म...मराठीचा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (उत्साहात प्रविष्ट होत) ढॅणटढॅऽऽण...मी परत आलोय, माते!
मम्मामॅडम : (दचकून) हे काय नवीन? नेहमीसारखं ‘मम्मा, आयॅम बॅक’ नाही म्हणालास?
बेटा : (डोळे मिटून) आता यापुढे मी शुद्ध मराठीत बोलायचं ठरवलं आहे!!
मम्मामॅडम : (नाक मुरडून) काही नको! कितीही कौतुक केलं तरी तिथली माणसं त्या कमळवाल्यांना आणि धनुष्यबाणवाल्यांनाच मतं देतात!
बेटा : (तर्जनी हलवत) तुम नही समझोगी माँऽऽ...आय मीन तुला नाही समजणार माते!! हे राजकारण आहे!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) तुझ्याकडून राजकारण शिकू आता? बऽऽरं!!
बेटा : (दुर्लक्ष करत) मला मराठी कधीपासून यायला लागलं असं ते गडकरीअंकल विचारताहेत!
मम्मामॅडम : (अनवधानानं) खरंच...कधीपासून यायला लागलं?
बेटा : (कानात कुजबुजत) कुण्णालाही सांगू नकोस! पण विपश्‍यनेला जातो म्हणून मी सुट्टी घेऊन जायचो ना...तेव्हा प्रत्यक्षात मी मराठीचा अभ्यास करत होतो! आता मला मराठी इतकं येतं की...इतकं येतं की...की...
मम्मामॅडम : (घाईघाईने) त्या गडकरींचं काही सांगू नकोस! त्यांना कुठं मराठी येतं? वऱ्हाडीत तर बोलतात! येऊन ऱ्हायलो, करून ऱ्हायलो! हु:!!
बेटा : (समजावून सांगत) नागपूरची भाषा ही मराठीचीच एक बोलीभाषा आहे! जशी की मालवणी, खानदेशी, आगरी किंवा आपलं ते हे...जाऊ दे! तुला नाही कळणार!! महाराष्ट्रात असंख्य बोलीभाषा असून त्याचा सर्वांगीण अभ्यास होण्याची गरज आहे आणि त्यासाठी एक बोलीभाषा कोश असावा, अशी शिफारस मी करणार आहे, एवढंच सांगतो!!
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडून) हे काय आता नवीन? राफेलवरून एकदम बोलीभाषा?
बेटा : (खिशातून कागद काढून वाचत) ‘‘आम्ही तं निवडून येणारच नै, असा आमचा कान्फिडेन्स होता, म्हणून आम्ही देऊन दिली आश्‍वासनं वाट्टेल तशी! आता तं राज्यच येऊन गेलं, त्याला का करते?’’ ह्याचा अर्थ काय होतो?
मम्मामॅडम : (हाताचा पंजा उघडत) सोप्पा तर आहे! एवढं मराठी तर मलाही येतं हं!
बेटा : (मास्तराच्या आविर्भावात) ह्याचा अर्थ, गडकरीअंकल खरं बोलत होते, आणि जनता आता नेमका हाच विचार करून ऱ्हायली आहे...असाच ना?
मम्मामॅडम : (खुशीत) तुला पैकीच्या पैकी मार्क! अगदी असाच त्याचा अर्थ आहे!!
बेटा : (हातावर मूठ हापटत) झालं तर! मी हेच बोललो, तर गडकरीअंकल म्हणाले, त्यांना मराठी कधीपासून यायला लागलं? मी बोललो काय, त्यांनी अर्थ लावला काय!! त्यांना, म्हंजे मला मराठी समजतं का? कुणाला तरी विचारून तरी अर्थ लावायचा!!
मम्मामॅडम : (कसनुसं हसत) तू आपल्या पृथ्वीअंकलना किंवा अशोकअंकलना अर्थ विचारला का नाहीस?
बेटा : (खुलासा करत) विचारला ना! पृथ्वीअंकल म्हणाले, गडकरींबद्दल मी एक अवाक्षरही बोलणार नाही! अशोकअंकल म्हणाले की ह्या वाक्‍याला मुळात काही अर्थच नाही!!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) ओह गॉड!
बेटा : (ठामपणाने) पण मला मराठी येतं, अगदी उत्तम येतं हे सिद्ध करण्यासाठी मी एक गोष्ट केली आहे!! ती लोकांना कळली की राफेल विमानांचं प्रकरण काहीच नाही, अशी धमाल येणार आहे!!
मम्मामॅडम : (धास्तावून) नको रे बाबा!
बेटा : (छाती फुगवून) बघशीलच तू! ‘मला मराठी येतं का?’ असा सवाल करणाऱ्या गडकरीअंकलची बोलती मी बंद करणार आहे...
मम्मामॅडम : (आवंढा गिळत) असं..असं...काय करणार आहेस?
बेटा : (जाहीर करत) मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचा अर्ज भरायचा विचार करतोय! कशी आहे आयडिया? आँ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com