गेस नी तकलीफ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आदरणीय प्रात:स्मरणीय थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांसी, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत आणि मोठ्या कृतज्ञतेने सदरील पत्र आपणांस लिहीत आहे. नुकतीच गटारी अमावस्या होऊन गेली असल्याने तेथूनच सदर पत्र लिहीत असल्याने पत्राला वेगळाच वास आल्यास राग मानू नये!! आपल्यामुळे माझे नशीबच पालटून गेले आहे, नमोजीसाहेब! काय करू? आपले आभार कसे मानू?
आपल्या भाषणातील ती अमर वाक्‍ये आजही माझ्या मनात रुंजी घालत आहेत. : किसी छोटेसे शहर में, नाले के पास, कोई चाय का ठेला लगा कर खडा रहता था, और चाय बनाकर बेचता था. उसने एक छोटेसे बर्तन को उल्टा करके, छेद करके एक पाइप डाल दी. और जो गटरसे गॅस निकलता था, वो पाइपलाइनसे उसके चाय के ठेले में ले लिया. और वो चाय बनाने के लिए उसी गॅस का प्रयोग करता था...

होय, तोच मी चहावाला!! तोच मी चहावाला...ज्याने गटारावर चीर पडलेले भांडे उपडे टाकून त्याला पाइप फिक्‍स करून त्यायोगे गटार इंधन मिळवून त्यावर चहाचे आधण ठेविले!! माझ्या जीवनाची स्टोरी तुम्ही साऱ्या जगताला सांगितलीत. मी धन्य झालो!! सारा गाव ज्या गटाराकडे बघून नाक वाकडे करून पुढे जात असे, ते गटार आज गर्दीने गजबजले आहे. माझ्या चहाच्या ठेल्यावर शेकडो कप चहा उकळतो आहे. गटाराला लागून असलेल्या गावातील जागांचे भाव अचानक गगनाला भिडले आहेत. बिल्डरांनी ‘सैपाकाचा ग्यास आयुष्यभर फ्री’ अशी जाहिरात सुरू केली आहे. इतकेच नव्हे, तर गटारापासून दूर राहणारे असंख्य लोक भांडी-पातेली, डाळ-तांदूळ आदी सामग्रीनिशी गटाराकाठी येत आहेत. काल तर एका अण्णाने माझ्या चहाच्या ठेल्या शेजारीच गटारावर तवे लावून डोसे घातले!! इडल्यांचे घाणे काढले आणि मेदूवडे तळून काढले!! पलीकडल्या बाजूस भजीपाव आणि भुर्जीपाववाल्यांनी ठाण मांडले असून खवय्यांची झुंबड उडाली आहे.

गटार म्हणजे घाण-मैला वाहून नेणारी, प्राय: तुंबणारी एक रोगप्रसारक व्यवस्था आहे, असे लोक आजवर समजत होते. पण हा गैरसमज होता. गटार ही गावाची दोषवाहिनी असते. साऱ्या गावाची घाण स्वत: वाहून नेत गावाबाहेरच्या मोठ्या नाल्यात नेऊन सोडणारा हा जीवनप्रवाह वास्तविक पुण्यप्रवाह मानायला हवा. गटार तुंबले की आसपासच्या गृहिणी संतापून काहीबाही बोलत असत. आता जरा स्वच्छता दिसली तरी ‘शी:!! काय हे!!’’ असे म्हणतात!! ‘कुठल्याही परिस्थितीत गावातली गटारे कायम तुंबलेली राहावीत आणि भरपूर ग्यास उपलब्ध व्हावा, ह्यासाठी आपण स्वत: बैठे आंदोलन करू’ असा इशारा आमच्या गावातील पुढाऱ्यांनी दिला आहे. सदर पुढाऱ्यांच्या घरासमोरच्या आकंठ तुंबलेल्या गटारासमोर ‘करून दाखवले’ असा फलकदेखील झळकतो आहे...

कालपरवापर्यंत ही गल्ली ‘गटार गल्ली’ ह्या नावाने बदनाम होती, आता तिचे नाव बदलून ‘ग्यासगल्ली’ असे झाले आहे!! परंतु, मी मात्र संपूर्ण श्रद्धेने कधीही गटाराकडची जागा सोडली नाही. काल काही मुले माझ्यासोबत सेल्फी काढून गेली. आजही सेल्फीवाल्यांची रीघ लागली आहे. गटाराव्यतिरिक्‍त गॅसनिर्मितीचे आणखी मार्ग कोणते? असा प्रश्‍न मला पिछाडीला नेऊन विचारण्यात येतो. त्यांना काय उत्तर द्यावे? समजत नाही!! असो. आणखी काय सांगू? हे सारे आपल्यामुळे झाले. या कधी आमच्या गटारगल्लीत...सॉरी ग्यासगल्लीत, आमच्या हातचा चहा प्यायला! कळावे. आपला नम्र.

ता. क. : ‘गटार गॅस...करिए गंदगी, परोसिए जिंदगी’ ह्या टॅगलाइनसह मी कंपनी स्थापन केली असून गटारगॅसची एजन्सी देत आहे. इच्छुकांनी अर्ज करावेत. (ह्यालाही प्रसिद्धी द्यावी, ही विनंती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com