सोंगाड्या! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे गड.
वेळ : तप्त!
काळ : संतप्त!
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद.

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे गड.
वेळ : तप्त!
काळ : संतप्त!
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद.

उधोजीराजे : (झराझरा येरझारा घालत मध्येच थबकून) कोण आहे रे तिकडे?
मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने येऊन मुजरा घालत) आज्ञा असावी म्हाराज!
उधोजीराजे : (हाताची घडी घालून कठोरपणे) राज्याची हालहवाल द्यावयास अजून कोणी कसं आलं नाही?
मिलिंदोजी : (खुलासा करत) कोन रिकामं बसलंय हितं? समदे बिझ्जी हायेत!!..कारभारी नानासाहेब फडनवीसाच्या फडावर जमा झाल्यात! मातुश्रीवर जाऊन उगाच टायमफास करन्यात काय प्वाँइट हाय, असं म्हनत्यात आपलीच सरदारं!!
उधोजीराजे : (संतापून) मग आम्ही काय इथं गड्‌डा झब्बू खेळत बसलो आहो? नॉन्सेन्स! जीभ कलम करून टाकीन!! 
मिलिंदोजी : (दिलासा देत) आता समदा कारभार आपलं कारभारीच बघत्यात, म्हटल्यावर हितं कशापायी कुनी यील!! ‘मुजऱ्यापुरता म्हाराजा’ म्हंत्यात तसंच हाय की!! 
उधोजीराजे : (संतापाने खदखदत) दरवेळी आम्ही आमच्या सरदारांना बोलावणं धाडतो, आणि त्याचवेळी हे कारभारी काहीतरी उद्योग करून ठेवतात!! हा कारभारी इतका शिरजोर होईल, असं वाटलं नव्हतं! (तुच्छतेने) हुं:...म्हणे बुलेट ट्रेन आणू!! हा उधोजी इथं हातात तेग घेऊन उभा असताना बुलेट ट्रेन काय, पंख फुटलेली मुंगीदेखील चालू शकणार नाही या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात! बुलेट ट्रेन काय, समृद्धी मार्ग काय...हॅ:!! अरे, इथं आमचा शेतकरी बांधव उपाशी मरतोय! मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय, ते निस्तरा आधी!! 
मिलिंदोजी : (निर्विकारपणे) ज्यांनी मराठा मूक मोर्चाचा इन्सल्ट केला, त्या सोंगाड्यांनी कशापायी असं बोलावं?
उधोजीराजे : आम्हाला सोंगाड्या म्हणतोस, आम्हाला? थांब, तुला तोफेच्या तोंडीच देतो!! ह्याच्या मुसक्‍या आवळा!!
मिलिंदोजी : (शांतपणे) असं म्या नाही, कमळ पार्टीचं सरदार शेलारमामांनी म्हटलंय, म्हाराज!! 
उधोजीराजे : (तलवारीला हात घालत) शेलारमामा, शेलारमामा, शेलारमामा!! बाकी सारं सहन करता येईल, पण या शेलारमामांची जीभ अंगाची लाही लाही करते!! 
मिलिंदोजी : (आगीत तेल ओतत) ते म्त्यात, मराठा मूक मोर्चाचा अपमान करनारं आम्हास्नी इच्यारतात, घोंगड्याखाली काय? आठवा निवडनुकीत किती जाहालं खाली डोस्कं वर पाय!!
उधोजीराजे : (तळहातावर मूठ आपटत) ही हिंमत?
मिलिंदोजी : (आणखी तेल ओतत) ‘ज्यांच्याकडे कल्पनांचे खड्‌डे हायेत, त्यांनी बुलेट ट्रेनच्या भानगडीत पडू नये’ असं बी म्हंतात त्ये!!
उधोजीराजे : (संतापाचा कडेलोट होत) बस, बस, बस! उंटाच्या पाठीवरली ही शेवटची काडी!! मित्रधर्म म्हणून काय काय सहन करायचं? या क्षणाला आम्ही कारभारी नानासाहेबांनाच डच्चू देत आहो! मंत्रिमंडळ बरखास्त करत आहो!! तांतडीने आमच्या नावे फतवा जारी करा!! युद्धाला सुरवात होत आहे!! कालपर्यंत जे आप्त होते, तेच आमचे शत्रू झाले आहेत!! ते काही नाही, आत्ताच्या आत्ता सर्व सरदारांना बोलावून घ्या!! म्हणावं, असाल तसे या!! मोहीम सुरू जाहाली!! हरहरहर महादेव!!
मिलिंदोजी : (दात कोरत) कुनीही येनार नाही, म्हाराज! 
उधोजीराजे : (त्वेषात) कोणाची माय व्यालीये!! असं कसं कोण येणार नाही?
मिलिंदोजी : (दात कोरणे कंटिन्यू...) मंत्रिमंडळ इस्ताराची बातमी फुटली नव्हं!!
उधोजीराजे : (चमकून) कोणी केला मंत्रिमंडळ विस्तार? आम्हास न विचारता?
मिलिंदोजी : (जीभ काढत) तुम्हास ठाव न्हाई? आईतवारी औरंगाबादेत कारभाऱ्यांनी नवरात्रीनंतर आर्जंटमध्ये मंत्रिमंडळाचा इस्तार करनार, असं सांगिटलं की!...आता कोन कशापायी येतंय हितं? तुमी बसा आराम करत!!
उधोजीराजे : (कपाळावर हात मारून मटकन बसत) अरे, अरे!! कसे होणार या महाराष्ट्राचे?
मिलिंदोजी : (सावधपणे) म्हाराज...वाईच च्या पाठवू?