फडाकडून उत्सवाकडे!

फडाकडून उत्सवाकडे!

बडोद्यात होणार असलेल्या माय मराठीच्या उत्सवात विचारांची नवी घुसळण व्हावी, अशी अपेक्षा आहे. निर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यादृष्टीने पुढाकार घ्यायला हवा.

बडोद्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले. 

त्यांच्यासारख्या माजी सनदी अधिकाऱ्यांनी साहित्याच्या प्रांतात मुलुखगिरी करणे नवीन नाही; परंतु अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सर्व सोपस्कार पार पाडून तो मान मिळविणारे ते एकमेवाद्वितीय असतील. गेल्या काही वर्षांमधील संमेलनाध्यक्षांच्या नावावर नजर टाकली, तर प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने निवडणूक लढविली, असे दिसते. ही पद्धत लोकशाहीचे संकेत आणि मूल्ये यांना पूर्णपणे अनुसरूनच होती, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मुळात सध्याच्या निवडणुकीच्या पद्धतीतच त्या अनिष्टतेची बीजे आहेत, यात शंका नाही. अध्यक्षपदाची निवडणूक केवळ साहित्य क्षेत्रातील योगदानावर व्हायची असेल, तर खरा मतदार ‘संस्थां’च्या तावडीतून सुटणे आवश्‍यक आहे. तसे होत नाही म्हणूनच निवडणुकीतील यशापयश सध्या तरी संस्थांच्या अधिपतींवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. सालाबादाप्रमाणे यंदाही तेच घडले. या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनही देशमुख यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना कथा, कादंबरी, नाट्य, नियतकालिकांचे संपादन या सर्व भूमिकांमधून त्यांनी आपल्या लेखणीची सिद्धता दाखविली होती.

‘सांस्कृतिक’ वळण असलेले अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकीक प्राप्त केला. चित्रनगरीचे ‘व्यवस्थापकीय संचालक’ म्हणून त्यांच्या कामातील आणि साहित्यातील ‘ग्लॅमर’ची ओळख सर्वांना झाली. ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’सारखी अगदी वेगळ्या व समकालीन विषयाला हात घालणारी कादंबरी त्यांनी लिहिली आहे. अलीकडे मराठी साहित्याचा परीघ रुंदावतो आहे आणि त्यात अनेक नवनवे विषय हाताळले जात आहेत. आपापले वेगळे अनुभवविश्‍व साहित्याच्या प्रवाहात आणण्याची असोशी सभोवताली दिसत आहे. अशांना आपला प्रतिनिधी अध्यक्षपदी आल्याचा निश्‍चितच आनंद वाटेल. लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागांमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. बृहन्महाराष्ट्रातील संलग्न संस्थांना भेटी देऊन तेथील मतदारांशी संपर्क साधला. ‘सोशल मीडिया’चा प्रभावी वापर केला. स्पर्धक उमेदवारांवर कुठलीही टीका-टिप्पणी न करता प्रचार केला. दौरे सुरू असताना त्यांनी लिहिलेल्या नाटकांचे प्रयोगही जागोजागी सुरू होते. त्यांनी पद्धतशीररीत्या निवडणुकीचे तंत्र आत्मसात केले आणि त्या तंत्रात आपण सरस आहोत, हेही दाखवून दिले. अर्थात, डॉ. रवींद्र शोभणे, राजन खान, डॉ. किशोर सानप आणि रवींद्र गुर्जर यांनीसुद्धा बऱ्यापैकी याच पद्धतीचा अवलंब केला. पण अध्यक्षपदाची माळ पडली ती देशमुखांच्या गळ्यात.

प्रचाराच्या नावाखाली होणारे वितंडवाद, रंगणारे हेवेदावे आणि पुढाऱ्यांच्या तोडीचे डावपेच ही खरे तर सारस्वतांची मिरास नव्हे. पण कुठलीही निवडणूक येते ती प्रचाराची दृश्‍य-अदृश्‍य अशी सर्व साधने घेऊनच येत असते. मराठी साहित्य त्यास अपवाद का ठरावे? पण हा धुरळा संमेलनाचा मांडव पडेपर्यंतच टिकतो, ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट मानायला हवी. कारण काही बुद्धिजीवींच्या मनात ‘संमेलनांचा उरूस हवा तरी कशाला?’ असा थेट मुळावर घाव घालणाराच सवाल उभा राहात असतो. मराठी भाषेच्या उन्नयनासाठी संमेलनांची गरज नाही, असे मानणारा खूप मोठा रसिकवर्ग अस्तित्वात आहे, आणि मतदान प्रक्रियेपासून दूर असलेल्या या वर्गाला अर्थात आवाजही लाभलेला नाही. वास्तविक क्षेत्र कुठलेही असो, लोकशाही मार्गाने निवडणुका होणे, यात नैतिकदृष्ट्या काहीच चुकीचे मानायचे कारण नाही. परंतु सारस्वतांची निवडणूक आणि कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक यात निदान काही गुणात्मक फरक असावा, ही मागणी काही फार अवाजवी आहे, असे म्हणता येणार नाही. 

आता निवडणुकीचे कवित्व बाजूला ठेवून सर्वांनीच विचार करायला हवा तो मराठी भाषक समूहापुढील विविध आव्हानांचा. केवळ तीन दिवसांच्या उत्सवापुरता विचार न करता वर्षभरासाठी काही ठोस कार्यक्रम नव्या अध्यक्षांनी दिला, तर सध्याच्या परिस्थितीत त्याची नितांत गरज आहे. उच्च शिक्षणाच्या, वैचारिक चर्चाविश्‍वाच्या क्षेत्रात मराठीचे स्थान झळाळून उठावे, यासाठी काही दिशादर्शन संमेलनाच्या निमित्ताने अध्यक्षांकडून आणि संमेलनात सहभागी असलेल्या मान्यवरांकडून व्हावे, अशी अपेक्षा आहे. सध्या मराठीच नव्हे तर प्रादेशिक भाषांच्या संदर्भातच एक गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणातील भाषाविषयाच्या महत्त्वालाच ओहोटी लागली आहे की काय, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी काय करता येईल, याविषयी साहित्य संमेलनात विचारमंथन झाले पाहिजे. अध्यक्षांनी त्यादृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. निवडणुकांचा सोपस्कार झाल्यानंतर आता बडोद्यात पडणाऱ्या माय मराठीच्या मांडवाखाली विचारांची नवी घुसळण झाली, आणि साहित्य अधिक प्रवाही झाले तरी हा फडदेखील सुफळ होईल. इतके यश तूर्त रग्गड आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com