आता खरी परीक्षा सुरू!

आता खरी परीक्षा सुरू!

काँग्रेसची अवस्था दयनीय झाली असून  कुणाचा पायपोस कुणाला नाही. अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांना हे चित्र बदलावे लागेल. जोमदार संघटना उभारणे आणि पर्यायी विचार देणे, हीदेखील दोन मुख्य आव्हाने असतील.
 

राहुल गांधी लवकरच काँग्रेसअध्यक्ष होत आहेत. अगदी अलीकडे पर्यंत ते एक अलिप्त-अनुत्सुक-अर्धवेळ-अनिच्छा असलेले नेते म्हणून ओळखले जात होते. अमेरिका दौऱ्याहून परतताच पूर्णपणे बदललेले राहुल गांधी समोर आले. हा बदल सकारात्मक होता. त्यांच्यात आधीच्या तुलनेने अधिक स्थिरता व परिपक्वता आढळून आली. मोठे पद, त्याबरोबर येणारी सत्ता व सामर्थ्य याच्या बरोबरीने मोठी जबाबदारी व्यक्तीवर येत असते. अद्याप त्यांनी त्या पदाची सूत्रे हातीही घेतलेली नसतानाच अधिकाराचा उपयोग करण्याची पाळी येईल, असे त्यांनाही कधी वाटले नसेल. ती वेळ त्यांच्यावर काँग्रेसचे वाचाळ नेते मणिशंकर अय्यर यांनी आणली. येथेही राहुल यांच्यातील बदलाची चुणूक पहायला मिळाली. प्रथम त्यांनी स्वतः अय्यर यांच्या वाह्यात अशा टिप्पणीबद्दल लोकांची, भाजपची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी अय्यर यांना माफी मागायला लावली. त्यानंतरदेखील त्यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय राहूल गांधींनी तडकाफडकी केला. 

कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी सुरु झालेल्या सुनावणीत लोकसभा निवडणुकीनंतर ती व्हावी, असा युक्तिवाद करुन पक्षाला अडचणीत आणले. सिब्बल यांना आता प्रचारासाठी गुजरातमध्ये मज्जाव करण्यात आला आहे. या दोघांनीही राहूल गांधी यांना आतापर्यंत केलेल्या सुरळीत आणि मुद्याधारित व पातळी राखून केलेल्या प्रचाराचे बारा वाजवले. यामुळे भाजपच्या तंबूत आनंदोत्सव होणे स्वाभाविक होते आणि देशाच्या प्रधानसेवकांनी देखील तत्काळ त्याचा राजकीय लाभ घेण्याचे सत्र सुरुही केले. परंतु या सर्व प्रकरणात राहुल गांधी हे अधिक परिपक्व सिध्द झाले. ‘प्रधानसेवक’ यांनी मात्र पातळी सोडल्याचेच चित्र आढळून आले. राहुल गांधी यांची अध्यक्षपदाची परीक्षा अशा रीतीने सुरु झाली आहे! भाजप व भक्तांकडून सातत्याने राहुल, सोनिया गांधी यांच्याविरुद्ध वाटेल ते बोलले गेले. भाजपने व विशेषतः प्रधानसेवकांनी कितीजणांवर कारवाई केली? याचा हिशोबही त्यांनी लावावा. तेवढी नैतिकता असेल तर!

काँग्रेसचे वय १३२ वर्षांचे आहे. अशा या पक्षाचे अध्यक्षपद ४७ वर्षांच्या राहूल गांधी यांच्याकडे आले आहे. पक्षाच्या अत्यंत पडत्या काळात त्यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे. त्यांच्यासमोरची आव्हाने ही प्रचंड आहेत. ते तरुण असल्याने वय व काळ त्यांच्या बाजूने आहे ही जमेची बाब. अनेक राजकीय आणि मुख्यतः प्रादेशिक पक्षांमध्ये नेतृत्वाच्या पातळीवर ‘पिढीबदल’ झालेला आहे. ४५ टक्के लोकसंख्या ‘युवक’ या वर्गात मोडणारी असलेल्या देशातील हे  संक्रमण आहे. सर्वच उत्कंठित आहेत.

राहुल गांधी यांना दोन प्रमुख आव्हाने आहेत. नरेंद्र मोदी यांचे आक्रमक व वलयांकित नेतृत्व आणि रा.स्व.संघाची ताकद लाभलेली भाजपची बळकट संघटना ! या दोन्ही पातळ्यांवर तोडीस तोड असे स्वतःचे नेतृत्व शाबित करणे आणि काँग्रेसची वर्तमान ढिसाळ यंत्रणा आमूलाग्र सुधारणे आणि दुरुस्त करणे ही त्यांची अग्रक्रमाची कामे असतील. पक्षाची एकजिनसी संघटना उभारण्याचे महाकठीण काम त्यांना करावे लागेल. हे करताना त्यांना काँग्रेसमधील वर्षानुवर्षांचे मुखंड व प्रस्थ असलेले नेते यांचा मोठा अडथळा असेल. तो दूर करावा लागेल. ते त्यांना किती जमते,यावर त्यांचे यश अवलंबून राहील. 

