लढा! (ढिंग टांग)

लढा! (ढिंग टांग)

(राजाधिराज उधोजीराजे अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. मधूनच तलवारीचे हवेत हात करतात. ‘बघतोच तुला आता!’, ‘अरे मी दोर कधीच कापून टाकलेत!’ ऐशा घोषणा करत कुण्या अदृश्‍य गनिमावर चालून जात आहेत. मध्येच स्टुलावर मटकन बसून ‘अहह! काय हा शाप!’ असे विव्हल उद्‌गार काढत आहेत. अब आगे...)

उधोजीराजे : (खोल आवाजात) कोण आहे रे तिकडे? अरे, कुणीतरी पाणी आणा रे!
मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने येत) मुजरा म्हाराज! (वाटी पुढे करत) पाणी म्हाराज!
उधोजीराजे : (खवळून) दाढी करायला पाणी आणलंस? घशाला कोरड पडली म्हणून प्यायला पाणी मागत होतो आम्ही!! कुणी केलं रे तुला फर्जंद?
मिलिंदोजी : (नम्रपणे) आपनच म्हाराज! पन घशाला कोरड पडूस्तवर कशापायी बोंबलाबोंबली करायची म्हंतो मी! नका येवडा जीवाला तरास करून घेऊ!  
उधोजीराजे : (अस्वस्थ होत)...ह्या शेतकरी बांधवांसाठी आमचा जीव तीळतीळ तुटतो! त्यांच्या विचारात आम्हाला रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही!! त्यांच्यासाठी आम्ही जीवाला त्रास करून घ्यायचा नाही तर मग कोण घेणार? त्यांच्यासाठीच आम्ही तलवार हाती घेतली असून, युद्धाची प्रॅक्‍टिस सुरू केली आहे!!
मिलिंदोजी : (दोन्ही हात पाठीमागे बांधत) अशानं घसा बसंल पर्मनंट!!
उधोजीराजे : (दुर्लक्ष करत) फर्जंदा, ह्या शेतकऱ्यांसाठी आमचं एक मन रडतं, दुसरं चिडतं! त्याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे!! 
मिलिंदोजी : (नकारार्थी मान हलवत) सरकारी तिजोरीत दातावर माराया दमडा उरल्याला नाही! आधीच कर्ज झालंय!! 
उधोजीराजे : (चेवात येत) ते आम्हाला माहीत नाही!! त्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं, आणखी कर्ज काढा आणि शेतकऱ्यांना पैसे द्या!!
मिलिंदोजी : (ठेंगा दाखवत) कोन देयाला बसलंय कर्ज? ब्यांका म्हनतात, आधी तारन ठिवा!! तीस हज्जार कोट रुप्पय आननार कुटून, म्हाराज? काय चेष्टा आहे, व्हय!!
उधोजीराजे : (उत्तरेकडे बोट दाखवत) मग आत्ताच्या आत्ता पंतप्रधानांकडे जा आणि पैसे घेऊन या!! 
मिलिंदोजी : (दात कोरत) पंतप्रधान ज्याम बिझी आहेत, असा मेसेज आलाय! सबब, भेट घेने मुस्कील आहे!! नोटाबंदीनंतर दिल्लीत कुनी कुनाला भेटंना झालंय!!
उधोजीराजे : (संतापून) नोटाबंदी, नोटाबंदी, नोटाबंदी!!! ह्या नोटाबंदीनेच सारा घात केला!! आधी नोटाबंदी करून आमच्या रयतेला नाडले! त्यांस रांगेत उभे केले!! आता आमच्या शेतकऱ्यांचा सात-बारा तरी कोरा करा, म्हणोन फर्माविले, तो शहाजोगपणे डोळे फिरवताती!! हा काय न्याय झाला?
मिलिंदोजी : (दात कोरण्यापलीकडून एक अर्थपूर्ण उद्‌गार!...) च्युक!!
उधोजीराजे : (निक्षून सांगत) पण गाठ माझ्याशी आहे, म्हणावं! जोवर माझ्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात मिळत नाही, तोवर हा उधोजी तलवार उपसून त्यांच्या संरक्षणार्थ धावून जाईल!! आपले शिलेदार तेथे काय करताहेत? त्यांना म्हणावं, तलवार परजून तयार राहा!! 
मिलिंदोजी : (मुंडी हलवत) त्यांच्याकडून काही हुईत नाही, म्हाराज! निस्तं वरडत्यात, आनि थितं जाऊन मुख्यमंत्र्यांबरुबर चहा-बिस्कुट खाऊनशेनी परत येत्यात! आपले सैनिक लई नाराज हायेत आपल्याच शिलेदारांवर!!
उधोजीराजे : (हताश होत) काहीच होत नाही म्हणतोस? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काहीच मार्ग उरला नाही?
मिलिंदोजी : (समाधानानं) अक्षी बरुब्बर! आत्ता तुमची ट्युब पेटली बघा!!
उधोजीराजे : (खोल आवाजात) मग ही तलवार ठेव! आणि आमचा कॅमेरा आण बरं!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com