दोर! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

खलबतखान्यात भयाण शांतता पसरली होती. पलित्यांच्या उजेडात भिंतीवरील सावल्याही हलत नव्हत्या. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. दौलतीचे अमात्य बाळाजीपंत अंमळ खाकरले, तेव्हा राजियांच्या सावलीने काहीतरी त्यांच्या सावलीकडे फेकून मारलेले तेवढे दिसले... पण ते असो.
‘‘आता काय करायचं साहेब?’’ कुणीतरी हिय्या केला.
‘‘कशाचं?’’ राजे उद्‌गारले.
‘‘हेच... महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं!,’’ कुणीतरी गुळमुळीतपणे खुलासा केला.
‘‘त्याचं काय व्हायचंय?’’ राजे.
‘‘ काही नाही...,’’ कुणीतरी नाद सोडला.
बराच वेळ कुणीही काही बोललं नाही. खलबतखान्यात उपस्थित असलेल्या तिघांनी घाम पुसला. दोघांनी सुस्कारा सोडला... आणखी एकाने रुमाल काढून नाक शिंकरले. अस्वस्थतेनं त्या गुप्त दालनात जणू घर केलं होतं.
‘‘महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी आपल्याला हे करायला हवं! जगदंब...जगदंब!’’ राजे हात चोळत उद्‌गारले.
‘‘काय करायला हवं?’’ दौलतीचे अमात्य बाळाजीपंत अनवधानाने विचारतें झाले.
‘‘काही नाही...,’’ राजे मान हलवत म्हणाले.
पुन्हा बराच वेळ कुणीही काहीही बोललं नाही. असं किती काळ चालणार? अस्वस्थता वाढीस लागली. अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती राजेसाहेबांच्या नेमक्‍या भूमिकेची. नवनिर्माणाचं व्रत घेतलं तेव्हा ‘एकला चालो रे’ हीच बाणेदार भूमिका राजियांनी घेतली होती. आता थेट शत्रूशी हातमिळवणी करायची?
‘‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र!’’ राजियांनी स्वत:ची समजूत काढली. त्यांना थोडे कमी अपराधी वाटू लागले. अपराधी तरी कां वाटावें? ह्या नतद्रष्ट कमळवाल्यांनी साडेचार वर्षांत रयतेला अक्षरश: त्राहिमाम करोन सोडिले. केवढी ती महागाई, केवढा तो जुलूम! वाटलं होतं, ही मंडळी आली की आधीच्या जुलमी, मोगलाई राजवटीला पूर्णविराम मिळेल. परंतु, हे तो सवाई निघाले...
‘‘अरे लेको, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझाऽऽ...’’ अभावितपणे राजे ओरडले.
‘‘हा काय इथेच आहे...’’ बाळाजीपंत अमात्य तत्परतेने म्हणाले, आसपास काहीतरी शोधू लागले.
‘‘काय शोधताय..?,’’ राजे प्रेमळपणाने खेकसले.
‘‘महाराष्ट्राचा नकाशा हवा होता ना...,’’ बाळाजीपंत म्हणाले. राजांनी हताशपणे फक्‍त एक सुस्कारा सोडला आणि ते काहीच बोलले नाहीत.
‘‘ते ‘हात’वाले आणि ‘घड्याळ’वाले आपले जुने आणि खरे दुश्‍मन. आजवर आपण त्यांना लाखोल्या वाहात जगलो. गेली दोन-चार वर्षे त्यांना रिप्लेसमेंट आली आहे, हे खरं, पण... बाबांनो, आपण सारे एकत्र येऊया, असं मीच पहिल्यांदा बोललो होतो.... आठवतंय?,’’ राजे स्वत:शीच बोलले.
‘‘खरा सवाल ते लोक आपल्याला त्यांच्यात घेतील की नाही, हा आहे साहेब!’’ बाळाजीपंत म्हणाले. अखेर सारी डेरिंग एकवटून म्हणाले, ‘‘ हे दोरावर चढण्यासारखे आहे साहेब! जो वरही टांगलेला नाही आणि खालीही टेकलेला नाही... काय करायचं?’’
‘‘आता सारे दोर कापले गेले आहेत... कुठला तरी दोर पकडावा लागणारच ना?,’’ हे वाक्‍य उच्चारताना राजियांचा आवाज खोल गेला होता. अखेर निर्णय घेवोन ते तडफेने म्हणाले, ‘‘आता शेंडी तुटो वा पारंबी! चढाई करायचीच!! सोबत कोण आहे, ह्याची तमा न बाळगता चढाई करायची! हर हर हर हर महादेव!’’
‘‘तुमचा शब्द म्हणजे देवावरचे फूल...,’’ सरखेल नितीनाजी सरदेसाई म्हणाले. ते दरवेळी हे एकच वाक्‍य उच्चारतात.
‘‘तुम्ही म्हणाल तसे होईल, साहेब! पण...,’’ अविनाशाजींनी शंका काढली.
‘‘आता ह्यात पण नाही नि बिण नाही... प्रत्येकानं दोरावर मोर व्हायलाच हवं! हा आपल्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न आहे...’’ राजे ताडकन म्हणाले.
‘‘दोरावर मोर! कल्पना चांगली आहे, पण साहेब... एवढा मोठा दोर आणायचा कुठून?’’ बाळाजीपंतांनी विचारले.
‘‘दोर येऊ घातला आहे... कुठल्याही क्षणी येईल!...’’ असे म्हणत राजियांनी चटकन घड्याळाकडे पाहिले आणि विचारले, ‘‘किती वाजले?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com