हागणदारी अँथम ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 21 एप्रिल 2018

महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त झाल्यामुळे सर्वत्र आनंदोत्सवाचे वातावरण असून, सरकारने इरेला पडून आपले लक्ष्य गाठले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. ही घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ज्या अर्थातच उलटसुलट होत्या. काही जणांच्या मते हा दावा बऱ्यापैकी घाईघाईने केलेला असून, अजूनही उघड्यावरचे वास्तव हे डोळे झाकून घ्यावे, असेच आहे. काही जणांच्या मते मात्र महाराष्ट्र खरोखर हागणदारीमुक्‍त झाला असून, ही वेळ विजयसोहळा साजरा करण्याची आहे. असो.

महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त झाल्यामुळे सर्वत्र आनंदोत्सवाचे वातावरण असून, सरकारने इरेला पडून आपले लक्ष्य गाठले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. ही घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ज्या अर्थातच उलटसुलट होत्या. काही जणांच्या मते हा दावा बऱ्यापैकी घाईघाईने केलेला असून, अजूनही उघड्यावरचे वास्तव हे डोळे झाकून घ्यावे, असेच आहे. काही जणांच्या मते मात्र महाराष्ट्र खरोखर हागणदारीमुक्‍त झाला असून, ही वेळ विजयसोहळा साजरा करण्याची आहे. असो.

मुंबईतल्या नद्या वाचवाव्यात ह्या उदात्त हेतूने मध्यंतरी मा. मु. ना. ना. फडणवीस आणि त्यांचे कुटुंब (वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार्जी समाविष्ट) ह्यांनी मिळून एक बहारदार रिव्हर अँथम ऊर्फ सरितागीत सादर केले होते. त्याची खूप चर्चा झाली व मुंबईच्या नद्या वाचविण्यासाठी हजारो हात एकवटले आणि मुंबईचा परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌ व हिरवागार झाल्याचे आपण सारे पाहतोच आहोत. मुंबईच्या नद्या ही गोष्टच मुदलात काल्पनिक असल्याचे काही लोकांचे म्हणणे होते. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे इष्ट. ते लोक काय, पुण्यातल्या मुळा-मुठांनाही काल्पनिक नद्या म्हणण्यास कमी करणार नाहीत. पुन्हा असो.
चल चल मुंबई संग चल, कहता नदियोंका जल
हम आज अगर मिल जाये तो बेहतर होगा कल

असे त्या रिव्हर अँथमचे भावगर्भ आणि आशयघन असे बोल होते. हे काव्य ज्यास सुचले त्याच्यासमोर आम्ही विनम्रभावाने उकिडवे बसून नमस्कार करितो. खुद्द ना. ना. फडणवीस ह्यांनी त्यात प्रमुख भूमिका साकारली होती, हे कोण विसरेल? त्यांचे सहाध्यायी सुधीर्जी मुनगंटीवार ह्यांनी नदीच्या काठी फत्तरावर उभे राहून एक झकास दृश्‍य दिले होते, त्याचे स्मरण कोणाला नाही?
ह्याच सरितागीताच्या धर्तीवर आता ‘हागणदारी-गान’ तयार करावे व यू-ट्यूबवर प्रसारित करावे, अशी सूचना पुढे आली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, नोकरशहा व कलावंतांची एक समिती नेमण्यात येत असून, विविध सूचना मागविण्यात येत आहेत. समितीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. पैकी एका बैठकीत ‘हागणदारीवर गाणे करणे अवघड नाही, उलट त्याच्या संगीत संयोजनात कमीत कमी वाद्ये लागतील, ट्रम्पेट, बिगुल व शंख अशा वाद्यांचा मुबलक वापर करण्यावर आमचा भर राहील’ असे एका संगीतकाराने सांगितले. काही लोकप्रतिनिधींनी ‘गान’ हा शब्द तेवढा बदलून घ्यावा, अशी सावध सूचनाही केली आहे. हागणदारी अँथमसाठी अनेक काव्यांचा विचार सुरू आहे. अनेक नमुनाकाव्ये समितीला प्राप्त झाली असून, एवढ्या कागदांचे (आता) करायचे काय, असा प्रश्‍न समितीच्या सदस्यांना पडला आहे. उदाहरणार्थ-
उठा उठा सकळिक
वाचे स्मरावे कमळमुख
रांगेत ह्या सर्वसुख
सर्वांभूति।।

...अशा एक नवाकोरा श्‍लोक अँथमसाठी पाठवला गेला आहे. तसेच
झाली सकाळ झाली,
शिस्तीत लावु रांगा
डबड्यास डालड्याच्या
घेऊन यावे संगा...
...असेही दिलखेचक काव्य सिलेक्‍ट करण्यात आले आहे.
नको माळरान। नको बा शिवार।
अंगणात दार। बंद माझ्या।।

असा एक अभंगही जवळपास निवडला गेला आहे. तथापि, ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा...आ...आ...आजा’ हे ‘तीसरी मंझिल’ चित्रपटातील गाजलेले गाणे जसेच्या तसे अँथम म्हणून वापरता येईल अशीही सूचना आली असून, अँथममध्ये लीड रोल करणारे ना. ना. फडणवीस ह्यांनी ‘हे जमेल’ असा रुकार दिल्याचेही कळते. वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार्जीदेखील एक छोटासा रोल करणार असून, ह्यावेळी मात्र आपण नदीकाठी दगडाबिगडांवर शूटिंग करणार नाही, अशी अट त्यांनी घातली आहे. ते मात्र अनाकलनीय आहे. असो असो.
कलासक्‍त मनाच्या मराठी प्रेक्षकांनी ‘हागणदारीमुक्‍त अँथम’साठी थोडी कळ सोसावी ही विनंती.

Web Title: editorial dhing tang british nandi article