काँग्रेसची सध्याची अवस्था दयनीय आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. कपिल सिब्बल, अभिषेक सिंघवी, जयराम रमेश यांच्यासारखे ‘छत्रीधारी’ नेते पक्षात आहेत. ही मंडळी पक्षापेक्षा त्यांच्या राजकीय ‘करियर’ला महत्त्व देतात. काँग्रेसची वाट लावण्यात अशा ‘अ-राजकीय’ आणि ‘टेक्‍नोक्रॅट्‌स’ मंडळींचा मोठा वाटा आहे. पक्षाला अडचणीत आणण्यात ते धन्यता मानतात. राहुल यांचे वडील राजीव गांधी यांना अशाच मंडळींनी अडचणीत आणले होते. हा इतिहास लक्षात घेऊन राहुल गांधी यांना त्यांच्या सहकाऱ्यांची, सल्लागारांची काटेकोरपणे निवड करावी लागेल. अनुभवी व्यक्तींना प्राधान्य द्यावे लागेल. तसेच काँग्रेसचे हित सर्वोपरी ठेवणाऱ्यांनाच जवळ करण्यासाठी त्या प्रत्येकाला पारखून तपासूनच घ्यावे लागेल. निवडणुका जिंकण्याचे मशीन म्हणून काँग्रेसला विकसित करण्यास प्राधान्य द्यायचे की एक संपूर्ण राजकीय पक्ष म्हणून काम करायचे, याचा निर्णयही राहूल गांधी यांना करावा लागणार आहे. भाजपने स्वतःचे रूपांतर निवडणूक जिंकण्याचे मशिन म्हणून केले आहे.

अर्थात त्यांना संघाचे सुसंघटित पाठबळ असल्याने ते शक्‍य झाले आहे. सरकार चालविणाऱ्यांना संघटनेची जबाबदारी सांभाळावी लागत नाही.ते काम संघ-शक्ति करीत असते. काँग्रेस आणि राहुल गांधी या आघाडीवर कमी पडतील. कारण तेथे एकाच नेतृत्वाला संघटना आणि जेव्हा कधी येईल तेव्हा सरकारची जबाबदारी अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवावे लागणार आहेत. परंतु जोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर पक्ष विरोधात आहे, त्याचा लाभ घेऊन राहूल गांधी यांना पक्षाची संघटना उभारणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी कदाचित जुनी ब्लॉक, जिल्हा, प्रदेश अशा पातळीवरील संघटनात्मक रचना बदलून ती पूर्णपणे निवडणुकीस अनुकूल करण्याच्या दृष्टीने मतदारसंघांवर आधारित करण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो असे सांगण्यात येते. भाजपने ज्याप्रमाणे बूथ पातळीपर्यंत संघटनेचे जाळे पोहोचविले आहे, त्याच धर्तीवर राहुल गांधी काम करतील, असे समजते.

संघटनात्मक फेररचना आणि बळकटीकरणाबरोबरच राहुल गांधी यांना पक्षाच्या ध्येय-धोरणांबाबत एक निश्‍चित व सुस्पष्ट अशी भूमिका जाहीर करावी लागेल. राहूल गांधी यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासातील त्यांची भाषणे, संवाद यांतून त्यांच्यावर कल्याणकारी शासनाच्या संकल्पनेचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या विचारांचा कल हा समाजातील वंचितांच्या बाजूने असल्याचे जाणवते. त्यामुळे कधीकधी त्याचे विचार एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याऐवजी एखाद्या ‘एनजीओ’ प्रमुखाप्रमाणेही भासतात. परंतु देशात आर्थिक सुधारणांचे युग काँग्रेसने सुरु केले, हे त्यांना विसरता येणार नाही. ज्याप्रमाणे भूमी अधिग्रहण विधेयक शेतकऱ्यांच्या-जमीन मालकांच्या हिताचे करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे त्यांना ते उद्योग-धंद्यांच्या विरोधात नाहीत हेही स्पष्ट करावे लागेल. कारण रोजगारासाठी उद्योग हे अपरिहार्य साधन असते. थोडक्‍यात राहुल गांधी यांना ते भाजपच्या तुलनेत लोकांना कोणता वेगळा कार्यक्रम देऊ इच्छितात याचा एक पर्यायी व स्वीकारार्ह ‘अजेंडा’ सादर करावा लागेल. या सगळ्यातून स्वतःची प्रतिमा बदलावी लागेल.यानंतर राजकारणातील अधिमान्यता स्थापित होण्याबरोबर समविचारी राजकीय पक्षांसाठीही ते एक ‘ध्रुवबिंदू’ होणे फारसे दूर राहणार नाही !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com