कुणाचे काय, तर कुणाचे काय! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 16 मार्च 2017

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके १९३८ माघ कृष्ण शुध्द तृतीया.
आजचा वार : भेंडीगवार.
आजचा सुविचार :
शिमग्याच्या मिषें। पालथी गा मूठ।
बाकी लयलूट। होत आहे।।
देवा नारायणा। नको मला दिल्ली।
गल्लीतली बिल्ली। गल्लीतचि ठेवा।।

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके १९३८ माघ कृष्ण शुध्द तृतीया.
आजचा वार : भेंडीगवार.
आजचा सुविचार :
शिमग्याच्या मिषें। पालथी गा मूठ।
बाकी लयलूट। होत आहे।।
देवा नारायणा। नको मला दिल्ली।
गल्लीतली बिल्ली। गल्लीतचि ठेवा।।
नमो नम: नमो नम: नमो नम: (१०५ वेळा लिहिणे.) कालच्या धुळवडीच्या दिवसापासून घरातच आहे. कुठेही बाहेर गेलो नाही. आम्ही बाहेर पडलो रे पडलो की आमच्यावर रंगांचे फुगे मारायचे आदेश आमच्या बांदऱ्याच्या ‘काही’ मित्रांनी दिल्याचे कानावर आले होते. त्यांना गंडवले!! जाम बाहेर पडलोच नाही. शेवटी एकमेकांवर फुगे मारून आपापल्या घरी गेले, असे कळले!! असो.

कुणाचे काय तर कुणाचे काय!! एकासाठी जे विष, ते दुसऱ्याचे अन्न असते, असे म्हणतात. (किंवा उलटे!) आमचे तस्सेच झाले आहे. तसा नागपूरचा माणूस प्रचंड आशावादी असतो, हे आता (तरी) महाराष्ट्राला कळून चुकले असावे. कितीही संकटे आली, तरी नागपुरी गृहस्थ ‘हे येवढे टळले की पुढे आरामच आहे’ असे मनाशी घोकत असतो. मी त्याला अपवाद नाही. कार्पोरेशनच्या निवडणुकांनंतर सारे काही आलबेल होईल, निवांत गप्पा मारत बसता येईल, असे वाटले होते. पण नाही... दिवाळीनंतर लागलीच शिमगा करण्याची पाळी आली आहे. गेले दोन दिवस फोन बंद करून बसलो आहे. साधा टीव्ही लावण्याचा धीर होत नाही. उद्या सकाळी पेपर टाकू नका असा निरोप काल रात्रीच धाडून दिला होता. 

आमच्या पोटात हा असा गोळा येण्याचे कारण आमचे गोव्याचे मित्र मनोहरबाब पर्रीकरजी!! दिल्लीच्या पराठ्यांपेक्षा आमच्या गोंयचे माशे बरे, असे सारखे पुटपुटत होते. शेवटी त्यांनी डाव साधलाच. संरक्षण खाते दिले सोडून आणि पुन्हा पणजीत जाऊन बसले!! (त्यांना ओआरओपी दिली पाह्यजेल!) मागल्यावेळेला भेटले होते तेव्हा मला म्हणाले होते, ‘‘मी परत गोव्याला जातो. मी लष्कर सोडणार!’’ मी म्हटले, ‘‘असं करू नका... कोर्टमार्शल होईल! लष्करातून पळ काढणाऱ्याच्या मागे पोलिस लावतात!’’ पण त्यांनी ऐकले नाही. परत गेले!! तेही अगदी राजरोस, विदाऊट कोर्टमार्शल!! 

तिथे गोव्यात आमच्या पर्रीकरजींनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि इथे आमच्या पोटात गोळा आला. पर्रीकर पणजीत पळाले, तेव्हापासून माझे नाव उगीचच संरक्षणमंत्रिपदासाठी सोशल मीडियावर फिरते आहे. हे काय भलतेच? आमची लौकरच लष्करात भर्ती होणार आणि आमचे चंद्रकांतदादा कोल्हापूरकर महाराष्ट्राचे सीएम होणार, असे मेसेज व्हॉट्‌सॲपवर कालपासून फिरत आहेत. मला मेसेज आल्यावर लागलीच मी फोन बंद करून टाकला. गप्प बसून राहिलो होतो, तेवढ्यात चंदुदादा आले. उगीच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. मग त्यांनी हळूचकन विषय काढला. ‘‘दिल्लीहून काही फोनबिन?’’

‘‘छे, कुठे काय? माझी ब्याटरी डाऊन आहे!’’ मी ठोकून दिले.
‘‘तुमचं मिलिटरीत जाण्याचं चाललंय, असं ऐकलं!’’ दादा म्हणाले.
...बाप रे!! ह्यांनीच तर हे मेसेज सोडले नसतील? मी आणि मिलिटरीत? लष्कराच्या रणगाड्यात बसून बंदूक परजत मी मोहिमेवर निघालो आहे, असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. अंगावर शहारा आला. शिवाय मला बोट लागते आणि लढाऊ विमानाच्या कसरती बघताना चक्‍कर येते!!
‘‘दादा, हे साफ खोटं आहे. वावड्यांवर विश्‍वास ठेवू नका. मी आहे तिथेच राहणार आहे. कळलं?’’ मी ठामपणाने म्हणालो.
‘‘...मग मीसुद्धा!’’ ते खोल आवाजात म्हणाले, आणि जड पावलांनी निघून गेले. म्हटले ना, कुणाचे काय, तर कुणाचे काय!!