एक ते चार! (ढिंग टांग)

एक ते चार! (ढिंग टांग)

डेक्‍कनवरील चितळेबंधू ह्यांच्या सुप्रसिद्ध दुकानी दुपारी एक ते चार ह्यावेळेत बाकरवडी आणि तत्सम पदार्थ उपलब्ध राहतील, अशी घोषणा एका बंधूने ठाण्यात जाऊन केल्याचे निदर्शनास आले आहे. गेले, ते दिन गेले!! आरामाची वेळ संकुचित होणे, हे निश्‍चितच अच्छे दिनांचे लक्षण मानता येणार नाही. कोठल्याही बाहुबलीने दुपारी एक ते चार ह्या काळात चितळ्यांच्या दुकानी बाकरवडी घेऊन दाखवावी!! अशक्‍य!! कोणे एके काळी करेक्‍ट (ट पूर्ण) एक वाजता डेक्‍कनच्या दुकानी खाली घसरत येणाऱ्या शटरखालून एक भुरटा इसम शिरला. शटर बंद होऊन आतमधून हाणामाऱ्यांचे ध्वनी निम्म्या फर्गसन रोडला ऐकू आले. थोड्या वेळाने शटर किंचित किलकिले होऊन सदर भुरटा इसम फाटकी लुंगी सावरत जायबंदी अवस्थेत ‘चीची’ करत सह्याद्री इस्पितळाकडे पळून जाताना लोकांनी पाहिला. पाठोपाठ थोरले विश्‍वासराव अस्तन्या सावरत मनगटे चोळत बाहेर आले, विजयी मुद्रेने म्हणाले : लेकाचा बाकरवडी मागत होता. म्हटले, चारनंतर या!! हटून बसला. हाकलला मग...कोणीतरी रजनीकांत म्हणून होता..!!’’ 

ही आणि अशा कैक अख्यायिकांचा मृत्यू ह्या बातमीने घडला. बातमी ऐकून आम्ही एक मिनीट शांत उभे राहून मौन पाळले. वाईट भाग हा की ही बातमी ठाण्यात फुटली...चांगला भाग हा की सुधीर गाडगीळ ह्या पुणेरी गृहस्थांमुळेच महाराष्ट्राला ह्या प्रकरणाचा सुगावा लागला. सुगावा म्हंजे सुधीर गाडगीळ वार्ता!! येत्या जुलैपासून डेक्‍कनवरील दुकान बारा तास चालू राहणार असल्याचे कळल्याने (आम्हां) पुणेकरांना प्रचंड धक्‍का बसला.

अवघ्या विश्‍वात चर्चा सुरू झाली. होय, सदर घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ( पक्षी : ‘वैशाली-रूपाली’वर) खळबळ माजली असून अनेक देशांचे व्यापारिक परस्पर करार धोक्‍यात आले आहेत. ‘व्हाट्‌सॲप’ आणि ‘फेसबुक’चा मालक मार्क झुकेरबर्ग ह्यानेही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून चिंता व्यक्‍त केल्याचे व्हायरल झाले आहे.

चितळेबंधूंवरील ज्योक्‍स आणि कमेंट्‌समुळे ‘फेबु’ आणि ‘व्हाट्‌सॲप’ भरभरून वाहात असते. ह्याच्या मुळावर कुऱ्हाड आल्याने भविष्यात नवे ज्योक्‍स कुठून आणणार? असा मूलभूत सवाल त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. इतकेच नव्हे, तर ‘व्हाट्‌सॲप’मध्ये बर्गर, पिझ्झा, आइस्क्रीमबरोबरच बाकरवडीच्या चित्राचा अंतर्भाव करण्याची योजना त्यास सोडून द्यावी लागणार आहे. प्रारंभी हा निर्णय ‘मेक इन इंडिया’ योजनेच्या अंतर्गत असावा, अशी अफवा उठली होती. एक ते चार दुकान चालू ठेवले तरच स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा अंतर्भाव कायम राहील, अशीही अट घालण्यात आल्याची चर्चा विज्ञानभवन (दिल्ली) ते बबन पानवाला (पुणे) चालू होती. पण तसे काहीही नसून तंत्रज्ञान आणि गिऱ्हाइकाचा संतोष हीच दोन कारणे ह्या निर्णयापाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पुणेरी दुकानदार गिऱ्हाइकाच्या संतोषाची नस्ती उठाठेव कधीपासून करायला लागले? असे कोणी विचारील. त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू. 

एक ते चार आख्खे पुणे झोपते!! (सदरील मजकूरदेखील आम्ही सकाळी लिहावयास घेतला, पण दुपारी चारनंतर पुरा केला आहे.) कां की ही आहारोपरान्त वामकुक्षीची वेळ असून ह्या काळात डाव्या कुशीवर अंमळ पडून राहून एक चुटका काढायचा असतो. आता डाव्या कुशीवरच का झोपायचे, उजव्या कां नाही? असा पुणेरी सवाल कोणी विचारतील! तर त्याचे उत्तर असे : ज्या वाग्भटाने आयुर्वेदातील ‘अष्टांगहृदयसंहिता’ लिहिली, त्याच्या घरातील पलंगाच्या उजव्या बाजूस भिंत होती!! सबब डाव्या कुशीवरच झोपण्यावाचून त्यास गत्यंतर नव्हते. (खुलासा : वाग्भटाचा विवाह झाला नसावा, असे येथे गृहित धरले आहे!! झाला असल्यास परिस्थिती तीच राहील, हे कोणीही कबूल करेल!! असो!!) मुद्दा वामकुक्षी हा नसून वामकुक्षीचा समय हा आहे. ‘पतंजली’ने सिर्फ पच्यास रुपये में खुसखुशीत बाकरबडी आणण्याचे ठरवल्याने चितळेबंधूंची (एक ते चार ) झोप उडाली का? हा एक गहन सवाल आहे. त्याचा सुगावा लावण्यासाठी आम्ही सुधीर गाडगीळ ह्यांना गाठावयास (‘रूपाली’वर) निघालो आहो. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com