एक दिवस उपवास! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

(एक वैयक्‍तिक अहवाल)

(एक वैयक्‍तिक अहवाल)

प्रति,
डिअर ऑनरेबल मोटाभाई, सतप्रतिसत प्रणाम. मी एक साधासुधा पक्षाचा कार्यकर्ता आहे. ‘एक खासदार’ अशीच माझी ओळख आहे. (नावात काय आहे?) गेली चारेक वर्षे एक साधा-सिंपल खासदार म्हणूनच दिल्लीत ये-जा करतो आहे. पक्ष सांगेल, ती प्रत्येक गोष्ट मी तत्काळ अमलात आणत आलो आहे. (आपले दिल्लीतील नवे पक्ष कार्यालय सुरू झाले, तेव्हा सतरंजी घालायला मी जातीने हजर होतो... असो.) आमच्या पक्षात लोकशाही असून, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचेही दिल्लीदरबारी चांगले वजन आहे, असे मी मतदारसंघात अभिमानाने सांगत असतो. दोन वर्षांपूर्वी आपल्या सर्वांचे लाडके दैवत श्रीनमोजी हे माझ्याकडे बघून एकदा हसले होते!! आपणही एकदा माझ्याकडे बघून भिवई उडवली होती. एकंदरित आपला संवाद उत्तम आहे, असेच म्हणावे लागेल.

गेल्या दोन दिवसांतील घडामोडींचा वैयक्‍तिक अहवाल दिल्लीस पाठवा, अशी आत्ता सूचना प्राप्त झाल्याने सदरील निवेदन लिहावयास बसलो आहे.
दिनांक ११-०४-२०१८ : आज रोजी सकाळी अकरा वाजता साक्षात श्रीनमोजी तुम्हाला फोन करणार असून, मोबाईल फोन चार्जावस्थेत ठेवावा, अशी सूचना मला प्राप्त झाली होती. पहाटे गजर लावून उठलो. (कित्येक दिवसांत पहिल्यांदा) सकाळीच आंघोळ उरकून फोन हातात घेऊन बसलो. अकरा ही वेळ न्याहारीची. पण पोटात घास उतरेना! श्रीनमोजी फोनवर काय विचारतील, ह्या प्रश्‍नाने रात्रभर भंडावून सोडले होते. पावणेअकराच्या सुमारास फोन स्विच ऑफ करून टाकावा किमानपक्षी फ्लाइट मोडवर टाकावा, असे मनात येऊन गेले. पण डेअरिंग झाले नाही.
...प्रत्यक्षात फोन आला तेव्हा काही बोलावेच लागले नाही. दुपारी बारानंतर बरे वाटेनासे झाले, म्हणून न जेवताच झोपलो! न ठरवता उपवास घडला.

दिनांक १२-०४-२०१८ : सकाळी थोडे उशीराच उठवा, असे सांगून झोपलो होतो. आज उपोषणाचा दिवस! लौकर उठून बसलो तर उगाचच भूक लागते!! दात घासताना लक्षात आले, आज गुरुवार! म्हणजे साबुदाणा खिचडीचा वार... हळहळलो!! मग मनात म्हटले घरात सकाळी खाऊन नंतर उपोषणाला बसले तर काय मोठे होणार आहे? घराची दारे, खिडक्‍या नीट लावून घेतल्या. सगळ्यांना मोबाइल बंद करायला सांगितले, आणि मग बिनदिक्‍कत तीन प्लेट साबुदाणा खिचडी दाबून खाल्ली!! वर एक गिलासभर (आले-कोथिंबीरयुक्‍त) ताक प्यायलो! म्हटले, आता दिवसभर उपाशी राहायला आपण मोकळे!! मग बांदऱ्याला उपोषणाच्या मांडवात गेलो. मांडवात उद्योगमंत्री अनंतराव गीतेजी दिसले. त्यांना विचारले, ‘‘इकडे कुठे? तिकडे उधोजींचा फोन येणाराय!’’ ते लागलीच पळाले!!

शेलारमामा मांडी घालून बसले होते, त्यांना विचारले, ‘‘काय म्हणाले थोरले साहेब?’’ तर त्यांनी तोंड फिरवले. शेवटी आमचे फडणवीसनाना जिथे बसले होते, तिथे गेलो. आल्या आल्या माझ्या कानात ते कुजबुजले, ‘‘खिचडी खाऊन आलात ना?’’ क्‍येवढाऽऽऽ दचकलो!! म्हटलं, ‘‘कसं ओळखलंत?’’ तर म्हणाले, ‘‘मिशीत साबुदाणा अडकलाय!’’

...बराच वेळ काहीच घडले नाही. पाण्याच्या बाटल्यांपलीकडे मांडवात काहीही नव्हते. उपाशीपोटी (बसल्या बसल्या) झोप यायला लागली. पोटात कावळे कोकलू लागले. पण शेजारी बसलेले फडणवीसनाना शांत होते. मनात म्हटले, कमाल आहे, ह्या गृहस्थाची!! नागपूरचा माणूस, मग एवढा वेळ उपवास कसे काय सहन करू शकतात हे? न राहवून त्यांना म्हटलेदेखील, ‘‘का हो, भूक लागली नाही का साहेब अजून?’’
‘नाही!,’’ हाताची घडी घालून ते म्हणाले, ‘‘त्याची एक ट्रिक आहे... कुठल्याही क्षणी आपल्याला दिल्लीहून फोन येणार आहे, अशी कल्पना केली की भूक कंप्लीट मरते... करून पाहा!!’’
...मी अजूनही जेवलेलो नाही! इति.
आपला एक अज्ञात खासदार.

Web Title: editorial dhing tang british nandi article