गुडघे! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

गु डघ्यांपुढे आम्ही हात टेकले होते, असे आम्ही म्हटले तर तुम्ही म्हणाल, तुम्ही पुलंचे विनोद चोरता! पण आम्ही हा विनोद करत नसून खरोखरीच हात टेकले आहेत. नाही नाही! आम्हाला संधिवाताची व्याधी नसून आम्ही स्वत:च एक नामवंत असे गुडघे स्पेशालिस्ट आहो! ‘गुडघेबदल शस्त्रक्रिये’त आमचा हात कोणीही धरू शकत नाही. शेकडो लोकांच्या गुडघ्यांच्या वाट्या लीलया काढून घेतल्या असून त्यातच आम्ही रोज आमटी वाढून घेतो, असा कोणाचाही समज होईल, इतकी आमची प्रॅक्‍टिस आहे. परंतु, ज्या गुडघ्यांच्या जोरावर आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहिलो, त्याच गुडघ्यांनी आमचा घात केला. घडले ते असे-
...गुडघे स्पेशालिस्ट म्हणून आमची प्रॅक्‍टिस जोरात सुरू असताना आमच्याकडे एक अत्यंत महत्त्वाचा (पक्षी : व्हीआयपी) पेशंट स्वत:च्या पायाने (लंगडत) आला. त्याने महिलांचा सलवार कुर्ता परिधान करून जमेल तितके वेषांतर केले होते. सदर महिला पेशंट पाहून आम्ही किंचित दचकलो. कारण महिलेस चांगली हातभर दाढी होती!!
‘‘बोला ताई, काय होताय?’’ आम्ही पायाकडे बघतच म्हणालो. आम्ही पायाकडेच बघतो. कारण गुडघे हे पायाच्या किंचित वर असतात. (हो की नाही? शाब्बास! हुशार आहात!!) तर काही न बोलता ताई कण्हत बसल्या.
‘‘घुटनों में दर्द है! फार त्रास देतात हे गुडघे...’’ बऱ्याच वेळाने ताईंनी तक्रार सांगितली.
‘‘किती आहेत?’’ बेसावधपणे आम्ही.
‘‘मूरख बालक... दो ही है...’’ ताई खवळल्या. आता चार गुडघे असलेले पेशंट आम्ही पाहिले आहेत. नाही असे नाही! अशी केस दुर्मीळ असली तरी चार खुरांचा माणूस सापडणे अशक्‍य आहे का? तुम्हीच सांगा.
‘‘क्‍या तकलीफ हय?’’ आम्ही ड्रावरातून एक स्क्रू ड्रायव्हर काढून विचारले. वास्तविक त्याच ड्रावराचा स्क्रू पिळण्यासाठी आम्ही ते शस्त्र बाहेर काढले होते. पण ताई उगीचच दचकल्या.
‘‘पद्मासनात बसलो होतो. उठताना गुडघ्यात कळ आली...’’ ताई म्हणाल्या.
‘‘किती वेळ पद्मासनात बसला होता?’’ आम्ही.
‘‘ बारा वर्षं!’’
‘‘क्‍काय?’’ आम्ही ओरडलो. बारा वर्षं पद्मासनात बसलेल्या माणसाच्या गुडघ्यात काय कुठूनही कळ आली असती तर आम्हाला नवल वाटले नसते. बाई, आता बारा वर्ष उभ्याच राहा, असा वैद्यकीय सल्ला देणार होतो तेवढ्यात... ताईंनी चक्‍क डोळा मारलान! आम्ही गोरेमोरे झालो. हलकेच डोक्‍यावरची ओढणी बाजूला करून ताई उभ्या राहिल्या. पाहातो तो काय! साक्षात योगगुरू बाबा बामदेव पुढ्यात पेशंट म्हणून उभे होते!! आम्ही शतप्रतिशत प्रणाम केला. ज्या योगाचार्याने आमचा गुडघेबदलाचा धंदा केवळ तेलाच्या जोरावर बदलला, तो योगवीर आमच्यासमोर उभा होता.
‘‘बाबाजी, आपण आपले दिव्य मर्दन तेल वापरून पाहिले का? आमच्या एका पेशंटाने त्या तेलाचा वापर गुडघ्यावर केला असता त्याचे दोन्ही पाय पाठीमागील बाजूनेदेखील वांकू लागले...’’ आम्ही नम्रतेने म्हटले.
‘‘हल्ली नीट मांडी घालून धड बसता येत नाही,’’ बाबाजी कळवळून म्हणाले. खरेतर हा काही खूप मोठा इश्‍यू नाही. मांडी घालून बसता न येणे, ही एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय समस्या आहे. दादरच्या शिवाजीपार्कावरचे आमचे एक जुने पेशंट वाड्याला आपल्या मित्राकडे जेवावयास गेले असता त्यांना मांडी घालून अंगत पंगत जेवायला भाग पडले. नवनिर्माणाचा हा प्रणेता जेवणानंतर बराचकाळ मुंग्या मारत बसला होता, म्हणतात. असो.
‘‘पायाला मुंग्या येतात’’ अशी तक्रार बाबाजींनी केली. काही हरकत नाही, असा दिलासा देऊन आम्ही त्यांच्या गुडघ्यास कीटकनाशकाचे इंजेक्‍शन दिले. मुंग्या गायब!
कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना... म्हणे योगगुरू बाबा बामदेव गुडघेबदलासाठी लंडनला गेले... खोटे आहे ते! साफ खोटे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com