सर्पमित्र! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असला तरी आमचे त्याच्याशी फारसे बरे नाही. सर्प म्हटले की आमच्या अंगावर सरसरून काटा येतो. घाबरगुंडी उडून आमची पुंगी वाजत्ये! (खुलासा : पुंगी वाजणे हा एक मुहावरा आहे, त्याचा कुठल्याही क्रियेशी संबंध नाही!) त्यावरून आम्ही शेतकरी नाही, हे कुणालाही सहज ओळखता येईल. सर्प शेतातील उंदीर खातो. अन्नधान्याची नासधूस थांबवतो. त्यायोगे शेतकऱ्यास शेती नीट करता येते. शेती नीट झाली तर सुगीचे दिवस येतात. सुगी आली की सगळ्यांनाच बरे पडते. एकाअर्थी सर्पामुळे सुगी येत्ये, असे म्हटले तरी चालेल. बहुतेक साप हे बिनविषारी असतात, असे आम्ही ऐकून आहो.

ज्या गावाचे नावच मुळी नागपूर असे आहे, तेथे साप अथा नाग आढळून येणे नैसर्गिक आहे, असे कुणी म्हणेल. तथापि, नागपूरच्या ‘रामगिरी’ बंगल्यावर लांबडा साप आढळून आल्यामुळे सध्या आम्ही कमालीचे चिंतित झालो आहो. आपापल्या फायली क्‍लीअर करून घेण्यासाठी ही सर्पजाती बंगल्यावर येत-जात असेल काय? अशी रास्त शंका आमच्या मनात डोकावत्ये आहे!! ह्याच ‘रामगिरी’ बंगल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (जेव्हा मुंबईत, दिल्लीत, किंवा परदेशी नसतात, तेव्हा) असतात. अशा मोक्‍याच्या ठिकाणी साप आढळणे हे सर्वथा गैर असून प्रशासन झोंपा काढते आहे आहे काय?

‘रामगिरी’वर सर्प सापडणे ही महाराष्ट्रासाठी गंभीर गोष्ट आहे, असे उद्‌गार आमचे नेते व धाकले धनी ऊर्फ दादासाहेब बारामतीकर ह्यांनी काढले, ते आम्हांस चिंत्य वाटतात. किती खरे आहे! जेथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुक्‍काम करतात, तेथे जिवंत सर्प आढळावा? कुणाला काही झाले म्हंजे? वेडेवाकडे घडले असते तर सभागृहात श्रद्धांजली वहायची वेळ आली असती, असे जड अंत:करणाने धाकले धनी म्हणाले तेव्हा खरे सांगतो, आमच्या डोळ्यांत पाणी होते. धाकले धनी विरोधी पक्षाचे असले तरी ह्या सद्‌गृहस्थाचे हळवें मन अमृताचे आहे, विषारी नव्हे!! असो.

‘रामगिरी’वर जित्राब आढळले, त्यासोबतच ‘रविभवन’ आणि अन्य काही सरकारी निवासांच्या आवारातही काहीतरी सळसळत गेल्याची खबर फुटल्याने खळबळ उडाली. नागपुरात हल्ली सर्पांच्या प्रजातींचा सुळसुळाट झाल्याचे हे लक्षण आहे. आम्हांस विचाराल तर ह्याला बऱ्याच अंशी वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार्जी जबाबदार आहेत. तेरा कोट झाडे लावण्याचा येवढा सोस माणसाने कां करावा? झाडेझुडे वाढली की हे सर्पटणारे प्राणी आपापत: येणारच. त्यांच्या ह्या हरितहट्टापायीच आज नागपूर शहर सर्प-नागांचा अधिवास ठरला आहे. ज्याप्रमाणे मुंबईत बिबळ्यांनी उच्छाद मांडला, त्याप्रमाणेच नागपुरात सर्पांचा संचार सुरू झाला आहे.

नागपुरातील सर्पांचा बंदोबस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल दहा सर्पमित्रांना पाचारण केले असून ही मंडळी पायात गंबुट आणि हातात हुकाची काडी घेऊन बंगलोबंगली हिंडत असल्याचे चित्र आम्हांस पाहावयास मिळाले. ही माणसे ‘सांबा’मंत्री मा. कोल्हापूरकरदादांनी नेमली असल्याचे कळले!!
काहीही असले तरी माणसाने दक्षता पाळलेली बरी, ह्या विचाराने आम्ही काल सायंकाळी (पत्रकारांच्या) ‘सुयोग’ क्‍यांपावरून अत्यंत दबक्‍या पावलांनी ‘रामगिरी’वर जाऊन पोचलो. दबक्‍या पावलांनी अशासाठी की चुकून पाय पडायचा आणि नसती बिलामत यायची! आमचे परममित्र आणि नेते आणि आवडीचे गृहस्थ जेकी मा. नानासाहेब फडणवीस ह्यांना समक्ष भेटून काळजी व्यक्‍त करण्याचा आमचा निर्विष उद्देश होता.

‘‘नानासाहेब, ह्यापुढे आपणदेखील महाराष्ट्रभर गंबूट घालून फिरावे, अशी आमची स्नेहपूर्ण सूचना आहे!’’ विनम्रपणे (इकडे तिकडे पाहात) आम्ही म्हणालो. मग सावधगिरीचा सल्ला दिला तो असा : ‘‘उगाच विषाची परीक्षा कशाला घेता?’’
फुस्स...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com