ऋणानुबंधाच्या गाठी...! (ढिंग टांग)

ऋणानुबंधाच्या गाठी...! (ढिंग टांग)

प्रिय मित्र उधोजीसाहेब 
यांसी (अखेरचा?) जय महाराष्ट्र. 
अत्यंत जड अंत:करणाने हे पत्र लिहीत आहे. खरेतर फोनच करणार होतो, पण घसा पार बसला आहे. बोलणार कसा? तुम्ही मैत्री संपुष्टात आल्याची घोषणा केल्यानंतर घसा जो काही बसला की विचारू नका. असो. मंत्रालयात जाणेही अवघड होऊन बसले आहे. साधे कुणाला नमस्कार परत करणेही जिवावर येते. ‘नमस्कार!’ असे म्हणताना उगीचच सायकलच्या टायरची हवा कुणीतरी सोडल्यासारखे नानाविध आवाज तेवढे येतात. नमस्कार राहतो बाजूला!! असो.

इथून पुढे एकट्याने वाटचाल करायची आहे, ह्या कल्पनेने पायातदेखील गोळे आले आहेत!! शेवटी खोलीत एकटाच अंधार करून कुमार गंधर्वांचे ‘ऋणानुबंधाच्या पिचून पडल्या गाठी... भेटीत धृष्टता मोठी’ हे द्वंद्वगीत ऐकत पडलो होतो. आपली आठवण आली. आपली पंचवीस वर्षांची मैत्री अशी शोचनीय पद्धतीने संपुष्टात यावी, याचे अपार दु:ख होत आहे. पण त्याला काही इलाज नाही. निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपुष्टात येतेच, असे कुणीतरी म्हटलेच आहे. (खुलासा : मीच म्हटले आहे! असो.) ‘कधी धुसफुसलो, कधी गहिवरलो’ असाच आपल्या नात्याचा प्रवास होता. भेटलो की दिवाळी, पाठ वळली की शिमगा असे आपले चालत असे. त्यात पंचवीस वर्षे कशी गेली, कळलेदेखील नाही. तरीही आपली जोडी अभंग होती. 

आश्‍चर्याची बाब म्हंजे अडीच दशकांपूर्वी आपले ऋणानुबंध जुळले, तेव्हा लोकांना विशेष आनंद झाला नव्हता. उलटपक्षी युती तुटल्यानंतर उभय पक्षांत पेढे वाटण्यात आले. हे म्हंजे लग्न रजिष्टर पद्धतीने आणि काडीमोड समारंभपूर्वक, असेच झाले!! काही का असेना, जे काही घडले ते ठीकच घडले. यापुढेही आपण एकत्र, गुण्यागोविंदाने काम करू अशी किती तरी स्वप्ने पाहिली होती. पण... जाऊ दे. मेल्या म्हशीला मणभर दूध निघते. ते घेऊन चहा का करायचा? त्याची का रबडी खायची? त्याचा का खवा करायचा? 
बाय द वे, निवडणुका झाल्या की मी स्वत: ‘मातोश्री’वर साठ पेढे द्यायला येईन! तुम्ही मला साठ जागा देऊ केल्या होत्या, म्हणून साठ पेढे!! ओके? बाकी भेटीअंती आणि घसा सुधारल्यावर बोलूच. आपला. नाना फडणवीस.
 

नाना फडणवीस यांस-
तुमचे पत्र मिळाले. वाचून आश्‍चर्य वाटले. घसा बसलेला माणूस इतके खवट कसे लिहू शकतो? घसा बसला असला तरी लिहायला प्रॉब्लेम येत नाही, असे मिलिंदाने सांगितले. तसे असेल तर बरेच आहे. पण माझ्या मते तुम्ही रोज मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात, हे उत्तम. मागल्या खेपेला बटाटेवडे खाल्ल्याने माझाही घसा बसला होता. गुळण्यांमुळे बरे वाटले. 

बऱ्याच वर्षांनी मला सुटल्यासारखे वाटत आहे. अत्यंत टाइट गंजिफ्राक घालून हिंडताना जसे अस्वस्थ व्हायला होते, तसे मला इतकी वर्षे वाटत होते. आता मोकळा झब्बा चढवून मज्जेत फिरतो आहे. 

अर्थात, ह्या काडीमोडामुळे एक तोटा झाला आहे. त्याला तोंड कसे द्यायचे? ह्याचा विचार करत मीदेखील ऋणानुबंधाच्या गाठींचे गाणे ऐकत पडलो होतो. आमचे हात टाळीसाठी रिकामे आहेत, हे पाहून काही लोक लागलीच टाळी मागायला आले. त्यांना कसे फुटवावे? ह्या खटाटोपात मी आहे. तुमचा घसा बसला आहे, तर मी माझे दोन्ही हात बगलेत दडपून बसलो आहे!!
निवडणुकीनंतर तुम्हाला फार तोशीस पडणार नाही, ह्याची काळजी घेईन! एका किलोत साठेक पेढे बसतात!! नाही म्हटले तरी दोन-अडीचशे रुपये खर्च!! तो तुम्हाला करावा लागू नये, हीच प्रार्थना!! येताना दोनेक पेढेच आणा... तेवढे पुरेसे ठरतील. असो. तुम्ही आमच्याकडे येण्यापेक्षा मीच तुमच्याकडे येईन. डोण्ट वरी. तोवर घसा सुधरून घ्या. 

आपला. 
उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com