जीवनव्यवहार व्यापते, तीच भाषा टिकते

Sudhir-Rasal
Sudhir-Rasal

फेब्रुवारी महिना आला, की मराठी भाषेसंबंधी अनेक उत्सवी कार्यक्रम होऊ लागतात. हा महिना संपला, की पुढील फेब्रुवारीपर्यंत कोणालाही मराठी भाषेची आठवण होत नाही. उत्सव साजरे केले, की भाषेबद्दल आपले कर्तव्य झाले अशीच सरकारची, साहित्य संस्थांची कल्पना झालेली दिसते. आजच्या काळात केवळ मराठीच नव्हे, तर सर्व प्रांतिक भाषांची परिस्थिती बिकट बनलेली आहे. या भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या मोठी असली, तरी त्यामुळे या भाषा भावी काळात टिकतीलच, याची खात्री देता येत नाही. या सर्व भाषांवर प्रामुख्याने इंग्रजीचे आक्रमण होत आहे. हे आक्रमण असे, की ज्याचे आपण उत्साहाने स्वागतच करीत आहोत.

मराठीपुरते बोलायचे झाल्यास, महाराष्ट्र हा औद्योगिकदृष्ट्या अधिक प्रगत प्रांत आहे. त्यामुळे भारतातल्या विविध प्रांतांतले लोक पोटपाण्यासाठी महाराष्ट्राकडे धाव घेतात. त्यामुळे येथे सार्वजनिक व्यवहारांची भाषा हिंदी झाली आहे. औद्योगिक जगतात इंग्रजी आणि लोकव्यवहारात हिंदी, अशा स्थितीमुळे मराठी भाषेचा वापर संकुचित होत गेला आहे. आजचा विद्यार्थी इंग्रजीमधून शिकत असल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी वाङ्‌मय यापासून तो दुरावतो आहे. याचा परिणाम काही दशकांनंतर मराठी ही केवळ घरात बोलायची भाषा बनून जाईल. या परिस्थितीचे गांभीर्य आपण लक्षात घेत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अधिकाधिक बिघडत जाईल. मराठी ही अभिजात भाषा आहे आणि त्यासाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे, अशी आपली मागणी आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशीही मागणी आहे. या मागण्या रास्त असल्या, तरी ही केवळ वरवरची मलमपट्टी ठरणार आहे. मुख्य मुद्दा आपण जीवनव्यवहारात मराठीचा वापर वाढावा, या दृष्टीने प्रयत्न करतो काय? जी भाषा त्या समाजाचे सर्वच जीवनव्यवहार व्यापते, तीच भाषा टिकते आणि विकसित होत राहते.

घराबाहेर पडताच आपण मराठी बोलणे टाळतो. बाजारहाटामध्ये आपण मराठी बोलत नाही. वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक संस्थांमध्ये मराठीतूनच व्यवहार व्हावा, अशी मागणीही आपण करत नाही. याचा अर्थ अन्य भाषांमध्ये व्यवहार करू नये, असा होत नाही. हिंदी आणि मराठीचा द्वेष न करताही आपण मराठीचा आग्रह धरू शकतो. मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा द्वितीय किंवा तृतीय पातळीवर शिकवली जाते. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अवांतर वाचनासाठी काही साहित्यकृती सुचविलेल्या असतात. परंतु त्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेणे शाळांमध्ये घडतच नाही. परीक्षेमध्ये एक अनिवार्य प्रश्‍न अशा अवांतर वाचनावर देण्याची पद्धत सुरू केली, तर विद्यार्थ्यांना मराठी वाङ्‌मय वाचण्याची सवय आणि गोडी लागू शकेल. आज महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण प्रचंड वाढूनही साठ-सत्तर वर्षांपूर्वी मराठी पुस्तकांच्या खपाचे जे प्रमाण होते, ते बदलू शकलेले नाही. आजही हजार प्रतींची आवृत्ती खपायला चार- पाच वर्षे कालावधी लागतो. याचा अर्थ साक्षर वाढले, पण वाचक वाढले नाहीत. वाचकांची संख्या वाढली नाही, तर मराठी वाङ्‌मयाची जोपासना होऊ शकणार नाही. त्यासाठी शिक्षणपद्धतीमध्ये काही बदल करणे आवश्‍यक आहे.

मराठी हे शिक्षणाचे माध्यम असावे, असे आपण उच्चरवाने बोलत असतो. पण मराठी ज्ञानभाषा ठरण्यासाठी आपण कुठलेही विधायक प्रयत्न करत नाही. विंदा करंदीकर असे म्हणाले होते, की विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपल्या विषयातील किमान दोन ग्रंथ मराठीत अनुवादित केले, तर यातून मराठी ही ज्ञानाची भाषा म्हणून प्रगत होऊ शकेल. त्यांनी स्वतः या दिशेने कार्य केले. परंतु अशी कुठलीही चळवळ महाराष्ट्रात उभी राहू शकली नाही. खरे म्हणजे, इंग्रजी पारिभाषिक संज्ञा आहे तशा स्वीकारून मराठी भाषेतून शिक्षण दिले जाऊ शकते. या इंग्रजी संज्ञा मराठी भाषेच्या व्याकरणात बसवत राहिलो, तर त्या काही काळाने मराठीच बनून जातील. कुठलीही भाषा परभाषेतील शब्द या पद्धतीनेच स्वीकारीत असते. परंतु आपले शिक्षणतज्ज्ञ यासंबंधी गंभीरपणे विचार करत नाहीत. म्हणून मराठी भाषेतील साहित्य संस्था, महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे मराठीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. परंतु त्यासाठी एक अट आहे. ती म्हणजे, मराठी ही आपल्या जीवनाचे अस्तित्व टिकवून ठेवणारी भाषा आहे, या विचारावर पक्की निष्ठा राखणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com