समाजसेवा हे वृत्तपत्राचे कर्तव्यच!

समाजसेवा हे वृत्तपत्राचे कर्तव्यच!

‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी सर्वसामान्यांना वृत्तपत्राशी जोडले; आणि वृत्तपत्राला समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनविले. ‘सकाळ’ आजही समाजाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवितो आहे; आणि त्याची पुढील दिशाही तीच आहे. आज (२० सप्टेंबर) नानासाहेबांची जयंती. त्यानिमित्त ‘सकाळ’च्या सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नांविषयी.
 

लोकशिक्षण आणि मनोरंजन या मर्यादित उद्देशांनी चालविल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांच्या कक्षेत ‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी समाजपरिवर्तनाच्या कामाला समाविष्ट केले; आणि सर्वसामान्यांच्या ताकदीवर व विश्वासावर अशा अनेक कामांचे डोंगर उभे केले. बातम्या देणे हे वृत्तपत्रांचे प्रधान कर्तव्य आहेच; पण त्याने समाजाची सेवा केलीच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी नानासाहेबांनी वृत्तपत्रांची पारंपरिक चौकट मोडली; आणि सर्वसामान्यांना पत्रकारितेत केंद्रस्थानी आणले.

पत्रकाराला समाजाच्या प्रश्नांची चांगली जाण असली पाहिजे, समाजाच्या सुख-दुःखांशी पत्रकाराने एकरूप झाले पाहिजे; आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यात अग्रभागी असले पाहिजे, ही त्यांची धारणा होती. नानासाहेबांनी स्वतः ती आयुष्यभर पाळलीच; पण ‘सकाळ’च्या वृत्तीतही ती चपखल बसविली. याच ध्यासातून ‘सकाळ’ने लोकांचे प्रश्न व त्यांची गाऱ्हाणी सातत्याने मांडली; आणि त्यांवर परिणामकारक उपाय निघेपर्यंत त्यांचा पाठपुरावा केला. ताजी, वेगळी, अचूक आणि परिपूर्ण माहिती वाचकांना देण्यासाठी नानासाहेबांचे प्रयत्न सतत सुरू असत. त्या दृष्टीने बातमीदारांशी, विविध संस्था-संघटनांशी आणि व्यक्तींशी त्यांचा पत्रव्यवहार आणि बोलणे होत असे. अशा चर्चांमधून समाजातील अनेक प्रश्न समोर येत असत; आणि मग नानासाहेब त्यांचा ‘सकाळ’च्या माध्यमातून पाठपुरावा करू लागत. नानासाहेबांनी म्हटले आहे ः ‘आपणाला समाजाचे काही कार्य करावयाचे आहे, वृत्तपत्र हे त्याचे साधन अनायासे आपल्या हातात आले आहे, तेव्हा आलेली बातमी जशीच्या तशी देणे, हा वृत्तपत्राचा खरा आत्मा नसून, समाजात खोलवर जाऊन, त्याच्या दुःखाला वाचा फोडणे, ते कमी होण्याकरिता वृत्तपत्रात लिहून सरकार, नगरपालिका, ज्या ज्या संस्था अगर संघटनांचा संबंध येईल, त्यांना जागे करणे, हे वृत्तपत्राचे खरे काम. संपादक हा खरा समाजसेवक असला पाहिजे, मग तो बातमीदार असो, उपसंपादक असो की संपादकीय लिहिणारा असो, समाजाविषयी तळमळ, त्याच्या सुख-दुःखांशी तादात्म्य आणि तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे, ‘जे का रंजले गांजले, त्यांसि म्हणे जो आपुले’ त्यांच्याकरिता आपण आहोत, ही जितकी निष्ठा, तितकी संपादकाची उंची वाढेल, वृत्तपत्र प्रभावी होईल. आपले गाऱ्हाणे ऐकणारे एक स्थान आहे, असे लोकांना वाटू लागेल.’ नानासाहेबांच्या मनातील वृत्तपत्राची प्रतिमा काळाच्या खूप पुढची होती. दुर्बोध भाषेत लिहिलेले दीर्घ लेख आणि शिळ्या बातम्या या सामग्रीवर तेव्हाची पत्रसृष्टी समाधानी होती. ताज्या बातम्या, सोपी भाषा आणि लोकजीवनातील विषयांना प्राधान्य यांद्वारे नानासाहेबांनी वृत्तपत्राची चौकट बदलून टाकली. त्यांनी सर्वसामान्यांना वृत्तपत्राशी जोडले; आणि वृत्तपत्राला समाजजीवनाचा अविभाज्य भाग केले.  

