लगन की बात! (ढिंग टांग)

लगन की बात! (ढिंग टांग)

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. वेळ : हर हर महादेव!
प्रसंग : समर! दृश्‍य : नेहमीचेच.
पात्रे : राजाधिराज उधोजीराजे आणि सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई.

उधोजीराजे कुठल्याही क्षणी महालात प्रविष्ट होणार आहेत. हातात निरांजनाचं तबक घेऊन कमळाबाई वाट पाहताहेत. तेवढ्यात तुतारी वाजते. हातातल्या लायटरने कमळाबाई निरांजन पेटवतात. राजे आल्या आल्या नेहमीप्रमाणे सतरंजीत अंगठा अडकून धडपडतात. अब आगे... 

उधोजीराजे : (संतापून) हे जाजम इथं हांथरणाऱ्याचा बांदऱ्याच्या सी लिंकवरून तीन वेळा कडेलोट करा!! सहावेळा पंख्याला लटकवून फासावर द्या! नऊ वेळा तोफेच्या तोंडी द्या!!
कमळाबाई : (समजूत घालत) रागेजू नका, राजे! आपल्या चरणकमळाला काटे टोचू नयेत, म्हणून साक्षात कमळाने घातली हो ती सतरंजी! स्वारीला आवडत नसेल, तर लग्गेच काढून टाकायला सांगत्ये!! एखाद्याला गुलाबाची पाकळीच टोंचू लागली, तर माणसानं करायचं तरी काय?
उधोजीराजे : (मवाळ होत) असू दे, असू दे! तुम्ही अश्‍या काळजीकाट्यानं बोलायला लागलात तर आम्ही...आम्ही बाभळीच्या काट्यांवरूनही चालू!! ऐन रणांगणात पेरलेल्या भुईसुरुंगांवरून बेधडक चालू! इतकंच काय, मुंबईतल्या खड्डेयुक्‍त रस्त्यांवरूनसुद्धा चालू!! 
कमळाबाई : (लाजून) इश्‍श!! 
उधोजीराजे : (खुशमिजाज होत) एक माणूस आम्हाला बघून लाजतंय वाटतं! हहह!!
कमळाबाई : (घाईघाईने वाटी उचलत) तुमच्यासाठी खास साजूक तुपातला शिरा केलाय! घ्या!!
उधोजीराजे : (प्रेमभराने) तुम्ही केलात?
कमळाबाई : (निर्विकारपणे) छे, पणशीकरांच्या आरोग्यभुवनात फर्मास बनतो! तिकडून आणलाय!
उधोजीराजे : (खोट्या काळजीनं) मधल्या काळात आपल्यात काहीसा बेबनाव झाला, त्यानं चेहरा किती उतरला तुमचा, कमळाबाई!
कमळाबाई : (पदराशी चाळा करत) काळजीनं काळवंडलाय आमचा चेहरा!! 
उधोजीराजे : (बेफिकिरीने) आम्ही असताना कसली काळजी? तुमची काळजी घ्यायला हा उधोजी समर्थ आहे की!
कमळाबाई : (गवाक्षाकडे पाहात गंभीरपणाने) आपल्या दौलतीवर गंडांतर आलं आहे, राजे! आता तुम्हीच वाचवू शकाल!! 
उधोजीराजे : (कर्तव्यकठोर चेहरा करत) काय झालं? दौलतीच्या चाव्या आपल्या हाती देवोन आम्ही निश्‍चिंत जाहलो. वाटलं होतं, आपल्यासारख्या ज्वलज्जहाल ज्वालेच्या हाती आमची दौलत सुरक्षित राहील!! 
कमळाबाई : (काळजीच्या सुरात ) शत्रूच्या भयानं आम्हाला हल्ली रात्र रात्र झोप लागत नाही! सरहद्दीवर तो मेला धुमाकूळ घालतोय, आणि-
उधोजीराजे : (खाकरत) तुम्हीच उगीच शेफारून ठेवलंत गनिमाला! जिथं तलवारीनं बोलावं, तिथं तुम्ही चर्चेची गुऱ्हाळं घातलीत!! आम्ही तुमच्या ठिकाणी असतो तर ‘मन की बात’ नव्हे, ‘गन की बात’ केली असती!! हा उधोजी तलवार उगारून नुसता उभा राहिला तर हे पापस्थानी ऐन सरहद्दीवर स्वच्छता अभियान छेडायला भाग पाडतील!! आपला खाक्‍याच असा आहे, एक घाव, दोन तुकडे!! शत्रूशी चर्चा करायची नसते, कमळाबाई! आधी मुंडके छाटायचे, मग त्यास विचारायचे, बोल, काय मामला आहे? कळलं? आम्ही अंगावर येतोय हे कळलं तरी शत्रू पीछे हटेल!!
कमळाबाई : (समाधानाने) वाटलंच होतं आम्हाला! मग जाताय ना?
उधोजीराजे : (अचंब्याने) कुठे?
कमळाबाई : (लाडात येत) सरहद्दीवर! दाखवाच तुमची गन की बात!
उधोजीराजे : तिथं कुणी लुंगेसुंगे सरदार पाठवा, आम्ही इथून...आय मीन बांदऱ्यातून लक्ष ठेवतो की!
कमळाबाई : (घाईघाईने निरांजनाचं तबक उचलत) नको! खरा शूरवीर रणांगणावरच शोभतो! बांदऱ्यात बसून गन की बात करण्यात काय हशील आहे?
उधोजीराजे : (गडबडून) अहो, अहो! हे काय?...
कमळाबाई : (लाजून हसत) ही आपली लगन की बात नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com