सत्तेचे जड झाले ओझे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

शिवसेना सत्तेत राहते काय आणि राणे भाजपमध्ये जातात की नवा पक्ष काढतात, याच्याशी जनतेला काहीही देणे-घेणे नाही. आपले प्रश्‍न कधी सुटणार आणि महागाई कधी कमी होणार, यांतच जनतेला खरा रस आहे.

शिवसेना सत्तेत राहते काय आणि राणे भाजपमध्ये जातात की नवा पक्ष काढतात, याच्याशी जनतेला काहीही देणे-घेणे नाही. आपले प्रश्‍न कधी सुटणार आणि महागाई कधी कमी होणार, यांतच जनतेला खरा रस आहे.

महाराष्ट्राच्या गादीवर भारतीय जनता पक्षाने अडीच-पावणेतीन वर्षांपूर्वी युती तोडून कब्जा केला आणि शिवसेनेच्या हाती विरोधी पक्षनेतेपदाची लाल दिव्याची गाडी आली! त्यानंतरच्या महिनाभरात पांढऱ्या शेल्यात हात बांधून सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेचे मंत्री व आमदार गेले काही दिवस अस्वस्थ आहेत. त्याच वेळी एकेकाळी केवळ शिवसेनेत असल्यामुळेच मुख्यमंत्रिपद मिळालेले आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणेही अस्वस्थ आहेत. दुसरीकडे राणे आपल्या छावणीत दाखल होतात की काय म्हणून भाजपचे कोकणवासी कार्यकर्ते जसे अस्वस्थ आहेत, त्याचबरोबर राणे यांना सत्तेची छत्रचामरे मिळाल्यावर ते आपल्याशी कशी कडवी झुंज देतील, या भावनेने मुंबई व कोकणातील शिवसैनिकांच्या पोटातही गोळा आला असेल. त्यामुळेच घटस्थापना होण्यास अवघे २४ तास असताना या तमाम नाराजवंतांनी ऐन पितृपक्षात महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर शिमग्याची सोंगे दाखविण्याचा घाट घातला आहे. खरे तर राजकारण्यांची ही सोंगे गेली अनेक दिवस महाराष्ट्राची जनता निमूटपणे पाहत आहे. पेट्रोल-डिझेलची रोज होणारी दरवाढ, कांदे व्यापारावर सट्टे लावणाऱ्या काही मोजक्‍याच सटोडियांची मुजोरी, ‘ऑनलाइन’ अर्जांच्या घोळात अडकून पडलेली शेतकरी कर्जमाफी आणि मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा उडालेला बोजवारा अशा नानाविध कारणांमुळे राज्यातील रयतही अस्वस्थ आहे. मात्र सत्तेतील भागीदार असोत की विरोधी बाकांवर नाइलाजाने बसावे लागलेले नेते असोत; कोणालाही त्याची जराही फिकीर असल्याचे दिसत नाही. 

अशा वातावरणात शिवसेनेने पुन्हा एकदा ‘या सरकारचे करायचे काय,’ असा सवाल उपस्थित केला आहे. अर्थात सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी शिवसेनेने भाजपला काही पहिल्यांदाच दिलेली नाही. तरीही या वेळी आमदारांनीच तशी मागणी केल्यामुळे ही धमकी गांभीर्याने घ्यायला हरकत नाही. शिवसेना मंत्रिमंडळात सामील झाली तेव्हा परिस्थिती उलटी होती. पंधरा वर्षांच्या राजकीय वनवासानंतर शिवसेनेचे आमदार विरोधी बाकांवर बसायला तयार नव्हते आणि सरकार टिकवण्यासाठी भाजपनेही गळ टाकलेच होते. मात्र पुढच्या काळात भाजपने शिवसेनेच्या सत्तातूर आमदारांना व त्यांच्या मंत्र्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली आणि त्यामुळेच आता सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेत कमालीची अस्वस्थता आली आहे. त्याचवेळी एकदा कोकणात आणि नंतर मुंबईतील वांद्रे पोटनिवडणुकीत, असे दोन पराभव पदरी घेणाऱ्या राणे यांनाही काँग्रेस नकोशी झाली आहे! राणे यांची अस्वस्थता खरे तर आजची नाही. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासूनच ते अस्वस्थ आहेत आणि त्याचे कारण काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपद दिले नाही, हेच आहे. त्यामुळेच आता भले भाजपने त्यांना आपल्या छावणीत दाखल करून घेतले तरी त्यांचा बाडबिस्तरा ‘वर्षा’ बंगल्यावर जाण्याची सुतराम शक्‍यता नाही. तरीही ते भाजपमध्ये जाण्यास उतावीळ आहेत आणि त्यांचा हा उतावीळपणा उघड झाल्यामुळेच भाजपचे नेतेही त्यांना झुलवत आहेत. राणे यांनी कुडाळ या आपल्या बालेकिल्ल्यात शक्‍तिप्रदर्शन घडवून आणले आणि आता ते ‘हे शक्‍तिप्रदर्शन नव्हते, कार्यकर्ते स्वत:हून आले होते’, असे सांगत आहेत! ‘सर्वच पक्ष आपल्याला घ्यायला उत्सुक आहेत!’ असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचे कारण पाहुण्याच्या हातून साप मारला गेला, तर तो सर्वच पक्षांना हवा आहे. मात्र कोणताही पक्ष त्यांना मुख्यमंत्री करणार नाही, हेही स्पष्ट आहे.

या अशा परिस्थितीमुळे स्वस्थचित्त आहेत, ते फक्‍त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! शिवसेना सत्तेतून बाहेर पडलीच आणि भले राष्ट्रवादी काँग्रेसने रसद पुरवली नाही, तर छोट्या गटांना सोबत घेऊन सरकार टिकण्याची तजवीज बहुधा झाली असणार! त्यामुळेच ते ‘सुशेगाद’ आहेत. मात्र राजकीय रंगमंचावर ही सोंगे रंगात आलेली असताना, त्यातल्या त्यात वास्तवाचे भान शिवसेनेलाच असल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखवलेले ‘अच्छे दिन’ नावाचे स्वप्न केव्हाच भंग पावले आहे आणि लोकांची भाजपविरोधातील नाराजी वाढत चालल्याचे हळूहळू आणि खासगीत का होईना दिसू लागले आहे. तेव्हा आपण सत्तेतून महागाई, तसेच कर्जमाफी आदी कारणे दाखवून बाहेर पडलो, तर किमानपक्षी आपल्याला जनतेबरोबर तरी राहता येईल, असा शिवसेनेचा आडाखा आहे. मात्र आजवर अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याच्या फुकाच्या धमक्‍या देणारी शिवसेना अखेरीस हे धाडस करेल काय, हाच लाखमोलाचा सवाल आहे. केंद्रात व राज्यातही सत्ता आल्यामुळे भाजपच्या हाती विरोधकांची अनेक कुलंगडी आली आहेत.

त्यामुळे रणांगणावर ऐन वेळी तलवार म्यान करण्याचेच धोरण शिवसेनेने स्वीकारले, तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको! मात्र जनतेला आपले प्रश्‍न कधी सुटणार आणि महागाई कधी कमी होणार, यांतच खरा रस आहे.

शिवसेना सत्तेत राहते काय आणि राणे भाजपमध्ये जातात की नवा पक्ष काढतात, याच्याशी जनतेला काहीही सोयरसुतक नाही. राजकारण्यांना हे कधी कळणार?