आंदोलन! (ढिंग टांग)

आंदोलन! (ढिंग टांग)

सांप्रतकाळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात (पक्षी - मुंबईत) पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात आंदोलनाचा भडका उडाला असून, त्यातील एक मशाल आमच्या हाती आहे, हे आम्ही येथे उघडपणे जाहीर करीत आहो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव गडगडत असताना आमच्या भारत देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या रेटने कहर केला आहे. हे सरासर निषेधार्ह असून, त्याचा आम्ही धिक्‍कार करीत आहो. वास्तविक कालपरवापर्यंत आम्ही ‘अच्छे दिन आनेवाले है’ साइडला होतो. पण ‘कोई लौटा दे मेरे पिछले बुरे दिन...’ ही आमच्या नेत्याची करुणसंतप्त हांक आमच्या हृदयाला घरे पाडून गेली व आम्ही अचानक साइड बदलली.

ॲक्‍चुअली पाहू गेल्यास आमच्यापास स्कूटर, मोटारसायकल किंवा चौचाकी वाहन नाही. हेल्मेटसक्‍तीला आमचा कडवा विरोध राहिल्याने आम्ही ‘मूले कुठार:’ ह्या न्यायाने ‘एकवेळ वाहनाचा त्याग करेन, पण हेल्मेट घालणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली व इन्शाल्ला त्याचे पालन करीत आहो. अर्थात, त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका आम्हांस अदेबाज बसणार नाही, असा कोणाचा गैरसमज होऊ शकेलही. परंतु वाचकहो, तसे नाही. मॉडेल कालोनीच्या नाक्‍यावरील पेट्रोल पंपावर कमांडोप्रमाणे हालचाली करत आल्यागेल्या गाडीस ‘झिरो बगा’ असे करड्या आवाजीत फर्मावणारा राजबिंडा इसम आपल्या पाहण्यात आला आहे काय? -ते आम्हीच!! कमांडोच्या हाती स्टेनगन असते, आमच्याहाती इंधन भरणारा नळोबा!! आल्या गाडीच्या इंधन टाकीचे झाकण धड न उघडणाऱ्या चालकास आम्ही तेथल्या तेथे जामतो. आणि हातात बाटली घेऊन अजीजीने सुटे इंधन मागणाऱ्यास आम्ही कर्तव्यकठोरपणाने नकार देतो. ‘पेट्रोल सादा की पावर?’ हे आम्ही सर्व गाड्यांच्या चालकांना कधीच विचारत नाही. काही गाड्यांमध्ये वळखूनच माल भरावा लागतो. मागल्या खेपेला एका भंगारटाइप गाडीत आम्ही (वळखून) डिझेल भरले. दुर्दैवाने ती गाडी पेट्रोलवाली निघाली. अडीच महिने ससूनात पडून होतो. पण ते जाऊ दे. 

एकतर मराठी माणूस हाच मुळात धगधगता अंगार असतो. धगधगत्या अंगारावर थोडीफार राख धरली तर त्याची धग जाणवत नाही. आमचे काहीसे तसेच झाल्याने आम्ही अंगार आहो, हेच लोक विसरले!! हिरा हा कोळशाचाच श्रीमंत भाऊ आहे, ह्याचा लोकांस विसर पडला. जाऊ दे. आमची किंमत ओळखणारे रत्नपारखी ह्या दुनियेत विरळाच म्हणायचे. अर्थात, आमचे आधारस्तंभ आणि ‘मातोश्री’निवासी मा. साहेब हे मात्र अपवाद हं!! त्यांनी आम्हास कोळशाच्या पोत्यांतून हुडकून काढले आणि आम्हांस इंगळाचा स्वभाव दिला. ते नसते, तर आज आम्ही कोठल्यातरी चुलीत दूध तापवत असतो!! असो.

इंधन दरवाढीच्या विरोधात वातावरण तापल्याने अनेक अंगार रस्त्यांवर आले. त्यापैकी आम्ही एक होतो. आमच्या आगलाव्या आंदोलनाने ऐन नवरात्रीला शिमग्याचे स्वरूप आले. अखेर अत्यंत यशस्वी आंदोलनानंतर आम्ही विजयाची खबर देण्यासाठी थेट आमचे आधारस्तंभ जे की मा. उधोजीसाहेब ह्यांच्या दर्शनासाठी ‘मातोश्री’वर गेलो. 

‘‘मुजरा, साहेब! अत्यंत आनंदाची खबर आहे. आंदोलन यशस्वी जाहाले. कमळ पक्षाच्या गोटात दाणादाण उडाली असोन ‘अरे’ म्हणणाऱ्याला आधीच ‘कारे’ म्हटल्याने त्यावर ‘अरे अरे’ करण्याची वेळ आली!! इंगळाचा विस्तव जहाला, विस्तवाचा वणवा!! हे सारे आपल्या आशीर्वादामुळे साहेब!! आता पुढील आज्ञा केलीत की बस्स! तुमचा हा मावळा तळहाती शिर घेवोन रणांगणात अखेरची लढाई लढण्यास तयार आहे...,’’ गुडघ्यावर वीरासनात बसोन आम्ही म्हणालो.

‘‘गप्पा ना रे आता...किती छळाल?’’ उधोजीसाहेबांच्या आवाजात पेट्रोलची गरज नसलेल्या गरिबाची काकुळत होती. त्याने आमच्या हृदयास पुन्हा घरे पडली. 

...‘माणसास जगण्यास आखिर किती जमीन लागते?’ असा गहन प्रश्‍न रशियातील एक (त्यातल्या त्यात बरे) साहित्यिक जे की ल्येव तलस्तोइ ह्यांनी विचारला होता. तद्‌वत आम्ही आता विचारत आहो की माणसास जगण्यासाठी आखिर किती डिझेल लागते अं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com