लाल दिवा! (ढिंग टांग)

लाल दिवा! (ढिंग टांग)

सर्व मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसाठी-
आपणा सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, आदरणीय प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांच्या नव्या हुकुमानुसार येत्या महाराष्ट्र दिनापासून कुठल्याही मंत्री अथवा सरकारी अधिकाऱ्याला आपल्या मोटारीच्या टपावर लाल दिवा लावता येणार नाही. तसा दिवा आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्लीहून मिळाले आहेत. दिवे लावायचेच असतील तर ते आपापल्या खात्यातच लावावेत, अन्यत्र नको, असा सज्जड इशारा प्राप्त झाला आहे. तेव्हा सर्व सहकाऱ्यांनी पत्र मिळताक्षणी जिना उतरून आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकावा. 

कुणाला काही शंका असल्यास नि:संकोच मुख्यमंत्र्यांच्या विशेष ‘हेल्पलाइन’वर फोन करावा किंवा इमेल अथवा पत्राद्वारे संपर्क साधावा. सर्वांनी सहकार्य करावे. 
आपला. 
नाना फडणवीस.

आदरणीय नानासाहेब, 
आपले पत्र मिळाले. आपल्या सूचनेनुसार मिळताक्षणी ग्यारेजमध्ये जाऊन गाडीवरचा लाल दिवा काढून तो बंगल्याच्या बागेत पुरला. त्यावर बर्मा टीक (एक प्रकारचा साग)चे झाड लावले. हे झाड सरळसोटपणे दहा वर्षात ४५ फूट वाढते. दहा वर्षांनी चांगले उत्पन्न (सरकारला) मिळेल. हे मी वनमंत्री-कम-अर्थमंत्री ह्या नात्याने सांगतो आहे. लाल दिवा गेला. एक पर्व संपले. इस बात पर एक शेर अर्ज है...
दर्दे मुहब्बत ऐसी थी के
आग में राकेल डाल दिया
बुझे न बुझाए आग लेकिन
बुझ गया फिर लाल दिया!!
...कसा वाटला शेर ते उलट टपाली कळवणे! अर्थसंकल्प मांडताना शेरोशायरी करावी लागते. ती एक खोडच लागून गेली आहे. असो. कामाच्या निमित्ताने मला सारखे रानावनात हिंडावे लागते. तिथे लाल दिव्याच्या गाडीकडे बघून कोणालाही फरक पडत नाही, असा माझा अनुभव आहे. साधी हरणेसुद्धा घाबरत नाहीत!! ही कटकट विझल्याचा आनंद वाटतो. आता मी मोकळा श्‍वास घेईन. पुढच्या वेळी आपलाही लाल दिवा जाऊन आपणही मोकळा श्‍वास घ्यावा, ही प्रार्थना. 
आपला. शायर सुधीर्जी मुनगंटीवार, अर्थ व वने.

प्रति श्री आदरणीय नानासाहेब 
यांसी, बालके वीरविनोद ह्याचा सप्रेम. सा. न. आपले पत्र पोचले. परंतु, सध्या परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने मी माझ्या गाडीवरील लाल दिवा आधीच काढून टाकला आहे. लाल दिवा लावून शाळांसमोरून राजरोज जाणे तितकेसे सुरक्षित राहिलेले नाही. जाता जाता एक सूचना : ‘लाल दिव्याचा इतिहास’ हा विषय दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा किंवा कसे? कळावे. आपला. वीर विनोद.

साहेब-
माझ्या सायकलीवरचा दिवासुद्धा ताबडतोब काढून टाकला आहे. कळावे. आपला. चंदुदादा कोल्हापूरकर (सडकवाले.)

नानासाहेबजी, जय महाराष्ट्र. आपल्या पत्राची झेरॉक्‍स काढून ‘मातोश्री’वर पाठवली आहे. त्यांनी हिरवा दिवा दाखवला की लाल दिवा लागलीच काढून टाकीन. तुम्ही सांगता म्हणून नाही!! दुसऱ्याचे दिवे विझवायचे, हे शोभणारे नाही. आपला. (लाल) दिवा कर रावतेजी. 

प्रिय मित्र नानासाहेब-
जय महाराष्ट्र. तुम्हा लोकांचा लाल दिवा गेला, ह्याचा सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल तर तो मला झाला आहे! रिमोट कंट्रोलवाल्यांना हे फार मोठे दु:ख असायचे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या धमक्‍या किंवा लालुचक्‍यांची हवाच निघून गेली आहे. कधीही विस्तार करावा. ज्याच्यासाठी आटापिटा करायचा तो लाल दिवाच गेल्याने कोणीही मागे लागणार नाही! जय महाराष्ट्र. कळावे.
आपला. उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com