हौस ऑफ बांबू : वेटिंग फॉर गोदा..!

नअस्कार! कोथरुडच्या रस्त्यावर ब्रेड आणि अंडी आणायला निघाल्यासारखा एखादा अतिशय सभ्य गृहस्थ तुमच्या पाहण्यात आलाय का?
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

नअस्कार! कोथरुडच्या रस्त्यावर ब्रेड आणि अंडी आणायला निघाल्यासारखा एखादा अतिशय सभ्य गृहस्थ तुमच्या पाहण्यात आलाय का?

नअस्कार! कोथरुडच्या रस्त्यावर ब्रेड आणि अंडी आणायला निघाल्यासारखा एखादा अतिशय सभ्य गृहस्थ तुमच्या पाहण्यात आलाय का? (आमच्या कोथरुडात सभ्य गृहस्थ दुरुनसुद्धा ओळखता येतो, असं कुणी म्हणतील. दुर्लक्ष करा!) ते आमचे अतुल पेठे! निळी पिशवी घेऊन जाताना मी त्यांना कालच बरोब्बर हटकलं. ‘‘अंडी का? सत्तर की शहात्तर?,’’ मी आपला डझनाचा भाव कुतुहलानं विचारला. ‘‘अंडी? छे!,’’ ते दचकलेच. ‘‘अभिनंदन! तुम्हाला गोदा पुरस्कार जाहीर झालाय!,’’ मी बातमी फोडली. नाशकाहून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या हेमंत टकलेसाहेबांनी खास फोन करुन मला ही आतली बातमी आधीच दिली होती. ‘‘अतुल पेठे- एकवीस हजार’’ एवढंच कुजबुजून त्यांनी घाईघाईत फोन ठेवला. ते राष्ट्रवादी कांग्रेसचे खजिनदारदेखील आहेत. खजिनदार असल्यामुळे ते कायम कुजबुजल्यासारखंच बोलतात. असो!

‘थँक्यू! पण मी अंडी नाही, कोथंबिर आणायला चाललोय!,’ एवढा खुलासा करुन सभ्य गृहस्थ अतुल पेठे अदृश्य झाले. वाट चुकवून हा मनुष्य शनवारपेठेतल्या ‘सुदर्शन’मध्ये शिरणार, म्हणून मी पाठलाग करायचं ठरवलं होतं. पण…जाऊ दे. आपल्याला काय करायचंय? ही हौशी आणि प्रायोगिक नाटकवाली मंडळी कायम त्या ‘सुदर्शन’ मध्ये पडीक असतात. पूर्वी तिथं मंगल कार्यालय होतं, तिथं आता यांची नाटकं ‘होतात’ !!...या इथंच, आमच्या प्रतिभावान पुणेकर सभ्य गृहस्थ अतुल पेठ्यांच्या प्रतिभेची पेठ फुलली, फळली, बहरली.

आमच्या पुण्यात दोन पेठे जगविख्यात. एक पेढीवाले, आणि हे दुसरे नाटकवाले!! पैकी नाटकवाले पेठे हे नाव अधिक जगविख्यात! आजही पुण्यात जी काही धडपडणारी सानेगुरुजींची मुले आहेत, त्यापैकी आघाडीचं नाव. जे काही करायचं ते अत्यंत कळकळीनं, प्रामाणिकपणानं आणि पोटतिडकीनं करायचं हा बाणा. पेठ्यांना ‘गोदा पुरस्कार‘ मिळाल्याचा ओवरीभर आनंद मला झाला आहे. त्यांचं ‘सूर्य पाहिलेला माणूस’ अजूनही रसिकांच्या स्मरणात असेल. ‘सत्यशोधक’ च्या वेळेलाही त्यांनी साध्यासुध्या ‘न-नटां’कडून अशी काही कामं करुन घेतली होती की, भले भले अभिनेते ‘बराच बरा’ प्रयोग आहे, असं कबूल करु लागले होते.(पुण्याच्या भाषेत ‘बराच बरा’ म्हणजे एक्सलंट!) खूप पूर्वी त्यांनी सॅम्युएल बेकेटचं ‘वेटिंग फॉर गोदो’ केलं होतं. पण तेव्हा हे गृहस्थ ‘वेटिंग फॉर गोदा (पुरस्कार)’ची तयारी करताहेत, असं मात्र मुळ्ळीच वाटलं नव्हतं हं!

मधल्या काळात त्यांनी कितीतरी प्रायोगिक नाटकं, अभिवाचनं, पथनाट्य वगैरे केली…आणि हे सगळंच्या सगळं भयंकर सीरिअसली आणि पोटतिडकीनं, बरं का! एवढी पोटतिडीक प्रकृतीला बरी नाही, असं त्यांना काल सांगणार होत्ये, पण तेवढ्यात ते कोथिंबिरीचं कारण देऊन सटकले!! पेठ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. (एकवीस हजारांचं हे पेठे काय करणार? हा प्रश्नच आहे. असो.) होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या डॉ. हेमचंद्र प्रधानांनाही ‘गोदा पुरस्कार’ मिळाला आहे. चेंबूरच्या ‘सेंटर’वर त्यांना हिरवळीवर चकरा मारताना मी (दुरुनच) बघितलंय. आमचं आणि विज्ञान शिक्षणाचं पहिल्यापास्नं थोडं वाकडंच. होमी भाभा केंद्राचे संस्थापक आणि माजी संचालक वि. गो. कुलकर्णी ऊर्फ व्हीजी आज हयात असते तर त्यांनी डॉ. प्रधानांची नक्की पाठ थोपटली असती. विज्ञानावरची चाळीसेक पुस्तकं प्रधानसरांनी लिहिली आहेत, हे ऐकून मी पाऊण तास निपचितच पडल्ये होते! चित्रकार सुधीर पटवर्धन, तबलावादक पं. सुरेश तळवलकर, इगतपुरीची वाघीण सीताबाई घारे आणि आमचे कोरोनायोद्धे (योद्धे कसले? कोरोना क्याप्टनच ते!) आरोग्यमंत्री राजेश (तात्या) टोपे यांनाही गोदा पुरस्कार जाहीर झालाय. या सगळ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. लगे रहो!

…‘सुदर्शन’वर चक्कर टाकायचा बेत आहे. पेठ्यांच्या प्रायोगिक पेठेत नवीन काय चाललंय, हे बघायला नको का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com