जाणिजे यज्ञकर्म

जाणिजे यज्ञकर्म

लहानपणी जेवणापूर्वी श्‍लोक म्हणण्याची पद्धत होती. त्यात ‘‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’’ अशी एक ओळ होती. वडीलमंडळींचा आग्रह म्हणून अथवा सभोवतीचे वातावरण तसे आहे म्हणून श्‍लोक म्हटला जायचा. तरीही ‘जेवणाचा यज्ञाशी काय संबंध आहे हो,’ असा प्रश्‍न मनात यायचाच. नंतर कळले की निसर्ग हे अव्याहतपणे चालणारे चक्र आहे. निर्मिती, स्थिती-लय-पुनर्निमिती... हा त्याचा क्रम आहे. मनुष्य जगतो म्हणजे सृष्टी वापरतो. अन्न, वस्त्र, निवारा... हे सृष्टी वापरणे आहे. प्राणीसुद्धा सृष्टी वापरतात.

वनस्पती वापरतात. निसर्गाची झीज सतत होत राहते. निसर्ग-निसर्गाच्याच क्रमानुसार चालला, तर ती झीज-भरपाई होत राहते. हे आपोआप होते. पण मनुष्य निसर्गक्रमानुसार चालत नाही. तो सृष्टी ओरबडतो. आवश्‍यकतेपेक्षा जास्त वापरतो. त्याला त्याचे उत्तरदायित्व लक्षात राहावे म्हणून यज्ञ-विधी उदयास आले. निसर्गाची झीज भरून काढण्याची प्रक्रिया म्हणजे यज्ञ. हवा उच्छ्वासाने प्रदूषित होते. शुद्ध तूप जाळून शुद्ध होते. म्हणजे यज्ञ...

यज्ञाबरोबरच ‘दान’ पण येते. निसर्गाकडून- समाजाकडून आवश्‍यकतेपेक्षा खूप अधिक घेतले, अथवा कमावले म्हणा, त्याचा ढीग झाला. तो गरजूंना देऊन संतुलन साधणे म्हणजे यज्ञ! याचा उदरभरणाशी काय संबंध...? आपण आपली शारीरिक ऊर्जा विविध कामांसाठी वापरली. ती अन्नातून प्राप्त होते. म्हणून अन्नग्रहण हा एक प्रकारचा यज्ञ म्हटले आहे.

परवा सद्‌गुरु जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. त्यांनी सुबोध भाषेत सांगितले. हे जोपर्यंत केळे खाल्ले नाही, तोपर्यंत ते केळे आहे. एकदा खाल्ले, की केळ्याचे तुझ्यात रूपांतर झाले. आता केळे कुठे आहे? आता ते ‘तू’ झाले आहे. बाहेर होते तोवर वरण, भात, भाजी, पोळी.. होते. जेवण झाले. ते अन्न आता ‘तू’ झाले आहे. अन्नाला तुझ्यात रूपांतरित करण्याची प्रक्रिया हा यज्ञ आहे. म्हणूनच अन्न पचण्यासाठी स्रवणाऱ्या रसांना ‘जठराग्नि’ म्हणतात. यज्ञ आहे म्हणजे अग्नि असायलाच हवा अशी ही एक उच्च पातळीवरील आध्यात्मिक क्रिया आहे. पूर्वी अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने ते वाया घालविणे म्हणजे ‘पाप’ लागते अशी भावना होती.  ‘एका वेळी एक काम मन लावून केले, की ते चांगले होते’, या बाबतीत कुणाचेही दुमत नाही. 

भोजन हा आपल्या आहाराचा भाग आहे. त्याचबरोबर पाहणे, ऐकणे, अनुभवणे, श्‍वास घेणे, विचार करणे हा सुद्धा आहाराचाच भाग आहे. आहार घेताना टीव्ही पाहिला, तर टीव्हीवरील घटना आपल्या व्यक्तित्वात शिरतात. त्या आपल्या वागण्यात अभिव्यक्त होतात. आजकाल माणसे विनाकारण अस्वस्थ, चिडचिडी, निराश, संतापी, घाबरट, संशयी, कपटी का होतात? हे त्यांनी आहारासोबत टीव्हीतून ग्रहण केलेले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com