‘प्राक्‍तन’ ऑफ द इयर

‘प्राक्‍तन’  ऑफ द इयर

आईच्याच मित्राकडून अत्याचाराला बळी पडलेल्या एका तेरा वर्षांच्या अबोध बालिकेकडून छळाचं वर्णन ऐकताना न्यूयॉर्कमधल्या सामाजिक कार्यकर्त्या तराना बुर्क निःशब्द झाल्या होत्या. सुरेश भटांच्या भाषेत, ‘समजावुनी व्यथेला समजावता न आले, मज दोन आसवांना हुसकावता न आले,’ अशा अवस्थेत तिला समजावताना श्रीमती बुर्क यांना कसाबसा एकच शब्द सुचला होता, ‘मी टू’! ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची, १९९७ मधली. वय, धर्म, देश सीमांच्या पलीकडं केवळ स्त्री म्हणून वाट्याला येणारी वेदना एका धाग्यात गुंफणारा शब्द. त्या शब्दानं कोनाड्यात बसून स्फुंदून स्फुंदून रडत बसण्याऐवजी बंडाची ऊर्जा दिली. लोकलाजेची बंधनं झुगारून छेडछाड, विनयभंग, लैंगिक छळाचे अनुभव जगापुढं मांडण्यासाठी त्यानंतर लाखो, कोट्यवधी सबलांनी तो शब्द वापरला. मिळून साऱ्याजणींनी आवाज उठवला. असं धाडस दाखवणाऱ्या सगळ्याजणी ‘सायलेन्स ब्रेकर्स’ ठरल्या. 

पश्‍चिमेकडच्या कथित प्रगत व काहीशा मुक्‍त वातावरणातही स्त्री अबलाच असते. एकमेकींना ‘मीदेखील तुझ्यासारखीच’ म्हणते. ॲशले जुड व अलिस्सा मिलानोसारखी अभिनेत्री सेल्मा ब्लेअर असो, सिनेटर सारा गेलसर, पत्रकार वेन्डी वॉल्श, लिंडसे रेनॉल्डस, सॅंड्रा मुलर, मेगीन केली असोत, की जॉना मेलारा नावाची गृहिणी. पुरुषांच्या विखारी नजरा, किळसवाणे स्पर्श, शिसारी आणणारी लगट, अधिकारांचा गैरफायदा घेऊन शोषण हे या सगळ्यांचे प्राक्‍तन एकसारखेच. करिअर - उत्कर्षाच्या नावाखाली, अगतिकतेमुळं वाट्याला आलेले प्रसंग परिणामांची तमा न बाळगता, धाडसाने, धीरोदात्तपणे चव्हाट्यावर आणले म्हणून हे फक्‍त त्यांच्याच वाट्याला आलंय असं नाही. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अशा सगळ्याच जगातलं हे वास्तव आहे. आता हे प्राक्‍तन जगप्रसिद्ध टाइम साप्ताहिकाचं ‘पर्सन ऑफ द ईअर’ ठरलंय. जगानं स्त्रीच्या हुंदक्‍यांना जणू हृदयाशी कवटाळलंय. संतापाला सोबतीची खात्री दिलीय. २००६ मध्ये माहितीजालात प्रवेश करणाऱ्या जगातल्या प्रत्येकाला संगणकाच्या पडद्यावर ‘यू’ लिहून ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ असं गौरविलं होतं. तितकी अद्‌भुत निवड होण्यासाठी अकरा वर्षं जावी लागली. 

ही ‘मी टू’ हॅशटॅगची वाटचाल रोमहर्षक आहे. काही पुरुषांच्याही वाट्याला वासनेच्या वेदना आल्या, तेही व्यक्‍त झाले. दरम्यान, हॉलिवूडमधले दिग्गज दिग्दर्शक, देश चालवणारे बडे राज्यकर्ते, मोठमोठ्या कंपन्यांचे कर्तेधर्ते, एकेकाचे बुरखे फाटत गेले. सोशल मीडिया हे त्या साध्याचं साधन ठरलं.

ऑक्‍टोबर २०१५ पर्यंत दोन लाखांहून अधिक व ऑक्‍टोबर २०१६ पर्यंत पाच लाखांहून अधिक वेळा ‘मी टू’ हा ‘हॅशटॅग’ ट्‌विट झाला. फेसबुकवर अवघ्या चोवीस तासांत तब्बल ४७ लाख लोकांनी तो १ कोटी २० लाख वेळा वेगवेगळ्या ‘पोस्ट’मध्ये वापरल्याचा विक्रम घडला. त्याचा प्रभाव अमेरिकेतल्या ४५ टक्‍के फेसबुक यूजर्सपर्यंत होता. इंग्रजीतल्या ‘मी टू’च्या अन्य देशांमध्ये भाषिक आवृत्त्या निघाल्या. फ्रान्समध्ये ‘बॅलन्सटोनपोर्क’ म्हणजे ‘डिनाऊन्स युवर पिग’, इटालीत क्‍वेलाव्होल्टाचे (द टाइम दॅट), स्पेनमध्ये ‘योटेम्बेन’, कॅनडातल्या फ्रेंच भाषकांमध्ये ‘मोईऑस्सी’, इस्राईलमध्ये हिब्रू भाषेत ‘अस टू’ म्हणत समवेदना जगभर विस्तारत गेली.

पाच चेहरे अन्‌ सहावा हात...!
‘द सायलेन्स ब्रेकर्स’ बनून ‘टाइम’च्या मुखपृष्ठावर झळकलेल्या पाचजणी एव्हाना जगाला माहीत झाल्यात. त्या आहेत, हॉलिवूड दिग्दर्शक हार्वे वेनस्टेनविरुद्ध पहिली तक्रार करणारी अभिनेत्री ॲशले जुड, पॉपस्टार गायिका व गीतकार टेलर स्वीफ्ट, कार्पोरेट लॉबिस्ट अडामा इवू, उबेर कंपनीत अभियंता म्हणून काम केलेली सुसान फ्लॉवर अन्‌ आपल्याकडं चहाच्या मळ्यांत किंवा कापूस वेचणी करणाऱ्या महिलांसारखीच मेक्‍सिकोत स्ट्रॉबेरी गोळा करणारी इसाबेल पास्कल टोपणनावाची शेतमजूर. पण, या चित्रात एक गूढ सामावलंय. तळाला सर्वांत पुढे बसलेल्या इसाबेलच्या डाव्या बाजूला मेजावर सहाव्या महिलेच्या उजव्या हाताचा कोपरा दिसतो. पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच ती सहावी कोण, हे कोडं अखेर, ‘टाइम’नंच सोडवलं.

ती अमेरिकेतल्या टेक्‍सास प्रांतातली इस्पितळ कर्मचारी आहे. कुटुंबाला त्रास नको म्हणून जसं मेक्‍सिकोतल्या शेतमजूर महिलेनं खरं नाव लपवलं, तसंच या टेक्‍सासच्या महिलेलाही तिचा चेहरा जगापुढं नको होता. तीदेखील पाचजणींसोबत आहे, हे दाखवण्यासाठी तिच्या उजव्या हाताचा कोपरा छायाचित्रात आला. जणू, जगातल्या प्रत्येक महिलेला तो आपलाच हात आहे, असं वाटावं! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com