स्थायी परिवर्तन

स्थायी परिवर्तन

तत्कालीन आवेगाचे स्थायी परिवर्तनात रूपांतर करणे फार कमी जणांना साधते. ते तसे सोपे नसते. एखादी घटना मनात लाट निर्माण करते, महापुरुष त्या लाटेचा प्रारंभबिंदू करतात. हळूहळू परिवर्तनाचा प्रारंभ करतात. दक्षिण आफ्रिकेत असताना वर्णद्वेषातून गांधीजींना अपमान सहन करावा लागला. त्यांचे सामान रेल्वेगाडीच्या प्रथम वर्गाच्या डब्यातून बाहेर फेकून देण्यात आले. त्यांना प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली. अन्याय सहन न करण्याचा संकल्प झाला. तो पुढे भारतावरील परकीयांची गुलामी दूर करण्यात परिणत झाला. 

राजा राममोहन राय यांनी लहान वयात, मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर वहिनीला लोकांनी चितेवर जबरदस्ती ढकलताना पाहिले. तिची जगण्याची तडफड समाजाने धर्माच्या नावावर चिरडून टाकताना त्यांनी पाहिली. मोठ्या वयात त्यांनी लॉर्ड बेंटिंकद्वारे सतिप्रथा प्रतिबंधक कायदा करवून घेतला. 
तुळशीराम नावाच्या कुष्ठरोग्याला बाबा आमटेंनी रस्त्याच्या कडेला जखमांच्या जंजाळात विव्हळताना पाहिले. त्याच्या अंगावर आपली शाल टाकून भयाने व धक्‍क्‍याने थरथरत ते घरी आले. पण त्यानंतर पुढील संपूर्ण आयुष्य त्यांनी वरोरा येथे कुष्ठरोगी सेवेत व त्यांच्या पुनर्वसनात घालवले. 
जेवताना मीठ मागितले म्हणून भावजयीने टोमणा मारला आणि पानावरून तडक उठून भूषण घर सोडून निघाला. पुढे कविराज भूषणने ‘शिवाबावनी’ रचली. महापुरुषांच्या जीवनात असा कुठलासा प्रसंग ठिणगीचे काम करतो. त्याचे हळूहळू ज्वाळेत रूपांतर होते. 

जनसामान्याचे काय होते... त्यांना स्थायी परिवर्तनासाठी तीन गोष्टी नित्यनियमाने कराव्या लागतात. प्रथमतः आपले लक्ष्य ठरवून रोज त्याचे चिंतन करणे. त्या संबंधीची जाणीव सतत ठेवणे. आपले जीवन त्या कल्पनेने भारून टाकणे, ध्रुवताऱ्यासारखे त्याचे सतत ध्यान करून मार्गक्रमण करणे.

दुसरे म्हणजे समविचारी लोकांना मित्र करणे. त्यांच्या सतत सहवासात राहणे. चर्चा, गप्पा यांच्यातून कणाकणाने एक दुसऱ्याचा सहयोग घेत सर्वांनी प्रगती करणे. एकटा चालणारा लवकर थकतो. समूहात चालणारे दीर्घ अंतर कापू शकतात. त्यामुळे आपले सोबती निवडताना मनुष्याने जागृत असावे.

तिसरे म्हणजे आपल्याला जे साध्य करायचे आहे, त्याच्या अनुरूप काहीतरी कार्यक्रमांमध्ये स्वतःला नित्य गुंतवून ठेवणे. कल्पनेमध्ये, विचारांमध्ये अथवा चर्चेमध्ये असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अशी व्यावहारिक प्रत्यक्ष हालचाल खूप आवश्‍यक असते. अन्यथा मनुष्य शब्दांचे बुडबुडे निर्माण करणारा ‘गप्पीदास’ होऊन जातो. गांधीजींनी आपल्या आश्रमवासीयांना या तीन टप्प्यांवर अग्रेसर करण्यासाठी तीन गोष्टी केल्या. नित्यप्रार्थना, सामूहिक सत्याग्रह व चरखा चालविणे. नित्य प्रार्थनेने ध्येयचिंतन जागृत राहिले. सामूहिक सत्याग्रहामुळे समविचारी लोकांचा सहवास सर्वांना प्राप्त झाला आणि चरखा चालवणे अथवा सफाई करणे, अशा प्रत्यक्ष कामाने ध्येयाविषयी प्रतिबद्धता आली. सामान्य लोकांनी असामान्य कामे करून दाखवली. व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात क्रमाक्रमाने स्थायी परिवर्तन आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com