वापसी ! (ढिंग टांग)

वापसी ! (ढिंग टांग)

बेटा : (सळसळत्या उत्साहात) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक ! आय मीन बॅक फ्रॉम इटोळी !!
मम्मामॅडम : (भुवया उंचावत) इटोळी? म्हंजे?
बेटा : म्हंजे इटलीतल्या आजोळी... इट्‌स नोन ॲज इटोळी नाऊ !
मम्मामॅडम : (सुटकेचा निःश्‍वास टाकत) थॅंक गॉड ! परत आलास, किती बरं वाटलं! मला वाटलं याही वेळेला तू छप्पन दिवस गायब होणार !!
बेटा : (निषेधाच्या सुरात) कमॉन ! तीन दिवसांसाठी तर गेलो होतो !! जादा सुटी लागून आली की कितीतरी लोक वीकेंडला टूरवर जातात ! मी का जाऊ नये?
मम्मामॅडम : तू शिवभक्‍त ना? मग होळीलाच कसा काय पळालास?
बेटा : इटलीत होळी साजरी करत नाहीत, असं कोणी सांगितलं?
मम्मामॅडम : (अजीजीने) जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना आपली सर्वांत जास्त गरज असते, तेव्हा जाऊ नये रे ! किती वाट पाहायला लावलीस !!
बेटा : (बेफिकीरपणाने)...त्यात वाट कसली पाह्यची?
मम्मामॅडम : (दु:खी कढ काढत) वाट लागली की वाट पाहावी लागते बेटा !
बेटा : (कुतूहलानं) कुणाची वाट लागली?
मम्मामॅडम : (कळवळून) आज्जीला भेटायला जातो, म्हणून तू निघून गेलास ! इथं तीन दिवस मला शेकडो फोन घ्यावे लागले ! ‘मॅडमजी बचाव, मॅडमजी बचाव’ म्हणत लोक दारावर धडकत होते !
बेटा : (आश्‍चर्यानं) अच्छा? मग तू काय सांगितलंस?
मम्मामॅडम : (कपाळ चोळत) काय सांगणार? ‘मी आता रिटायर झाल्येय’ असंच सांगत होते !! (विषय बदलत) ते जाऊ दे ! इटलीची काय हालहवाल?
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) तेच सांगायला आलो होतो ! आज्जीनं पापड, कुर्डया दिल्या आहेत ! म्हणाली, माझ्या मुलीला दे हो !! थोडा थांबलास तर लिंबाचं लोणचं भरून देते, असंही म्हणत होती ! पण मी म्हटलं, आत्ता वेळ नाही... कर्नाटकचं इलेक्‍शन झालं की येणारच्चे ! तेव्हा दे !!
मम्मामॅडम : (वैतागून) कर्नाटक निवडणुकीनंतर कुठे गेलास तर खबरदार ! त्रिपुरा, मेघालय, नागालॅंडच्या निवडणुकांनंतर ऐन निकालाच्या वेळी पसार झालास ! मला सगळ्या गोंधळाला तोंड द्यावं लागलं !
बेटा : (सावरून घेत) पण पोटनिवडणुका जिंकून मगच गेलो होतो मी !!
मम्मामॅडम : (कळवळून) पोटनिवडणुका जिंकून कुणाचं पोट भरतं का रे !! ते काही नाही !! कर्नाटकनंतर मी तुला कुठ्ठेही जाऊ देणार नाहीए !
बेटा : (चिडून) पण मी आधीच सुटीचा अर्ज टाकलाय !
मम्मामॅडम : तुझा अर्ज प्राप्त झालेला नाही ! सबब, सुटी मिळणार नाही !!
बेटा : (चक्रावून) पण मी तुझ्याकडे अर्ज पाठवलेलाच नाही ! मी मलाच पाठवला ! आता मी बॉस आहे ना?
मम्मामॅडम : (हतबुद्ध होत) ऐनवेळी पळ काढून गेलास म्हणून ते नतद्रष्ट कमळवाले किती नावं ठेवताहेत, हे ऐकायला हवा होतास इथं !! मला तोंड पाडून ऐकून घ्यावं लागलं ! एकतर त्रिपुरातल्या पराभवामुळे आधीच माझं मन... (हुंदका आवरत) जाऊ दे ! तुला नाहीच समजायच्या माझ्या भावना !!
बेटा : कमॉन... त्रिपुरातील पराभव आम्ही स्वीकारला असून, तेथील जनतेचा विश्‍वास पुन्हा जिंकून घेऊ, असं मी आल्या आल्या जाहीर केलं होतं ! पुढच्या इलेक्‍शनला करू काय ते !! आहे काय नि नाही काय !!
मम्मामॅडम : (कपाळाला हात मारत) कधी होणार तू सीरिअस? काळ कठीण आहे ! तुला खूप मेहनत करायला हवी ! इलेक्‍शनांमागून इलेक्‍शनं जिंकायला हवी ! नाहीतर...
बेटा : (हसत) डोण्ट वरी मम्मा ! मी पीएम झालो की बघच तू ! मीच सतत जिंकत राहणार ! पीएम झाल्यावर मी ऑर्डरच काढणार आहे की ह्या देशात फक्‍त पोटनिवडणुकाच होतील !! मग मी जिंकणारच ना !! क्‍यों?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com