रफी, जोहर आणि ‘मुश्‍कील’!

सचिनदेव बर्मन यांच्यासमवेत महंमद रफी.
सचिनदेव बर्मन यांच्यासमवेत महंमद रफी.

निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांचा ‘ए दिल है मुश्‍कील’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट वादाची पाठ सोडायला तयार नाही. या चित्रपटात पाकिस्तानी कलावंताची भूमिका असल्याने त्याविरुद्ध संतप्त जनमत एकवटले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमध्ये केलेल्या हल्ल्यात आपले अनेक जवान आपण गमावून बसलो होतो. ते दु:ख, तो संताप शिगेला पोचलेला होता आणि पर्यायाने पाकिस्तानबद्दल मनामनात चीड निर्माण होणे साहजिकच होते. त्या वादावर पडदा पडतो न पडतो तोच याच चित्रपटामुळे दुसरा वाद सुरू झाला, तो त्याच्या प्रदर्शनानंतर! प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायमचे स्थान मिळविलेले महान पार्श्‍वगायक महंमद रफी यांची टवाळी करणाऱ्या एका संवादामुळे! खरे तर आक्षेपार्ह नाव, संवाद, गीत, धार्मिक उल्लेख, विशिष्ट धर्म-जातींवर टीका, देवदेवतांची टींगल, यामुळे एखाद्या चित्रपटाविरुद्ध लोकांचा रोष निर्माण होण्याच्या घटना हिंदी चित्रपटसृष्टीला नव्या नाहीत. 

‘ए दिल है मुश्‍कील’ मध्ये रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असून, त्याचे दिग्दर्शन करण जोहर यांनी केले आहे. होतकरू गायक अयानला (रणबीर) बरेच लोक सांगतात, की तुझा आवाज महंमद रफी यांच्या आवाजाशी मिळताजुळता आहे. हे तो अलिजेहला (अनुष्का) सांगतो, तेव्हा ती म्हणते, ‘मोहंमद रफी? वो गाते कम, रोते ज्यादा थे.’ महमंद रफी यांच्यासारख्या अलौकिक व असामान्य पार्श्‍वगायकाची ही अशी स्वस्तातली टिंगल अनुष्काने अयानला चिडविण्यासाठी केली आहे, की रफींवर अप्रत्यक्ष टीका आहे, हे करण जोहरच जाणोत. हा संवाद चित्रपटात घातला आहे खरा; पण त्यामुळे चित्रपटाची कथा पुढे सरकत नाही किंवा मागेही येत नाही. मग तो समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय? संवाद लेखक निरंजन अय्यंगार यांना आपण कोणाबद्दल लिहित आहोत ते ठाऊक नव्हते? दिग्दर्शकाने तो संवाद तसाच कसा ठेवला? म्हणजे हे पूर्वनियोजित असावे. रफी असे पार्श्‍वगायक होते, की गायकीतील एकही प्रकार त्यांनी मागे ठेवला नव्हता.

प्रणयगीत, विरहगीत, भजन, गझल, कव्वाली, बालांसाठी गीत, शास्त्रीय गीत, हलके फुलके गीत आदी सर्व प्रकारची गीते त्यांनी लीलया गायिली आहेत. त्यांचे चाहते तर कोटीत आहेतच; पण समकालीन पार्श्‍वगायकांमधेही ते लोकप्रिय, आदरणीय होते. लता मंगेशकर यांनी रफीसाहेबांचा गौरव करताना अभिमानाने सांगितले आहे, की मी सर्वाधिक द्वंद्व गीते त्यांच्याबरोबर गायिली आहेत. एक विचित्र योगायोग असा, की ज्या करण जोहर यांनी हा नसता उपद्‌व्याप केला आहे, त्यांचे वडील म्हणजेच नामवंत चित्रपट निर्माते दिवंगत यश जोहर यांनी पहिलाच चित्रपट निर्माण केला ‘दोस्ताना’. त्यातील ‘मेरे दोस्त किस्सा ये क्‍या हो गया, सुना है के तू बेवफा हो गया’ या रफीसाहेबांच्या गीताने लक्ष वेधून घेतले होते. त्याचप्रमाणे रफींनी किशोरदांच्या साथीत गायिलेल्या ‘बने चाहे दुश्‍मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा‘ या उच्च दर्जाच्या गीताने श्रोत्यांची मने जिंकली होती. मुळात ‘ए दिल है मुश्‍कील’ हे नाव ज्या गीताच्या ओळीवरून पक्के केले, ते गीतही रफी किती श्रेष्ठ होते याची साक्ष देते. ‘ए दिल है मुश्‍कील जीना यहां, जरा हट के जरा बच के ये है बॉम्बे मेरी जान हे गीत गुरुदत्त दिग्दर्शित ‘सीआयडी’ या चित्रपटातील असून, ते रफीसाहेबांनी गीता दत्त यांच्या साथीत गायिले होते. मजरुह सुलतानपुरी यांच्या शब्दांना तालसम्राट ओ. पी. नय्यर यांनी स्वरबद्ध केले होते.

आणखी एक शंका मनात येते ती म्हणजे, हा चित्रपट केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने पाहिला तेव्हा, त्यांना या संवादात आक्षेपार्ह असे काहीच कसे आढळले नाही? एरव्ही बारीकसारीक बाबतीत काटेकोरपणा दाखविणाऱ्या पहलाज निहालानींच्या नजरेतून हा संवाद सुटला कसा? हा संवाद निर्माते-दिग्दर्शकांना चित्रपटातून वगळण्यास सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे पाऊल चित्रपट प्रमाणन मंडळाने लवकरात लवकर उचलावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com