बोबडे वकील! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं!
बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम वरीड!! एरवी माझं कुठेही भाषण झालं की ते ‘कमळ’ पार्टीवाले फोन करून अभिनंदन करतात! काही जण तर ‘थॅंक्‍यू’सुद्धा म्हणतात! पण काल राजस्थानच्या दौऱ्यावरून परत आलो तर सगळे चिडीचूप आहेत!
मम्मामॅडम : (वर्तमानपत्र चाळत) काहीतरी लागट बोलला असशील!! बाकी तू काहीही बोललास की त्यांना फार मिरच्या झोंबतात!!
बेटा : (टाळी वाजवत) तेच तर सांगत होतो! राजस्थानात भाषण करता करता मला एक जबरदस्त स्लोगन सुचली...
मम्मामॅडम : (नाक मुरडत) काहीतरीच तुझं! स्लोगन देणं का आपलं काम आहे? ते सगळं आपले मीडियावाले करतात! आपण भाषणं करावीत!
बेटा : (जोराजोराने घोषणा देत)...गली गली में शोर है, देशका चौकीदार चोर है..!! हाहा!! कशी वाटली आमची नवी स्लोगन? ‘सूटबूट की सरकार’ पेक्षा भारी आहे की नाही?
मम्मामॅडम : (थंडपणे) चांगली आहे, पण होळीला वेळ आहे अजून!!
बेटा : (हात चोळत) होळीपर्यंत आणखी डझनभर सुचतील मला!! हो ना? (गाणं गुणगुणत) मच गया शोर सारी नगरी में, सारी नगरी मेंऽऽ...देश का चौकीदार आया, संभाल तेरी गगरी रेऽऽ...
मम्मामॅडम : (गोंधळून) पण हे गाणं तर दहीहंडीचं आहे ना?
बेटा : (खांदे उडवत) व्हॉटेव्हर... इलेक्‍शन म्हटलं की दहीहंडी, शिमगा, पोळा सगळं एकत्र असतं!! ह्यावेळी बघ मी काय धमाल करतो ते! बस तुम देखते रहना!!
मम्मामॅडम : (दात ओठ खात) त्या ‘कमळ’वाल्यांना चांगला धडा शिकव... मगच माझं मन शांत होईल!!
बेटा : (दिलासा देत) डोण्ट वरी मम्मा! मैं हूं ना!! चौकीदार जब जब चोर बनकर घर में घुसता है, तब तब मुझे आगे आना पडता है!!
मम्मामॅडम : (समजुतीनं घेत) एखाद-दोन वेळा ठीक आहे, पण एखाद्याला असं चोरबिर म्हणणं बरं नाही, बेटा!!
बेटा : (निरागसपणे)...मला एक सांग मम्मा, कुणाला चोर म्हटलं तर ते वाईट्ट असतं का? (एक सुस्कारा सोडत) मोदीजींना काल मी चोर म्हटलं म्हणून ते कमळवाले रागावले असतील का माझ्यावर?
मम्मामॅडम : (कपाळ चोळत) रागावले तर रागावले!! आपल्याला काय करायचंय? काहीही करा, पण त्या कमळवाल्यांना हाकला आता तिथून!! कंटाळा आला बाई!! किती वर्ष वाट पहायची? येत्या इलेक्‍शननंतर ती माणसं नजरेसमोरून दिसेनाशी व्हायला पाहिजेत!
बेटा : (दुप्पट निरागसपणाने) मम्मा, तुला एक गंमत सांगू? आपले अर्थमंत्री आहेत ना? आपले ते हे...जे...जे...
मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालत) त्यांचं नावसुद्धा घेऊ नकोस माझ्यासमोर!
बेटा : (नाव आठवत) ते गं ते...अर्थखात्याच्या विषयावर प्रश्‍न विचारला तर म्हणतात मी वकील आहे म्हणून आणि कायद्याबाबत चर्चा करायला गेलं की म्हंटात मी अर्थमंत्री आहे...कायद्याचं काही काही बोलू नका!! हाहा!!
मम्मामॅडम : (नाक मुरडत) त्यांचं काय आता?
बेटा : (कानात कुजबुजत) ते ना...चक्‍क बोबडे आहेत!! हाहा!! बोबडे वकील!! हे बोबडे गृहस्थ वकील कसे झाले कुणास ठाऊक!! कोर्टात ‘न्यायमूल्ती म्हालाऽऽज’ असं त्यांनी म्हटलं की कोर्टात हशा फुटत असेल...ना?
मम्मामॅडम : (खुदकन हसत) तू म्हणजे फारच व्रात्य बुवा!!
बेटा : (हसू आवरत) खरी गंमत पुढेच आहे... ते मला ‘क्राऊन प्रिन्स’ म्हणायच्याऐवजी ‘क्‍लाऊन प्रिन्स’ म्हणतात!! हाहाहा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com