टाकीवरला कार्यकर्ता ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सदू : दादूराया, समोर टाकीवर कोण चढलंय रे?
दादू : मी इथं तुझ्या शेजारी उभा आहे, त्याअर्थी तो मी नव्हेच !
सदू : हा विनोद होता?
दादू : नाही ! टोमणा होता !!
सदू : बरं ! मग टाकीवर कोण चढलं असेल?
दादू : धर्मेंद्र असावा !
सदू : कोण धर्मेंद्र?
दादू : ‘शोले’मधला वीरू !
सदू : मग बसंती कुठे आहे?
दादू : टाकीखाली उभी असेल !
सदू : टाकीखाली तर आपण आहोत !
दादू : तुझ्याकडे दुर्बीण आहे?
सदू : मला दूरदृष्टी आहे ! टाकीवरला कार्यकर्ता मला स्पष्ट दिसतोय ! दुर्बिणीची गरज काय?
दादू : दुर्बीण असलेली बरी ! वाघ लांबून येत असतानाच दिसतो !
सदू : ‘सदू आणि दादूनं एकत्र येऊन महाराष्ट्र सांभाळावा,’ असं तो टाकीवरला कार्यकर्ता म्हणतो आहे !!
दादू : वेडाच दिसतोय !
सदू : ‘आम्ही एकत्र येऊ’ असं आश्‍वासन आपण दोघांनी दिल्याशिवाय तो टाकीवरून उतरणार नाहीए म्हणे !
दादू : त्याला म्हणावं एव्हरेस्टवर जाऊन बस !
सदू : दादूराया, तुला काही हृदय आहे की नाही?
दादू : मी हिंदुहृदयसम्राट आहे !
सदू : एक बिचारा कार्यकर्ता आपल्या दोघा भावंडात एकोपा व्हावा म्हणून एवढी रिस्क घेतो, तुला काहीच का वाटत नाही?
दादू : तू सकाळी लौकर उठावंस म्हणून मी बांदऱ्याच्या टाकीवर कधी चढून बसलो होतो का?
सदू : तुला टाकीवर चढता येतं का?
दादू : एकदाच झाडावर चढलो होतो !
सदू : खोटं ! कुठे?
दादू : ताडोबाच्या जंगलात समोरून वाघ आला तेव्हा-
सदू : कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखणं हे आपलं कर्तव्य ठरतं !
दादू : मी तुला टाळी मागितली तेव्हा दिली नाहीस !
सदू : मी तुला तेवीस फोन केले तेव्हा तू कुठे उचललेस?
दादू : आपल्यात एकोपा साधण्यासाठी आजवर भलेभले टाकीवर चढले आहेत...गुमान खाली उतरले !!
सदू : आपण कधीच एकत्र येणार नाही, हे महाराष्ट्राला कधी कळेल?
दादू : फू: !!
सदू : मुळात कुणीतरी एकत्र यावं म्हणून एखाद्यानं असं उंचावर चढून धमकावणं योग्य आहे का? हा खरा प्रश्‍न आहे !!
दादू : हे इमोशनल ब्लॅकमेल आहे !! भावनेला हात घालून जनतेला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार गेली चार वर्षे ह्या महाराष्ट्रात नव्हे, देशात चालू आहे !  ह्या कमळेनं सगळा गेम नासवला ! बघून घेईन !!
सदू : तूसुद्धा त्यातलाच आहेस, दादूराया ! एकीकडे कमळीला शिव्या देतोस आणि दुसरीकडे तिच्याशी गुलुगुलू बोलतोस ! म्हणतात ना- रात्री रातराणी, दिवसा केरसुणी !!
दादू : सद्या, तुला राजकारण कशाशी खातात, हेसुद्धा कळत नाही ! भांड्यातलं लोणी सरळ बोटानं काढता येत नाही ! कळलं?
सदू : त्या टाकीवरल्या कार्यकर्त्याला आपण खोटं खोटं आश्‍वासन देऊन खाली उतरवू या ! आणि खाली उतरल्यावर मग एकोप्यानं त्याच्या-
दादू : नको ! तो बांबू ठेव खाली !! त्याला ओरडून सांग की त्याच्या अकौंटमध्ये पंधरा लाख टाकण्यात आलेत ! झक्‍कत उतरेल !!
सदू : मला असं वाटतं की हा कार्यकर्ता मराठी जनतेचा प्रतिनिधी आहे !! आपण दोघे बसंती आहोत ! आणि आपल्यासाठी मराठी जनता टाकीवर नौटंकी करते आहे ! उतरली की उतरेल !! जय महाराष्ट्र !!
दादू : दे टाळी !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com