फेरीवाले आणि घेरीवाले! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

नेमके सांगावयाचे तर ती पौषातील प्रतिपदा होती. दिस माथ्यावर आलेला. राजेयांचे नुकतेंच कोठे झुंजूमुंजू झालेले. राजगडाच्या पायथ्यालगत नवी पेठेतील दुकाने उघडली होती. (सूचना : नवी पेठ म्हंजे न्यू मार्केट ह्या अर्थी!! हे पुणे नव्हे!! शिवाजी पार्क आहे!! च्याऽ** तुम्ही सुद्धा नाऽऽ...) नवी पेठेतील दुकाणांमधील फेरीवाले तारस्वरात ओर्डून गिऱ्हाइके बोलावीत होते. नानाविध खेळणी, मोबाइल कव्हरें, फळे, भाज्या, फुले आदी मालाने नवी पेठ सजली होती. जणूं काही फेरीवाल्यांच्या फौजेने राजगडास वेढाचिं घातला होता. ह्या तुंबळ भाऊगर्दीतून आपली सांडणी हांकण्यात सांडणीस्वाराचा जीव अर्धा झाला. ऐश्‍या वाहतुकीत साहेबांपरेंत खलिता पोहोचवावा तो कैसा? ह्या विवंचने सांडणीस्वार होता. अखेर मजल दरमजल करीत तो राजगडाचें पायथ्याशी उतरला... गडाखालील पेठेत त्याने आपली सांडणी बांधोन ठेविली आणि लगबगीने जावोन तो द्वारपालांशी हुज्जत घालों लागला, की ""साहेबांसी आर्जंट निरोप देणेचा आहे. कृपया गडाचे दरवाजे उघडावेत!'' द्वारपालांनी अजिबात ऐकिले नाही. ते नुसतेच सांडणीस्वारावर गुरगुरले. मग आळीपाळीने भुंकले!! सांडणीस्वाराचा नाविलाज झाला. द्वारपालांस बिस्कुट दिल्यास दार किलकिले होईल, ऐश्‍या मोगली बाण्याने त्याणें पेठेतूनच बिस्कुटांचा पुडा खरीदला. द्वारपालांस बिस्कुटाचे आमिष दाविताच, दोन्ही द्वारपालांनी सदर सांडणीस्वाराचे पार्श्‍वप्रांती प्रत्येकी येक लचका तोडोन धन्याच्या इमानीचे प्रत्यंतर धिले. सांडणीस्वाराची पाटलोण फांटली नाही, परंतु काही कारणाने बदलोन मात्र घ्यावी लागली. असो.

अखेर सांडणीस्वारास दूरवरोन बाळाजीपंत अमात्य नांदगावकर यांची पेठरास्त्यातून (सूचना : ही रास्तापेठ नव्हे!! हे शिवाजी पार्क आहे!! च्याऽ** तुम्ही सुद्धा नाऽऽ... ) पालखी येताना दिसली. "दूर सरा, दूर सरा, अमात्यांची पालखी आली...' ऐसी हाकाटी बिनीचे मनसैनिक देत होते. सांडणीस्वाराचें मनीं आशा अंकुरली. भराभरा जावोन त्याने पालखी गाठली. पालखीस मखमली पडदा होता व अंतर्भागातून "तेरी रश्‍के कमर' हे तरुणाईचे राष्ट्रगान ऐकू येत होते...
""जय महाराष्ट्र!'' पालखीशी तोंड नेवोन सांडणीस्वार म्हणाला.
""कानफटात मारू का खट्याककन...नीघ इथून!'' पालखीतून आवाज आला. सांडणीस्वार टरकला. नुकतीच पाटलोण बदलोन घ्यावी लागली होती. आता पुन्हा...
""साहेबांसी आर्जंट खलिता पोहोच करणें आहे. प्रंतु नवी पेठेतील रहदारीमुळे अद्याप जमले नाही...'' सांडणीस्वाराने अजीजीने सांगितले. पालखीतून काहीकाळ काहीच प्रतिसाद आला नाही.
""कोणाचा खलिता आहे?'' पालखीतून आवाज आला.
""जी, बांदऱ्यावरून आलोय जी! मातुश्रीगडाचें टपाल आहे...'' सांडणीस्वार कुजबुजत म्हणाला. पालखीत शांतता पसरली. रश्‍केकमरचा सूरही बंद पडला.
""आणा हिकडे, आम्ही पोहोच करतो!!'' पालखीचें आतून येक हात बाहेर आला. हातांस राजकंकण बघोन सांडणीस्वार चमकला.
""मातुश्रीवरील थोरल्या धन्यांनी जातीने राजियांचे हातीच खलिता ठेवावयास फर्माविले आहे. तेव्हा...,'' सांडणीस्वार अवघडून म्हणाला. त्यासरशी पालखीचा पडदा दूर होवोन साक्षात राजियांची मूर्त प्रकटली. नेत्रांत अंगार होता. नाकाचें शेंड्यावर संताप होता. मस्तकावरील तुरा हिंदकळत होता.
""खामोश!! बऱ्या बोलानं खलिता दे...आणि नीघ! आधीच ह्या फेरीवाल्यांनी डोके उठवले आहे... आम्हाला असे चोरून जावे-यावे लागते... हे सगळं तुमच्या मातुश्रीवाल्यांचं कारस्थान! स्वत:च्या घराभोवती एक फेरीवाला ठेवला नाही, आमच्या घराभोवती मात्र वेढा!! नॉन्सेन्स!!'' पालखीतील राजनेत्रांनी आग ओकली. सांडणीस्वार उगामुगा उभा राहिला. घाबरत घाबरत त्याने खलित्याचे भेंडोळे राजियांच्या हाती दिले. राजियांनी भेंडोळे उलगडून मजकूर वाचला आणि एक गगनभेदी आरोळी शिवाजीपार्कावर दुमदुमली. ती ऐकोन सांडणीस्वार जीव खाऊन पळत सुटला. पळता पळता त्याला भयातिरेकाने घेरीच आली. समस्त फेरीवाले त्याच्याभोवती जमा झाले...
...कारण खलित्यात एकच ओळ लिहिलेली होती- "टुक टुक! बसा आता बोंबलत!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com