दुधावरची साय (परिमळ )

tenderness
tenderness

लहानपणी एक गोष्ट वाचली होती. लेखकाचे नाव नक्की आठवत नाही. त्या गोष्टीत आजी आणि तिच्या नातीमधील हृद्य नातेसंबंधाचे चित्रण होते. गोष्टीच्या शेवटी आजी नातीला प्रेमभराने, "माझी दुधावरची साय ती' असे म्हणून कुशीत घेते. त्या वेळी मला सायीच्या उपमेचा अर्थ उमगला नव्हता. कारण मला व्यक्तिशः साय मुळीच आवडत नाही. त्याबद्दल मी आईची बोलणी खाल्ली आहेत. लहानपणीच, रामाला शिक्षणासाठी पाठविण्याच्या प्रसंगाचे, "कौसल्या विनवी धरुनी ऋषींचे पाय, द्या माझ्या रामाला साखर साय' असे काव्य वाचनात आले. ते ऐकल्यावरही मला कसेसेच झाले होते. पुढे सायीसाठी "मलई' आणि "क्रीम' हे शब्द शिकलो आणि साय ही उपमा चांगल्या- तत्त्वज्ञानाच्या भाषेत शिव- अशा गोष्टींसाठी योजली जाते हे समजले.

आजी आणि नात यांच्या नातेसंबंधाला जो हृद्य पोत आहे, तो आजी आणि नातू यांच्या नातेसंबंधाला नाही. आजोबा आणि नातू यांच्या नातेसंबंधाला तर मुळीच नाही. नातवाचा संदर्भ आला की "वंशाचा दिवा' वगैरे पुटे चढायला लागतात. आजी, मुलगी आणि नात या श्रेणीला विशेष अर्थ आहे. वंशसातत्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचा सहभाग असावा लागतो हे खरे आहे; पण पुरुष नवनिर्मितीच्या प्रक्रियेमधील सुख स्त्रीबरोबर शेअर करतो, तसा त्यामधील दर्द कधीच शेअर करू शकत नाही, त्याची तशी इच्छा असली तरी. हा लाभ का तोटा? नवनिर्मिती आणि वेदना यांचे अतूट नाते असते. निसर्गाने नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील वेदनांचे सुख अनुभवण्याचा एकाधिकार स्त्रीला बहाल केला आहे. अग्नीचा सामना केल्याशिवाय दुधावर साय जमत नाही. प्रसूती ही अग्निपरीक्षाच असते, नव्हे काय? वेदनांचे मोजमाप करणे अवघड असते; पण वेदनांच्या तौलनिक उतरंडीमध्ये प्रसूतिवेदना या सर्वोच्च स्थानी गणल्या जातात. माझे वडील डॉक्‍टर आहेत. त्यांचे प्रसूतिगृह होते. आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो. प्रसूतिवेदनांमुळे माउल्यांचा आक्रोश आणि दायांचे "अगं, होतीस तू आता. थोडी कळ काढ' असे धीराचे शब्द आम्हा भावंडांना ऐकू येत. असाही एक समज होता, की नवऱ्याला शिव्याशाप दिल्याने वेदना कमी होतात. त्यानुसार बाळंत होणाऱ्या स्त्रीने नवऱ्याच्या नावाने फोडलेले खडेही ऐकू येत.
"माझी दुधावरची साय' या उद्गारांमागे हे महाभारत असते. ही उपमा ज्या काळात रूढ झाली त्या काळात स्त्रियांना या अग्निदिव्याला एकदा, दोनदा नव्हे, तर अनेकदा सामोरे जावे लागायचे. आपल्या नातीला, "अगं, सोळा बाळंतपणं झाली माझी..' या शब्दांत आजीबाई धीर द्यायच्या. माझ्या एका मैत्रिणीने तिचा, तिच्या मुलीचा आणि नातीचा असा एकत्र फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न स्मितहास्य होते. त्याच्या मागचे कारण मला या क्षणी कळते आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com