...भाकरी गेली उडत! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 8 एप्रिल 2017

स्थळ : मातोश्री -१, वांद्रे.
वेळ : न आलेली.
काळ : आलेला!
प्रसंग : अवघड.
पात्रे : आपल्या सर्वांचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.

स्थळ : मातोश्री -१, वांद्रे.
वेळ : न आलेली.
काळ : आलेला!
प्रसंग : अवघड.
पात्रे : आपल्या सर्वांचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.

विक्रमादित्य : (अत्यंत अवखळ उत्साहात) हाय देअर, बॅब्स..! मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (ब्याग भरता भरता) नको! 
विक्रमादित्य : (तरीही आत घुसत) का? व्हाय? क्‍यों? मुझे आनाही पडेगा!!
उधोजीसाहेब : (सामान भरण्यात मग्न..) कारण मला खूप घाई आहे! मला वेळ नाही तुझ्याशी बोलत बसायला!! (गाणं गुणगुणत) दुखी मन मेरे सुन मेरा केहना, जहां नहीं चैना, वहां नहीं रेहना...
विक्रमादित्य : (विषयाला हात घालत) बॅब्स...गाणं म्हणू नका ना प्लीज! मघाशी आपल्या पक्षाचे काही आमदार आले होते! खांद्यावर टॉवेल टाकून! मला म्हणाले, खांदेपालटासाठी आलो!! खांदेपालट म्हंजे काय असतं हो बॅब्स? 
उधोजीसाहेब : (ब्यागेत वस्तू कोंबत)...नसत्या चौकशा आहेत तुला!! तू तुझं सामान भर बरं! आपल्याला लग्गेच निघायचंय!!
विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) कुठे?
उधोजीसाहेब : (घाईघाईत) परदेश दौऱ्यावर!
विक्रमादित्य : (उजळ चेहऱ्यानं) वॉव! विमानानं?
उधोजीसाहेब : (दाढीचं सामान ब्यागेत आठवणीनं टाकत) होय! नाही तर काय जहाजानं? होड्या वल्हवत कुणी जातं का आता?
विक्रमादित्य : (निरागसपणाने) पण आपल्याला विमान अलाऊड आहे का? मी ऐकलं की हल्ली आपल्याला तिकीट नाही देत ते लोक! आपले ते एक काका काल दिल्लीला गेले, तर पायातले सॅंडल काढून मगच विमानात चढा, असं सांगितलं म्हणे त्यांना!!
उधोजीसाहेब : (झटकून टाकत) अफवा आहेत त्या!!
विक्रमादित्य : (काळजीपोटी) आपल्याला विमानात घेतील ना बॅब्स?
उधोजीसाहेब : (प्रयत्नपूर्वक शांत राहात) अजून तरी आपल्याला विमानप्रवास अलाऊड आहे! तेवढ्यात आपण जाऊन येऊ! तू बॅग भर, जा!!
विक्रमादित्य : (बुचकळ्यात पडत) पण गेल्या आठवड्यात तुम्ही म्हणाला होतात, की यंदा नो फॉरेन ट्रिप! इथंच तुम्हाला भाकरी फिरवायची आहे म्हणून!
उधोजीसाहेब : (कपाटात काहीतरी शोधत) भाकरी-बिकरी गेली उडत! आपण निघूया!!
विक्रमादित्य : (निरागसपणा...तुझे नाव विक्रमादित्य!!) भाकरी नाही काही उडत!! आपण उडत जायचंय...असंच ना?
उधोजीसाहेब : (संयम बर्करार ठेवून) बॅग भरतोस का बाळा आता!! भाकरी फिरवण्याचा विषय आता यापुढे बंद! आपल्या सगळ्या लोकांना मी हे सांगून टाकलं आहे...पुन्हा भाकरी फिरवण्याचा विषय काढलात, तर चटके देईन म्हणून! तुलाही तेच सांगतोय!!
विक्रमादित्य : (मूळ मुद्‌द्‌यावर येत) मघाशी देवेंद्र अंकलचा फोन आला होता! भाकरी फिरवण्याचं कुठपर्यंत आलं, असं तुझ्या बाबांना विचार, असं ते सांगत होते!! त्यांनाही चटके देणार?
उधोजीसाहेब : (संतापून) सोडतो की काय!! त्यांना म्हणावं तुम्हाला काय करायचंय? आम्ही घोडा फिरवू, नाहीतर भाकरी फिरवू!!
विक्रमादित्य : (च्याट पडत) घोडा?
उधोजीसाहेब : (कळवळून) होय घोडाच...घोडा, पानं...काय वाट्टेल ते फिरवू म्हणावं! तू आता बॅगा भरायला जा बघू! आपलं विमान चुकेल!!
विक्रमादित्य : (मुद्दा आणखी रेटत) मग आता आपण काय फिरवणार?
उधोजीसाहेब : (निर्णायक सुरात) क्‍यामेरा हीसुद्धा फिरवायचीच गोष्ट आहे! कळलं? जय महाराष्ट्र!!

Web Title: editorial dhing tang