गटारगाणे! (ढिंग टांग)

गटारगाणे! (ढिंग टांग)

करोड सव्वाशे डोक्‍यांवर
लोकशाहीचे गळके छप्पर
पागोळीच्या खाली भगोली
बर्तन भांडी आणिक टिप्पर

इथून तेथे तिथून येथे
अशी पसरली अफाट वस्ती
जगणे येथे तेथे महाग बंधो
मौत येथली बिलकुल सस्ती

बिमार वस्तीमधुनी इथल्या
कितिक जीविते पडली झडली
पैदासाची परंतु पर्वा
इथे कुणाला नाही पडली

बुजबुजलेल्या सांदिफटीतून
उगवत राहे आंबा पिंपळ
दमेकऱ्याच्या बाजेवरती
अंथरलेली जुनीच वाकळ

पोटामधल्या देवभुकेचे
इथे रंगते रोजच कीर्तन
बुभुक्षितांच्या मोक्षासाठी
पोट जाळते अधुरे जीवन

दिवाबत्तीचा अतापता ना
कुठून यावे नळास पाणी
कसे म्हणावे जय हो, जय हो,
कशी म्हणावी सुरेल गाणी?

तिथे राहतो अण्णा त्याची
इडली चटणी केवळ अद्‌भुत
आणि सख्याच्या गुत्त्यावरती
सदा हरवतो अपुली सुधबुध

सलमा करिते काम जरीचे
रफिक चालवी भुर्जी गाडी
काड्या चावीत पांडेदादा
वसूल करतो सदैव भाडी

पद्माकरची बाईल करते
चार घरांतुन पोछा झाडू
सुमन लाटते पापड आणिक
वच्छी वळते बुंदी लाडू
पगड आठरा, बंददरी बारा
अशीच जगते इथली वस्ती
कशी करावी दयाघना रे
नशिबाशी ही सदैव मस्ती

वळवळणाऱ्या वस्तीमधुनी
वळणे घेते गटारगंगा
काठावरती तिच्या दुतर्फा
मोर नाचरे धरिती रांगा

गटार सरितेच्याच तळाशी
बुदबुद करिते अमूल्य इंधन
टपरीवरती आणि चहाच्या
कुणी ठेवितो सुखात आधण

बकाल कारंजाच्या भवती
शेवाळाचे थर हे नवथर
सांदीमधली झुरळे गाती
उच्छावाचे गीत शुभंकर

फरसबंदीच्या गल्लीत येथे
थेट उघडती शंभर दारे
दारिद्र्याचे ओघळ अवखळ
वाहत देती स्वतंत्र नारे

लोकशाहीच्या वस्तीमध्ये
माणुसकीचे अनेक विभ्रम
श्‍वास कोठला? 
मरण कोठले?
केवळ जगतो येथे संभ्रम

आत शिरावे वाकुनि माना
गरीबदासाचे हे मंदिर
वस्तीमध्ये कुणी नसे ह्या
थोर आणखी महान ईश्‍वर

जय हो, जय हो,
 जय हो आम्ही
आणिक अमुचे 
जीवित जय जय

आज तरी बा करू नका ना
उद्‌घोषामधि कोणी हयगय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com