नारायण पासष्टी (ढिंग टांग)

नारायण पासष्टी (ढिंग टांग)

पहिल्याछूट आम्ही आमचे अत्यंत लाडके परममित्र जे की नारोबादादा राणेजी ह्यांना हॅपी बर्थ डे जाहीर करतो आणि आमचे परंप्रिय दादा पासष्ट वर्षांचे झाले, अशी धादांत खोटी आवई कोणीतरी उठवली, त्याचाही (त्याच सुरात) निषेधही करतो. हे काम कांग्रेसवाल्यांचेच असले पाहिजे, ह्याबाबत आमच्या मनात शंका नाही. आवशीक खाव, आमचे दादा फकस्त चौसष्ठ आहेत...उगीच काय वय वाढवून सांगायचे? असो. दादांचा दोस्ताना अफाट. अनेकांना त्यांनी पोटाशी घेतले, पोटाला लावले! अनेकांचे अपराध पोटातही घेतले. (आम्हीही त्यातलेच!) म्हणूनच त्यांच्या नारायणपासष्टीला महाराष्ट्रभर उत्सव साजरा होत आहे. त्यांच्यासारखा कोकणी बाण्याचा माणूस इतका जनसंग्रह कसा काय करू शकतो, ह्याचे अनेकांना आश्‍चर्य वाटते; पण आम्हाला नाही. कारण आम्ही अंतर्बाह्या ‘त्यांचे’ आहो!! दादांच्या वाढदिवसाचा शानदार कार्यक्रम रविवारीच मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. सदर केक-कटाई कार्यक्रमास नागपूरकर नितींजी, सोलापूरकर सुशीलकुमार्जी, सांगलीकर जयंत्रावजी असे खासे खासे लोक उपस्थित होते. (जयंत्राव तर दादांनीच शिवलेला कोट घालून आले होते.) आम्हाला ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे काही अपरिहार्य कारणाने जमले नाही. हे अपरिहार्य कारण म्हंजे बोलावणे न येणे हे होय!! आता बोलावल्यावाचून आम्ही कोठेही जात नाही, हे आमच्या वाचकांना माहीत आहेच. त्यामुळे तेथे न जाता आम्ही सरळ जुहू येथील नारोबादादांच्या नव्याकोऱ्या बंगल्याकडे मोहोरा वळवला. तेथील बंगल्याच्या शानदार फुलबागेत दादा बागकाम करताना दिसले. ‘‘शतप्रतिशत प्रणाम, दादा!’’ आम्ही. आम्हाला बघून चमकलेल्या दादांनी अचानक शेजारी पडलेला एक दगड उचलला. ही प्रतिक्रिया आम्हाला तशी नित्याची आहे. असो. ‘‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!’’ झेंडूचे एक फूल पुढे करून आम्ही बहुत आदरेकरोन म्हणालो. दादांनी संशयाने फूल स्वीकारले. ‘‘आमच्याच बागिच्यातला नाय ना?’’ दादांनी संशयाने फूल निरखत विचारले. आम्ही ‘छे छे’ असे म्हणत दोन्ही गालांवर बारक्‍या चापट्या मारून घेतल्या. त्यांनी आम्हाला ‘जा’ अशी खूण केली. ‘‘कालचा कार्यक्रम जोरदार झाला ना?’’ आम्ही विषय काढलाच. ‘‘आवशीक खाव, आदी भाएर हो! कपाळ नुसता उसळलाहा!! दादा अभ्यासू, दादा आक्रामक, दादा यंव, दादा त्यंव!! दगड नि धोंडे!! तीन वरसां इरोधी बाकड्यावर बसान जीव कंटाळलो निसतो!! दुर्दैवाचे दशावतार म्हणतंत, ते ह्येकाच!! आमच्या मोचेमाडकराक पण असो खेळ जमाचो नाय!! मनात येयत तां घडात, तर दळिदार कशाक पडात?’’ हातातले खुरपे खाली टाकत दादा म्हणाले. ...आम्ही च्याटंच्याट पडलो! रवींद्रच्या बर्थडे पार्टीत इतके खुशमिजाज दिसलेले आमचे दादा आज इतके रागावलेले कां बरे दिसत आहेत? ह्या पार्टीत सर्वांनी त्यांच्यावर इतकी स्तुतिसुमने उधळली होती, की त्यातलेच एक झेंडूचे फूल उचलून आम्ही येथे आणू शकलो होतो. ‘‘अहो, असे का म्हंटा? काल सर्वांनी आपल्यावर स्तुतिसुमनं उधळली! नितीनभाऊंनी तर कमालच केली. पण त्यात काही राजकारण नाही ना, दादा?’’ आमचा सवाल पुरा होण्याआधी आलेला दगड आम्ही शिताफीने हुकवला. ‘‘आमची पवित्र मैत्री आसा, पवित्र! काय कळलां? हो भाएरा..,’’ डोळे गरागरा फिरवत दादांनी आम्हाला दमात घेतले. वास्तविक नितीनभाऊ आणि नारोबादादांची मैत्री गंगेहून पवित्र असल्याचे आम्हाला पहिल्यापासूनच मान्य आहे; पण ह्या दोघांच्या मैत्रीचा चंबू कमळ पार्टीच्या घंगाळात (एकदाचा) उपडी झाला तर अवघे घंगाळ गंगेवाणी पवित्र होईल, अशी आमची निस्सीम श्रद्धा आहे. दादांचे व्यक्‍तिमत्त्व असे पवित्र असल्याने ते साऱ्या पक्षांना (कांग्रेस सोडून) हवेहवेसे वाटतात, हे खरे नव्हे काय? ‘‘मग आपण कमळ पार्टीत जाणार, हे खरं मानायचं का?’’ आम्ही शेवटी न राहवून विचारलेच. ‘‘शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार...’’ पुढील वाक्‍ये ऐकायला आम्ही थांबलो नाही...चालायचेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com