‘सकाळ’ हे लोकांचे हक्काचे व्यासपीठ आहे; आणि विविध समाजघटकांचा भक्कम पाठिंबा हा त्याचा आधार आहे. ‘सकाळ’ ही आज सर्वसामान्यांची सवय झाली आहे; कारण त्यामागे ‘सकाळ’ची पंचाऐंशी वर्षांची वाचकनिष्ठा आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ सतत उपक्रमशील राहत आला आहे. नवनव्या उपक्रमांचा प्रारंभ आणि लोकसहभागातून त्यांची यशस्वी अंमलबजावणी हे ‘सकाळ’चे वैशिष्ट्य आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’द्वारे कोट्यवधी रुपयांचा मदत-निधी उभा राहिला; आणि नैसर्गिक आपत्तींत नुकसान झालेल्यांपासून कारगिल युद्धात जखमी झालेल्या जवानांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सामग्री उपलब्ध करण्यापर्यंत किंवा हुतात्मा जवानांच्या मुलींसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारण्यापर्यंत अनेक कामे त्यातून मार्गी लागली. मदत-निधी देणाऱ्या समाजाच्या ‘सकाळ’वरील अढळ विश्वासाचे हे प्रतीक आहे. ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने गेल्या सत्तावन्न वर्षांत साडेपाच हजारांवर विद्यार्थ्यांना सुमारे तीन कोटी नव्वद हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच आता संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना; तसेच ‘ज्युनियर मेंटल कॅल्क्‍युलेशन वर्ल्ड चॅंपियनशिप’साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षापासून फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. ‘बुद्धिमान, कर्तबगार, ज्ञानाविषयी तळमळ असणारी मुले-मुली हा फाउंडेशनचा आधार. या देशातील उत्कृष्ट विद्यार्थी जगातदेखील उत्कृष्ट ठरला पाहिजे, हे फाउंडेशनचे उद्दिष्ट. ते पूर्ण करण्याचा हा एकमेव मार्ग आणि निश्‍चय होय,’ असे नानासाहेबांनी तेव्हा म्हटले होते.

या निश्‍चयाचे आजचे स्वरूप किती तरी भव्य झालेले आहे. भारतीय विद्यार्थी जगातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत उजवे ठरावेत; तसेच शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घालून अभ्यासक्रमांची आखणी व्हावी, या आग्रहाखातर गेली बारा वर्षे ‘सकाळ’तर्फे ‘एज्युकॉन’ परिषद आयोजिली जाते. या सर्व प्रयत्नांमागे लोकसेवेचा घट्ट धागा आहे. 

सर्व समाजघटकांना स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा विकास करण्याच्या प्रक्रियेशी जोडून घेण्यासाठी ‘सकाळ’ने ‘परिवर्तनाची सप्तपदी’ समोर ठेवली आहे. माणसाच्या जीवनवर्तुळाशी निगडित अशी, प्रत्येक टप्प्यावर त्याला उन्नत व्हायला मदत करणारी सक्षम व्यवस्था उभी केली पाहिजे, असे ‘सकाळ’ला वाटते. याच उद्देशाने पुढच्या काळात विविध सात सूत्रांच्या (सिमॅसिस) आधारे समाजविकासाचे महत्त्वाकांक्षी स्वप्न ‘सकाळ माध्यम समूह’ पाहत आहे. शिक्षण आणि कौशल्यविकास (एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट), इम्पॅक्‍ट फंड, माध्यम (मीडिया), सल्ला-सेवा (ॲडव्हायजरी-कन्सल्टन्सी), समूहपरिवर्तन (कम्युनिटी ट्रान्स्फॉर्मेशन), इव्हेंट्‌स, विशेष प्रकल्प (स्पेशल प्रोजेक्‍ट्‌स) यांच्याशी संबंधित असणारे प्रकल्प ‘सिमॅसिस’ या सप्तपदीद्वारे ‘सकाळ’ राबविणार आहे. ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’द्वारे महाविद्यालयीन तरुणांना नेतृत्वगुणांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेऊन त्यांचे मंत्रिमंडळ तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. आपले प्रश्न आपणच शोधून, त्यांवरील उपाय सर्वानुमते ठरवून सामूहिक कृतींद्वारे अनेक जटिल प्रश्न सोडविता येतात, असा विश्वास ‘तनिष्कां’च्या व्यासपीठाने निर्माण केला आहे. त्यांच्या पुढाकाराने राज्यातील ३५६ गावांत पाणी अडविण्याचे प्रयोग झाले; आणि त्यांतून ५३० कोटी लिटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली आहे.

‘ॲग्रोवन’च्या ‘सरपंच परिषदे’ने गावागावांतील सरपंचांना आदर्श कारभाराचा आणि ग्रामसुधारणेचा वस्तुपाठ दिला आहे. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ (डीसीएफ), ‘सकाळ रिलीफ फंड’, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांच्यातर्फे समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या गरजा जाणून घेऊन परिवर्तनाचे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीतील कौशल्ये शिकविण्याचीही कल्पना आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सिंपल’ (सीनियर यूथ मूव्हमेंट फॉर पीस, लर्निंग अँड एंजॉयमेंट) योजना सुरू होणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन, त्यांच्या ज्ञानाचा-अनुभवाचा उपयोग करून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्याचे स्वप्न ‘सकाळ माध्यम समूह’ पाहतो आहे. नानासाहेबांनी ज्या प्रगतीचे चित्र समोर ठेवून ‘सकाळ’ची उभारणी केली, ती अधिक बळकट करण्याच्या या प्रयत्नांत समाजाची साथ आहेच. पुढील काळातही ती नक्की मिळत राहील, असा दृढ विश्वास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com