गुंतागुंतीचे प्रश्‍न

गुंतागुंतीचे प्रश्‍न

पुराणात एक चमत्कृतीपूर्ण कथा आहे. एक गरुड स्वतःचे भक्ष्य असलेल्या विषारी सापाला आपल्या बळकट पंज्याच्या नख्यांमध्ये पकडून घेऊन जातोय. साप सुटण्यासाठी तडफडतोय. त्याच्या तोंडातून गरळ बाहेर सांडतंय. खाली एक गवळण दूध विकायला डोक्‍यावर हंडा ठेवून निघाली आहे. त्या फेसाळत्या दुधात ते गरळ उतरलं, विरघळलं. गवळणीला ध्यानात न येता ही घटना घडली. गवळणीने ते दूध तिच्या नियमित ग्राहकांना दिलं. दुधात विष विरघळलं आहे. दुधाचा रंगसुद्धा बदललेला नाही. गृहिणीने ते चुलीवर तापत ठेवलं. आलेल्या पाहुण्यांना एका चषकात ते दिले. अजाणता दूध प्यालेला पाहुणा थोड्या वेळातच विषबाधा होऊन गतप्राण झाला.  वर स्वर्गामध्ये चित्रगुप्त आपली लेखणी सरसावून वहीखाते समोर धरून यमधर्माला विचारतो, ‘हे पाप कुणाच्या नावार लिहू? सापाच्या, गरुडाच्या, गवळणीच्या, गृहिणीच्या की स्वतः पाहुण्याच्या? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणाचा..’ प्रश्‍न गुंतागुंतीचा आहे.

प्राचीन देश व वैविध्यांनी परिपूर्ण असलेल्या आपल्या समाजाचे प्रश्‍नही असेच गुंतागुंतीचे आहेत. प्रश्‍न सरळ नाहीत. विविध आयाम असलेले आहेत. संतुलित चिंतन व सर्वंकष विचार केल्याशिवाय ते सुटणार नाहीत. प्रत्येक प्रश्‍न वेगळा आहे. कोणतेही समान सूत्र सर्वत्र लागू होत नाही. आरक्षणाचा विषय असो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असो, आर्थिक विषमतेमुळे निर्माण होणाऱ्या नक्षलवादाचा असो, की अंधश्रद्धांचा असो. विषय गुंतागुंतीचे... प्रश्‍न गुंतागुंतीचे.

राजस्थानातील एका गावी एका म्हाताऱ्या शेतकऱ्याजवळ १७ उंट होते. आपल्या तीन मुलांमध्ये त्याला ते उंट वाटायचे होते. त्याने मृत्युपत्रात अर्धे उंट मोठ्या मुलाला, तिसरा भाग मधल्या मुलाला आणि नववा भाग धाकट्या मुलाला द्यावा, असे लिहिले. त्याच्या मृत्यूनंतर गावातले पंच वाटणी करण्यासाठी बसले. त्यांचे डोके चालेना. सतरा उंटांचे अर्धे कसे करावे? तिसरा भाग, नववा भाग कसा करावा... सगळेच कठीण. तीन दिवस खलबत- चर्चा चालल्या. उंटांना कोणी दाणापाणी देईना. आता आपला मालक कोण, हा प्रश्‍न त्यांनाही पडला.

गावातल्या एका शहाण्या मनुष्याने आपला स्वतःचा उंट या कळपात मिसळला. गावातील लोक म्हणालेसुद्धा की ‘‘तुम्ही का हो गमावता तुमचा उंट?’’ पण तो म्हणाला, ‘‘आपल्याला प्रश्‍न सोडवायचा आहे ना? माझी तयारी आहे. माझी हरकत नाही.’’ अठरा उंटांपैकी अर्धा भाग म्हणजे नऊ उंट मोठ्याला. तिसरा भाग म्हणजे सहा उंट मधल्याला व नववा भाग म्हणजे दोन उंट धाकट्याला देण्यात आले. नऊ अधिक सहा अधिक दोन म्हणजे सतरा झाले. शहाण्या मनुष्याला त्याचा उंट परत मिळाला. ही कथा सांगून मोरारीबापू सांगतात, की आपला उंट टाकायची तयारी असेल, तरच प्रश्‍न सुटतील. श्रेयही मिळेल आणि उंटही परत मिळेल. पण तो उंट़  टाकायची तयारी हवी ना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com