dhing tang
dhing tang

संवेदन! (ढिंग टांग)

बलात्कारांच्या बातम्यांनी,
अत्याचारांच्या अफवांनी
मागण्यांच्या मोर्च्यांनी
दगडफेक्‍यांच्या दंगलींनी
बडबोल्यांच्या बातांनी
थापाड्यांच्या थापांनी
बापजाद्यांच्या बापांनी
उबून गेला कुणी एक,
त्याचा अखेर फुटलाच बांध...

आभाळाकडे हात उभारुन
वाकडे बोट रोखून
ओरडला तो खच्चून-
‘‘अरे, तुझ्या काळरात्रीला
नाहीच का रे उजेडाचा किनारा?’’

...परवाच एक बातमी वाचली
देवळात एक पोर फुटली...
पुढाऱ्याच्या वजनाखाली
तरणीताठी चिरडून गेली

परवाच एक ऐकली अफवा
रानभरी झाला वणवा
सरकलेल्या सरहद्दींवर
नंतर पेटला नाही दिवा

परवाच म्हणे इथून रात्री
बुलेट ट्रेन गेली धडधड
सावकाराच्या दारावरती
भुकेल्यांची उडते झुंबड

पंत गेले, राव चढले
नवा आहे जामानिमा
नव्या पोलिसपाटलाचा
वेशीवरती पंचनामा

नवी विटी, नवा दांडू
नवीन वाट, नवीन पाय
नव्या राज्यात नवा कायदा
नवीन फिर्याद नवा न्याय!


काळोखाच्या आवारात
खाट टाकून पडलो आहे
डोळ्यांत नीज उतरत नाही,
आढ्याकडे पाहातो आहे

तरीही इथे नाहीच उजाडत
उजळत नाही कुठली किनार
फुटक्‍या तुटक्‍या संवेदनांचे
जळत राहतात चार चिनार

देहामनात खिळे ठोक
बाकी सारे मुके मुके
काळोखाच्या पडद्यामागे
जमे जहरी दाट धुके

दिवसाढवळ्या इथे ओरडते
एक घुबड तारेवर बसून
ऐन माध्यान्ही हलत आहेत
सावल्यांसारखे अपशकुन...

आभाळाकडे हात उभारुन
वाकडे बोट रोखून
ओरडला तो खच्चून-
‘अरे, तुझ्या काळरात्रीला
नाहीच का रे उजेडाचा किनारा?’

अखेर त्यानेच उचलला हात,
म्हणाला मनाशीच की,
‘मेली आहेत इथली सारीच मने,
शरीरांची उरली आहेत चिपाडे.
संवेदनांचे रान जळून गेले आहे,
जाणिवांचे झरे आटले आहेत,
हा युगानुयुगाचा सांस्कृतिक दुष्काळ
आता कधीही संपणे नाही,
सबब, ह्या देशाचे काही खरे नाही...

इथल्या परपुष्ट पुढाऱ्यांचा,
दगलबाज दलालांचा
दहशतखोर दिवाभीतांचा
अप्पलपोट्या एजंटांचा
साऱ्यांचा साऱ्यांचा कायम
धिक्‍कार असो! धिक्‍कार असो!

...असे म्हणून त्याने विषण्णपणे
उचलला निर्णायक हात आणि
खुपसला चमचा समोरच्या
गरमागरम कांदेपोह्यांच्या बशीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com