साहेबांचा फोन आला...? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

(एका न-बैठकीचा वृत्तांत...)

संजयाजी : (उतावीळपणाने)...मुंबईहून काही निरोप वगैरे? पत्रकार मला विचारतात !!
अनिलाजी : (हाताची घडी तोंडावर बोट...) वाट पहा !..असा निरोप
आहे ! आपण पाहू या !!
अरविंदाजी : (तंद्रित) काय?
अनिलाजी : (हा. घ. तों. बो....) वाट !
अरविंदाजी : (कंटाळून) इथे फोन आहे का कुणाकडे?
अनंतराव : (चुळबुळत) मला पण तीच शंका होती... आपले फोन तर काढून घेतलेत... मग साहेब फोन करणार कोणाला?
आनंदराव : (कानात सांगत) अनिलाजींच्या खिश्‍यात फोन आहे...
ग्यारेंटी !!
अनिलाजी : (हाताची घडी) माझ्याकडे फोन नाही !!
संजयाजी : (घड्याळाकडे पाहात) छे, उशीर झाला, ते पत्रकार मला...
अनंतराव : (करवादून) पुरे झालं हो तुमचं? पत्रकार काय तुम्हालाच विचारतात? आम्हाला नाही?
अरविंदाजी : (शंकाकुल आवाजात) व्हिप काढला होता म्हणे? खरं का हो? कुणी काढला व्हिप? मला तर काही आदेश मिळाला नाही बुवा !
संजयाजी : (पुढाकार घेत) मी सांगतो ! ह्या कमळवाल्यांना सपोर्ट करायचा की विरोध, हे आपले साहेब आपल्याला लौकरच सांगतील ! साडेदहाला ते फोन करणार आहेत ! मग आपण ठरवू !! तोवर काढा पत्ते !!
अनंतराव : (हादरून) पत्ते? ही पत्ते खेळायची वेळ आहे का, राऊतसाहेब!
आनंदराव : (सदऱ्याच्या खिश्‍यात हात घालून) माझ्याकडे एक क्‍याट आहे, हवं तर...
अरविंदाजी : (घड्याळाकडे वाट पाहात) मला वाटतं, साडेदहा वाजायला पाच मिनिटं बाकी आहेत ! आपल्यापैकी कुणीतरी बाहेरच्या पीसीओवर जावं, आणि ‘मातोश्री’वर फोन करावा ! पाठिंबा की विरोध? असं विचारायचं ! आलेलं उत्तर इथं येऊन सांगितलं की आपली मीटिंग समाप्त ! कशी वाटते आयडिया?
अनंतराव : (विचारात पडत) वाईट नाही... पण बाहेर पडल्या पडल्या पत्रकार घेरतील त्याचं काय?
आनंदराव : (निरागसपणाने) त्यांना सांगून टाकू की फोन करायला चाललोय !! किंवा पत्रकारांपैकीच कोणाचा तरी मोबाईल फोन उसना घेऊन मुंबईला लावा की फोन ! आहे काय नि नाही काय !!
संजयाजी : (नकारार्थी मान हलवत) तिथं जाणार कोण? आपण तर नाही जाणार! पत्रकार शेवटी मलाच विचारतात...
अरविंदाजी : (चेहरा पाडून) मी गेलो असतो पण...
अनंतराव : (प्रश्‍नार्थक) पण काय?
अरविंदाजी : (खिसा चाचपत) सुट्टी नाणी नाहीत ! (खोल आवाजात) नाणी काय, बंदेदेखील नाहीत...
अनिलाजी : (एक हात वर करत) थांबा ! बरोब्बर साडेदहा वाजले आहेत ! साहेबांचा मेसेज आता येईल !! (काहीवेळ शांतता...)
अनंतराव : (बऱ्याच वेळानंतर...) किती वाजले?
आनंदराव : (कंटाळून) लौकर आटपा, राव आता !!
अनिलाजी : (शांतपणे) साहेबांचा मेसेज आलाय !
संजयाजी : (संशयानं) कधी आला मेसेज? मला येणार होता मेसेज !! मी केव्हापासून वाट बघत बसलोय ! आम्ही तर नाही ऐकला, तुम्ही कसा ऐकला मेसेज? खरं काय ते सांगा ! शेवटी पत्रकार मलाच विचारतात...
अनंतराव : (घाईघाईने) जाऊ दे हो ते ! आपण तिकडे सपोर्ट करायचा की नाही, तेवढं सांगा ! आपण काय हुकमाचे ताबेदार ! बस म्हटलं बसले ! ऊठ म्हटलं, उठले !!!
अनिलाजी : (एकेक शब्द स्पष्ट उच्चारत) ऐका...त्यांचा फोन आला नाही, हाच मेसेज आहे !!
संजयाजी : (हादरून) क्‍काय? मग मी पत्रकारांना काय सांगायचं? शेवटी ते मलाच विचारतात...
अनिलाजी : (धोरणीपणाने) आपणही ब्लॅंक मेसेज द्यायचा !! म्हणजे सपोर्टसाठी बसायचं आणि सपोर्ट मात्र द्यायचा नाही...असं !
अनंतराव : (गोंधळून) मग करायचं काय?
अनिलाजी : (एक पॉज घेत) आनंदराव, काढा पत्ते !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com