पुन्हा पेंग्विन! (ढिंग टांग! )

ब्रिटिश नंदी 
सोमवार, 20 मार्च 2017

स्थळ : जिजामाता उद्यान, भायखळा, मुंबई. 
वेळ : मॉडेलिंगची. 
प्रसंग : स्पेशल फोटोशूट. 
पात्रे : डॉनल्ड, डेझी, पॉपआय, ऑलिव्ह, बबल, फ्लिपर आणि मोल्ट....यांच्यासोबत अर्थात ख्यातकीर्त निसर्ग छायाचित्रकार यूडी थॅकरे आणि त्यांचे असिस्टंट ऍडीबॉय!! 

स्थळ : जिजामाता उद्यान, भायखळा, मुंबई. 
वेळ : मॉडेलिंगची. 
प्रसंग : स्पेशल फोटोशूट. 
पात्रे : डॉनल्ड, डेझी, पॉपआय, ऑलिव्ह, बबल, फ्लिपर आणि मोल्ट....यांच्यासोबत अर्थात ख्यातकीर्त निसर्ग छायाचित्रकार यूडी थॅकरे आणि त्यांचे असिस्टंट ऍडीबॉय!! 

ऍडी : (उत्साहात मोठ्याने) बॅब्स...वेलकम टु माय ड्रीम प्रोजेक्‍ट! पेंग्विन इन द झू!! दक्षिण कोरियातून खास आणलेले हे पक्षी आहेत! 
यूडी : (गोंधळलेल्या अवस्थेत) पण तू मला इतक्‍या रात्री इथं का आणलंयस? 
ऍडी : (स्तुतिसुमनं उधळत) कमॉन बॅब्स...तुम्हाला नाही तर कोणाला धरून आणणार? तुमचा हात धरणारा निसर्गछायाचित्रकार आख्ख्या होल वर्ल्डमध्ये नाही!! मागल्या खेपेला आपण ध्रुव प्रदेशातल्या पोलार बेअर...आय मीन...पांढऱ्या अस्वलांचे काढलेले फोटो जगभर गाजताहेत अजून!! 
यूडी : (चुळबुळत) हो, पण त्याचा इथं काय संबंध? 
ऍडी : (खुलासा करत) बॅब्स, यू आर नंबर वन नेचर फोटोग्राफर!! इन फॅक्‍ट, फोटो काढावेत तर यूडी थॅकरे ह्यांनीच, असा बर्फाळ प्रदेशातल्या प्राण्यांमध्ये बोलबाला आहे!! सबब, तिथले काही बर्फाळ प्राणी इथं खास फोटो शूटसाठी आले आहेत!! सो, बॅब्स...इट्‌स ऍन असाइनमेंट!! 
यूडी : (वैतागून) अरे, जिजामाता उद्यान आहे हे! इथे कुठले बर्फाळ प्राणी? 
ऍडी : (काचेच्या पिंजऱ्याकडे बोट दाखवून) इकडे बघा!! टॅणाटॅणाऽऽऽ...!! 
यूडी : (काचेआड पाहात) इथं तर काही दिसत नाही!! पाणी भरलंय फक्‍त त्या टबात!! 
ऍडी : ("सबुरी'चा सल्ला देत) जस्ट वेट!! इथं आता काही मॉडेल्स येतील!! त्यांचं फोटोशूट करायचंय? तुम्ही कॅमेरा-बिमेरा ऍडजस्ट करा!! येतीलच इतक्‍यात!! ओके? 
यूडी : (खचलेल्या आवाजात) दिवसा केलं फोटोशूट तर नाही का चालणार? 
ऍडी : (निक्षून सांगत) नोप! दिवसा शंभर रुपये तिकीट पडेल!! 
यूडी : (खोल आवाजात) कुणाचे फोटो काढायचेत? वाघबिघ नाहीत ना? 
ऍडी : (आनंदाने चित्कारत) और ये आ गए!! देखिए, बर्फीली दुनिया का नजारा!! पेंग्विन, पेंग्विन, पेंग्विन!! 
यूडी : (थक्‍क होत) हे खरे आहेत की लोणावळ्याच्या मेणबाहुल्यांसारखे? 
ऍडी : (अभिमानाने) अगदी हंड्रेड पर्सेंट खरे!! त्यांना दक्षिण कोरियाहून आणण्यासाठी आपल्या मुंबई महापालिकेनं कोट्यवधी रुपये मोजले आहेत!! 
यूडी : (कपाळाला हात लावत) कशाला इतका खर्च! छे!! 
ऍडी : (काचेपलीकडल्या सात पेंग्विनकडे बघून) हा डॉनल्ड, ही डेझी, हा ऑलिव्ह, ही बबल, हा पॉपआय, हा मोल्ट आणि हा वेडा फ्लिपर!! 
यूडी : (कॅमेरा सावरत) शूऽऽ...हळू!! उडून जातील ना ते पेंग्विन!! 
ऍडी : (खळखळून हसत) हाहा!! बॅब्स...तुस्सी ग्रेट हो!! पेंग्विनला उडता येत नाही!! डोण्ट वरी!! 
यूडी : (बुचकळ्यात पडत) मग त्यांना पिंजऱ्यात कशाला ठेवलंय? 
ऍडी : (सावधगिरीचा इशारा) आपल्याकडे कोंबडीवालेसुद्धा कोंबड्या पिंजऱ्यात ठेवतात. का विचारा? 
यूडी : (बळेबळे) का? 
ऍडी : (विनोद करत) त्यांनी लंगडी घालू नये म्हणून!! हाहा!! अहो, पिंजरा हे त्यांचं प्रोटेक्‍शन आहे! नाहीतर लोक शंभर रुपयांत उचलतील, ब्रायलर कोंबडीसारखे!! हाहा!! 
यूडी : (नाक मुरडत) सगळे एकजात वेटरसारखे कोट घालून आलेत!! एखादा चुकून स्वीट कॉर्न चिकन सूपची ऑर्डर देईल ह्यांना बघून!! हॅ:!! 
ऍडी : (समजावून सांगत) कोट नाहीए तो बॅब्स!! त्यांचे पंखच तसे असतात!! 
यूडी : (नाराजीने) पण ह्यांची नावं इंग्रजी का? मऱ्हाटी का नाहीत? 
ऍडी : (खांदे उडवत) उत्तर सोपं आहे!! ते "ओ' देत नाहीत म्हणून!! हाहा!! (पेंग्विनना फर्मावत) ए, साहेबांना "हाय' म्हणा रे!! 
पेंग्विन : (सप्तसुरात) हर हर हर हर महादेऽऽऽव!! 

Web Title: Editorial dhing tang