हापूस! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : नाजूक!
काळ : लाजूक! प्रसंग : अवघड.
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि...सौ. कमळाबाई.
सौभाग्यवती कमळाबाई अस्वस्थपणे दालनात येरझारा घालत आहेत. मधूनच ब्याग भरत आहेत. ब्याग भरता भरता डोळे पुसत आहेत. तेवढ्यात राजाधिराज उधोजीमहाराज घाईघाईने प्रविष्ट होतात. अब आगे...
उधोजीराजे : (लगबगीनं) आम्हांस आत्ताच वर्दी मिळाली की बाईसाहेब निघाल्या! कुठे निघाल्या? विचारलं तर तुमच्या खाजगीकडील शिपाई काही बोलेनात! म्हणून म्हटलं जातीनं जाऊन पाहून यावं?  (ब्याग भरताना पाहून आश्‍चर्यानं) हे काय? खरंच निघलात की काय?..कुठं?
कमळाबाई : (संतापानं) मसणात!
उधोजीराजे : (निरागसपणाने) ओह...कोण गेलं?
कमळाबाई : (फणकाऱ्यानं) हुं:!! आमची हाडं!!
उधोजीराजे : (शोध लागल्यागत) अच्छाऽऽ...एक माणूस आमच्यावर रागावलंय तर...हहह! होहोहो!! असा राग बरा शोभतो हं कमळे तुझ्या नाकावर!!
कमळाबाई : आम्ही कशाला कोणावर रागावू? आम्हाला कोण विचारतो? आमचे सरदार पळवून नेलेत तरी आम्ही काऽऽही बोलणार नाही!!
उधोजीराजे : (तडफेनं) आम्ही कुणाचे सरदार पळवत नसतो!!
कमळाबाई : (खोचकपणे)...शिबंदी कमी पडत असेल तर आणखी पाठवते!!
उधोजीराजे : (अचंब्यानं) खामोश!! आमच्याकडे शिबंदी काय कमी आहे? अरे, एक शिट्टी मारली तर इथं लाख मावळा उभा राहील, ऐसी आमची क्षमता! शिबंदी कमी पडेल आमच्या दुश्‍मनाला!!
कमळाबाई : (जाब विचारल्यागत) मग आमच्या पालघरच्या गडावर तुम्ही दगाफटका काये म्हणोन केलात?
उधोजीराजे : (खांदे उडवत) आम्ही कुठं केला दगाफटका? दगलबाजी ह्या उधोजीच्या रक्‍तातच नाही, कमळे!! ती तुमची मिरास!! आमच्या पदरी आलेल्या पथिकाला विन्मुख पाठवणं आम्हाला कधीच जमलं नाही, इतकंच!!
कमळाबाई : (ब्याग भरायचे थांबत) ब्रेकिंग न्यूजच म्हणायची ही!!
उधोजीराजे : (पोक्‍तपणानं) तुमच्या पालघरच्या गडकऱ्याचं देहावसान झाल्यानंतर त्यांच्या पुत्रानं थेट आमचे चरण गाठले! म्हणाला, महाराज, आश्रय द्या! कमळाबाईनं आमच्या कुटुंबावर घोर अन्याय केला! आपण न्याय करा!! आमचं मन द्रवलं, आणि देऊन टाकल्या त्यांस गडाच्या चाव्या! म्हटले, तरुण पोरा, इथून पुढं पालघरची जहागिरी तुम्हाला!!
कमळाबाई : (फणकाऱ्यानं) हुं:!! आयजीच्या जिवावर बायजी उदार!!
उधोजीराजे : हे राजकारण आहे कमळे!! ते राजकारणासारखंच खेळायचं असतं!! तुमचे ते पालघरचे सवरासाहेब गेले तेव्हा-
कमळाबाई : (ओरडून) सवरासाहेब नाही!!...वनगासाहेब!! सवरासाहेब आहेत अजुनी आमच्या पदरी!
उधोजीराजे : (जीभ चावून) तुमच्या त्या दानवेसाहेबांनीच आम्हाला सांगितलं की सवरासाहेबांचं बरं वाईट झालं! सवरासाहेबांचं आयुष्य वाढलं असं म्हणू या!!
कमळाबाई : (डोक्‍याला हात लावत)...आमच्या दानवेसाहेबांनी काल भाषणात दोनदा सवरासाहेबांनाच आयुष्यातून उठवलंन!! डोक्‍याला नुसता ताप माझ्या!! छे!!
उधोजीराजे : टंग ऑफ स्लिप म्हणतात त्याला!! मुद्दा एवढाच की आम्ही तुमच्या सरदारांची पळवापळवी केली नसून ते स्वत:च आमच्या राहुटीत आले!!
कमळाबाई : ठीक आहे, मग भेटू आम्ही कोकणातून परत आल्यावर!
उधोजीराजे : (बुचकळ्यात पडून) कोकणात काय आहे आता?
कमळाबाई : (एक डेडली पॉज घेत) पालघरचं आम्ही बघून घेऊ! पण कोकणचे तुमचे गड आता कसे राखता ते बघू! आमचे नवे सरदार नारोबादादा लागलेसुद्धा कामाला! पालघरच्या चिक्‍कूच्या मोहात कोकणातला हापूस गेला तर आम्हाला बोल लावू नका! येत्ये...जय महाराष्ट्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com