जिवाशी खेळ

Milk
Milk

दुधातील भेसळीच्या प्रमाणातील वाढ भयावह आहे. ती रोखण्यासाठी निकड आहे ती कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची. देखरेख यंत्रणा निष्प्रभ का ठरत आहेत, याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.

दूध हे एका प्रकारे जीवनदायी अमृत; पण तेच आता विषसमान ठरू लागले 
 आहे की काय, असा प्रश्‍न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

राज्यातील सुमारे ७१ टक्के दूध भेसळीचे असल्याची धक्कादायक माहिती ‘कंझ्युमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ने केलेल्या तपासणीत नुकतीच उघड झाली आहे. अशा प्रकारचे हे भेसळीचे दूध वापरून इतर दुग्धजन्य पदार्थ, पाककृती बनवल्या जात असताना त्यांचाही किती विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होतो, याचा विचार करणे आवश्‍यक आहे. पोषक घटक म्हणून दुधाचा समावेश लहानांपासून ज्येष्ठांच्या आहारात केला जातो. त्यामुळेच त्याचे परिणाम सर्वव्यापी असतील, यात शंका नाही.

आपल्याकडच्या नियामक व देखरेख यंत्रणा मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भेसळीला आळा घालण्यात सक्षम का ठरत नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. यापूर्वीही अनेक पाहण्या आणि तपासण्यांमधून हा प्रश्‍न प्रकर्षाने समोर आला आहे. दूधवाला दुधात पाणी मिसळतो, ही तक्रार भेसळीपेक्षा दुधाचा दाटपणा कमी होतो, यासाठी प्रामुख्याने केली जाते; त्यामुळेच बहुधा त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसे; पण संबंधित पाहणीत आढळून आलेली गंभीर बाब म्हणजे दुधात घातले जाणारे पाणीच प्रदूषित असल्याचे आढळले आहे. एकीकडे दुधात पाणी मिसळले तर त्यातील पोषणमूल्ये कमी होतातच; पण आरोग्यावरही घातक दुष्परिणाम होतात. पाण्याव्यतिरिक्त अनेकदा रासायनिक पदार्थही दुधात मिसळले जातात. शिवाय रसायनांपासून तयार केलेले कृत्रिम दूधही तयार करून विकले जात आहे. हे सर्व थांबविण्यासाठी तातडीने आणि सर्वंकष उपाययोजनांची गरज आहे.

भेसळीच्या दुधामुळे क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारख्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो. कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्‍यक असणारे ‘लायसिन’ हे अमिनो आम्ल शरीराला मिळत नाही. परिणामी, लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होऊन त्यांची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकामुळे उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडण्याचा संभव असतो. लॅक्‍टोज, साखर, ग्लुकोज तसेच पीठ आणि मैदा अशा प्रकारचे स्टार्च; मीठ, स्कीम मिल्क पावडरचीही भेसळ होते. अनेक ठिकाणी दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर इत्यादींसारखे पदार्थ मिसळण्यात येतात.

कच्चे धारोष्ण दूध पिणे काय किंवा अगदी चहा-कॉफीपासून ते सुगंधी दूध अशा प्रकारे विविध चवीढवींनी युक्त पिणे काय, या सर्वांच्याच बाबतीत आता सावध राहावे लागेल. याचे कारण, ही परिस्थिती फक्त तबेल्यामधील दुधाची नाही, तर काही नामांकित ब्रॅंडच्या दुधाबाबतही हीच स्थिती आहे. त्यामुळे अनेक परिमाणे वापरल्याचा दावा करणाऱ्या काही नामांकित दूध कंपन्यांबाबतही संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे दूध पाहिल्यावर त्याची भेसळ कशी ओळखायची, याविषयी ठिकठिकाणी जागृती घडविण्याची, त्यासाठी काही उपक्रम राबविण्याची गरज आहे.
केवळ पैशाच्या लोभाने लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना ना कायद्याचा धरबंद, ना नैतिकतेचा. त्यांच्यावर जरब बसेल, अशा प्रकारची कारवाई आवश्‍यक आहे. अर्थात, हा केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात पसरलेला ‘विकार’ आहे. हे प्रकार थांबण्याची कुठेही चिन्हे दिसत नाहीत. प्रशासनाने अनेक आश्‍वासने देऊनही भेसळीचे प्रकार थांबलेले नाहीत. गेल्या वर्षी उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला याबाबत काय उपाययोजना केली, याबाबत विचारणा केली होती; परंतु पुरेसे अधिकारी - कर्मचारी नसल्याने कारवाई करायची कशी, हा प्रश्‍न ‘अन्न व औषध प्रशासना’समोर होता. दूध भेसळ रोखण्यासाठी यापूर्वीच सरकारने राज्यभरात प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, निधीअभावी तोही पूर्णत्वास गेला नाही. राज्यातील काही शहरांत या प्रयोगशाळा उभ्या राहिल्या तरी तिथेही कर्मचाऱ्यांची वानवा आहेच. त्यामुळे प्रकार वाढले तरी ते रोखणे अशक्‍य बनले आहे. या अडचणींवर कधीतरी मात करायला हवी; अन्यथा होणारे दुष्परिणाम जास्त नुकसान घडवतील. संस्कृत साहित्यात हंसाला दूध आणि पाणी वेगळे करण्याचा नीर-क्षीर विवेक असल्याचे सांगितले जाते; पण अलीकडे भेसळीचे प्रमाण इतके वाढले आणि गुंतागुंतीचे झाले आहे, की आता राजहंसाची ती शक्तीदेखील पुरी पडणार नाही! त्यामुळेच सर्वांगीण उपाय योजण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com