या दांभिकतेवर हल्ला तर चढविलाच; पण ‘दहशतवादाचा निर्यातदार देश’ ही पाकिस्तानची ओळखच बनली आहे, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. ‘‘आम्ही आयआयटी, आयआयएम उभारतो आहोत, तर पाकिस्तान जेईएम, एलईटी. त्या देशाकडून पोसल्या गेलेल्या दहशतवादी टोळ्यांकडून निरपराध व्यक्तींच्या हत्या केल्या जात आहेत.

एकीकडे ‘जगा, जगू द्या आणि विकास साधा’, हा विचार; तर दुसरीकडे शस्त्रे हातात घ्या आणि माणसे मारा, हा विकार! हा फरक सुषमा स्वराज यांनी दाखवून दिला. त्याचा रोख अर्थातच पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या  उत्तरदायित्वाकडे होता आणि पाकिस्तानी जनतेला त्यांच्या खऱ्या हक्कांची जाणीव करून देणे हाही त्यामागचा हेतू होता. परंतु भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर हा भाषणातील एकच भाग होता. त्यांनी दहशतवाद निर्मूलनाचा निर्धार नुसत्या कागदी भेंडोळ्यांमध्ये अडकलेला आहे, यावर बोट ठेवले आणि महासत्तांच्या संकुचित धोरणाची जी चिरफाड केली, ती जास्त महत्त्वाची.

दहशतवादी कृत्ये आणि त्यामागचा विखार हा केवळ भारताला भेडसावणारा प्रश्‍न नाही. उदाहरणार्थ, पाकिस्तानात आश्रय मिळालेल्या दहशतवादी संघटना भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि खुद्द त्या देशातही धुमाकूळ घालत आहेतच, पण जगाच्या इतर भागांतही त्यांच्या कारवाया सुरू आहेत. या प्रश्‍नाकडे जर अमेरिका आणि रशियासारखे बडे देश त्यांच्यातील शह-काटशहाच्या राजकारणाच्या दृष्टीने पाहत असतील तर कसला आलाय जागतिक दहशतवादविरोधी लढा? भडकलेल्या आगीत `दाहक’ आणि `कमी दाहक’ असे काही नसते. दहशतवादाच्या संकटाची व्याख्याच जर होत नसेल तर त्याचा मुकाबला कसा करणार? तात्कालिक राजकीय सोई-गैरसोईच्या नजरेतून या प्रश्‍नाकडे पाहिल्यानेच ‘गुड टेररिस्ट’ आणि ‘बॅड टेररिस्ट, ‘गुड तालिबान’, ‘बॅड तालिबान’ अशी भाषा जन्माला आली. जागतिक शांतता आणि सुरक्षा यासाठीच्या प्रयत्नांना समन्वित आणि व्यापक स्वरूप येत नाही, ते या वृत्तीमुळे. मानवी हक्कांविषयी अमेरिकी नेते जगभर प्रवचने झोडत असले, तरी सौदी अरेबियातील मानवाधिकारांचे उल्लंघन ते नेहमीच ‘ऑप्शन’ला टाकतात. कोणाला ‘दहशतवादी’ ठरवायचे, हे अनेक बडे देश आपापले राजकीय हिशेब डोळ्यांसमोर ठेवून ठरविताना दिसताहेत. बदललेल्या जगाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची पुनर्रचना करून ती अधिक सर्वसमावेशक करावी, या अनेक वर्षे होत असलेल्या मागणीची अद्यापही दखल घेतली गेली नाही, त्याचेही कारण या संकुचित हितसंबंधी वृत्तीत दडलेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमसभेत केलेल्या भाषणातही त्याच वृत्तीचे प्रतिबिंब होते. हे चित्र जोवर बदलत नाही, तोपर्यंत शांततेसाठीचे प्रयत्न परिणामकारक ठरणार नाहीत. सुषमा स्वराज यांनी भाषणात बोट ठेवले ते या उणिवेवर. सर्वेपि सुखिनः सन्तु... या प्रार्थनेने त्यांनी  भाषणाचा समारोप केला; परंतु ते स्वप्न साकार होण्यासाठी जगातील धुरीणांचे कथनी आणि करनी यातील अंतर मिटायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com