अंतस्वर! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 5 एप्रिल 2017

देवघराच्या दारापाशी
एक सावली थरथरली
फडफडणाऱ्या निरांजनाची
ज्योत अखेरी अन्‌ विझली

शांत धरित्री, शांत निशा ती
अवघे विश्‍वचि शांत जाहले
सप्तसुरांच्या मेण्यामधुनी
एक चांदणे दूर निघाले

मरुभूमीतील आवर्ताने
घेत मनस्वी एकच गिरकी,
जणू उचलली खांद्यावरती
सप्तसुरांची एक पालखी

अस्तित्वाचा पदर सुटे हा
दहिवराला गहिवरले
काळोखाच्या आक्रमणाने
स्वप्नचांदणे अवघडले

तिथे थांबले होते आणिक
चैत्रामधले पिवळे ऊन
किंवा होते आषाढातील
मेघाचे अडलेले मौन

देवघराच्या दारापाशी
एक सावली थरथरली
फडफडणाऱ्या निरांजनाची
ज्योत अखेरी अन्‌ विझली

शांत धरित्री, शांत निशा ती
अवघे विश्‍वचि शांत जाहले
सप्तसुरांच्या मेण्यामधुनी
एक चांदणे दूर निघाले

मरुभूमीतील आवर्ताने
घेत मनस्वी एकच गिरकी,
जणू उचलली खांद्यावरती
सप्तसुरांची एक पालखी

अस्तित्वाचा पदर सुटे हा
दहिवराला गहिवरले
काळोखाच्या आक्रमणाने
स्वप्नचांदणे अवघडले

तिथे थांबले होते आणिक
चैत्रामधले पिवळे ऊन
किंवा होते आषाढातील
मेघाचे अडलेले मौन

अभिजाताच्या ओढीमध्ये
उभा अंगणी प्राजक्‍त
आणि जुईच्या वळेसराला
कवठीचाफा आरक्‍त

एक तंबुरी वाळुत पडली,
कृष्णपदांचे दोन ठसे
क्षितीजावरती आभाळाला
श्रीरंगाचे वेडपिसे

जणू विदेही मीरेने मग
आळविला शेवटचा जागर
तिला पालवित मंद हासतो
मीरेचा प्रभु गिरीधर नागर

चैत्रामधल्या प्रहरटळीला
प्राजक्‍ताचा अडके श्‍वास
कसा अवेळी घमघमला अन्‌
सूर उमटला जसा बिभास

काळोखातच मंद कोंदला
दर्वळवेडा निश्‍चल धूप
पहाटवाऱ्यावरती अवचित
उंबरठ्यावर उगवे भूप

दार उघडता कुणी सहेला
ओठंगुनी अन्‌ उभा तिथे
खांद्यावरचे उजळ उपरणे
उगाच तेथे कोसळते

विठ्ठल केला, विठू पाहिला
विठ्ठल झाला जीवभाव
रंग एकचि अवघा झाला
पुन्हा तयाचे विठ्ठल नाव

शुद्ध भेटते विशुद्धतेला
तेव्हा दैवे उलट घडे
वीणेमधल्या कणस्वराला
झंकाराचे स्वप्न पडे
 अशा अवेळी टपटपलेल्या
प्राजक्‍ताची अश्रुफुले
अशा अवेळी काकड वेळी
गर्भगृहाचे दार खुले

अशा अवेळी देवघरातच
एक सावली थरथरली
फडफडणाऱ्या निरांजनाची
ज्योत अखेरी अन्‌ विझली

शांत धरित्री, शांत निशा ती
अवघे विश्‍वचि शांत जाहले
सप्तसुरांच्या मेण्यामधुनी
एक चांदणे दूर निघाले...

Web Title: editorial dhing tang