मखर (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

देव पूजेच्या तबकात असतो
देव आरतीच्या तारसप्तकात असतो
देव निरांजनाच्या ज्योतीत असतो
देव शुभ्र कापराच्या वडीत असतो.

देव धूपारतीच्या धूम्रवलयात असतो,
देव उदबत्तीच्या सुगंधात असतो,
देव "मम आत्मन:'च्या उच्चारात असतो,
देव मनातल्या शुभंकर विचारात असतो.

देव लालचुटूक पाटावर असतो,
देव मोदकांच्या ताटात असतो,
देव अष्टगंधाच्या वळशात असतो,
देव पूजेच्या कलशात असतो.

देव श्रींच्या सुशांत सस्मित मूर्तीत असतो
देव त्याच्या नाजूक पदकमलांत असतो,
देव दूर्वांच्या जुडीत असतो,
देव वस्त्राच्या घडीत असतो.

देव पायातळींच्या मूषकात असतो,
देव फुलांच्या चषकात असतो,
देव हिरव्यागार दुर्वांकुरात असतो,
देव चिमुकल्या दोन करांत असतो.

देव रात्रभर जागून केलेल्या सजावटीत असतो,
देव खिरापतीच्या वाटीत असतो,
देव पळीभर तीर्थात असतो,
देव गारीगार पापण्यांत असतो.

देव जोडलेल्या दोन्ही हातात असतो,
देव आरतीच्या हाळीत असतो,
देव हातातल्या झांजेत असतो,
देव हाताच्या टाळीतही असतो,

देव घनगंभीर मंत्रपुष्पात असतो,
देव फुलांवरच्या बाष्पात असतो,
देव निरांजनाच्या उबाऱ्यात असतो,
देव बंद पंख्याच्या वाऱ्यात असतो.

देव ताम्हनात टाकलेल्या नाण्यात असतो,
देव लता मंगेशकरच्या गाण्यात असतो,
देव दर्शनाला येणाऱ्या सुहृदांत असतो,
देव दोस्तांच्या प्रसन्न वेढ्यात असतो.

देव मसाल्याच्या दुधात असतो,
देव केशराच्या पेढ्यात असतो,
देव कागदाच्या प्लेटीत असतो,
देव मस्त मस्त सुट्‌टीत असतो.

देव आल्यागेल्याच्या धामधुमीत असतो,
देव "या, बसा'च्या स्वागतात असतो,
देव स्वागताच्या लगबगीत असतो,
देव "हवं नको' बघणाऱ्या गृहिणीत असतो.

देव लगबगीनं आवरणाऱ्या सुभग पदरांत असतो,
देव सळसळणाऱ्या सौभाग्यशाली वस्त्रात असतो,
देव नव्याकोऱ्या कुर्त्या-पैजाम्यात असतो,
देव नुकत्याच टाकलेल्या रुजाम्यात असतो.

देव देवाच्या स्वागतात असतो,
देव आपल्या भाविक मनात असतो,
देव आपल्या घरातच असतो,
देव आपल्या वावरातच असतो.

देव ज्याच्या मनात असतो,
त्याचं मन आरती होतं,
दीडखणाच्या संसारातही
स्वर्ग साती होतं

देव असतो उत्तररात्री तेवणारी समईची वात
देव असतो शुभंकराचा वरद हात
देव असतो तेव्हा जागा निघून जाते रात
बाप्पा बघत असतो सारं मायेनं पहात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com