हिरा है सदा के लिए..! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

रेड ऍलर्ट : कॅप्टन नीमो नावाचा खुंखार डायमंड किंग हातोहात निसटला असून, त्याने मुंबईतील एका बॅंकेत तब्बल 11 हजार कोटींची लूट केल्याचे निदर्शनास आले आहे. सडसडीत बांधा, कडकडीत सूट आणि गुळगुळीत दाढी असे त्याचे वर्णन आहे. कुणाला आढळल्यास त्यास मुंबईतील हॉर्निमन सर्कलवरील पावभाजीवाल्याकडे घेऊन येणे. शोधून देणाऱ्यास योग्य ते इनाम व जाण्यायेण्याचा खर्च व पावभाजी (बटरयुक्‍त) दिली जाईल.
* * *
टू द ब्यांक म्यानेजर,
गुड मॉर्निंग! जागे झाला असाल तर, तुमच्या ब्यांकेच्या ब्रांचमधून अकरा हजार कोटी रुपये कोणी काढून नेले आहेत का, ते जरा तपासून पाहावे. आरबीआय.
* * *
टू आरबीआय,
अकरा हजार कोटी? आत्ता जागा झालो! एवढे कुठले? तरी बघून सांगतो. युवर्स फेथफुली. ब्यांक म्यानेजर.
* * *
डिअर ओनरेबल श्रीमान नमोजीभाई, नान्हा भाई नीमोना सतप्रतिसत प्रणाम. पत्र लखीण्यास कारण की वीजनेसमधी लोच्या झाल्यामाटे इंडिया सोडून निघून यावे लागले. तुम्हाला न सांगता आलो एटले सॉरी. पण काय करणार? टाइमज नाय भेटला. हूं तमारा नान्हा भाई छूं मने माफ करजो. तमारु दिल छप्पन इंचवाळा मोटु छे.
वळखाण तुम्हाला पडली का? जान्योरी मां आपण डाव्होसला गेले होते ने... ते वखत मी पण तुमच्या संगती होता. मी एक साधासिंपल हिरा बेप्पारी आहे. बेंकमधून पैसा काढूनशी कच्चा हिरा खरेदी करायच्या, अने त्याला पैलू पाडूनशी गिऱ्हाइकच्या गळ्यामंदी मारायच्या. (गळ्यामंदी म्हंजे अेक्‍चुअली गळ्यामंदी हं के!) आ मारा पोतानुं वीजनेस छे. पण मी इकडे फोरेनला निघूनशी आल्यानंतर इंडियामधे बहु प्रोब्लेम झाल्याची खबर पडली. मला अचरजच वाटले. बेंकमधूनशी पैसा विड्रॉ करणे आ काई गुनाह छे के? आ सरासर अन्याय छे भाई! हूं रुपिया वापस कसा करणार? क्रिपया मार्गदर्शन आपो. आपडो नान्हो भाई. नीमो.
ता. क. : तुमच्या आणि माझ्या सरनेम सेम टु सेम आहेत! व्हाट्‌टे कोइन्सिडन्स...ने?
* * *
डिअर नीमो,
तुम्ही पाठवलेले पत्र मिळाले. आडनावासाधर्म्यामुळे आपल्याला(ही) सगळा देश मोफतीत मिळाला आहे, असे वाटत असेल, तर तुमचे कठीण आहे. तुमच्यासारख्या भ्रष्ट उद्योजकांमुळेच आमची "मेक इन इंडिया'ची गाडी पकोड्यांपर्यंत आली!! तुम्हाला असाल तेथून धरून आणून पोकळ बांबूचे फटके देण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. पोकळ बांबूसकट आमचे अधिकारी रवाना करण्यात आले आहेत. तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही. कसला नान्हा भाई..? शटाप. नमो.
ता. क. : आपले आडनाव वाचले की कुठलीही बॅंक (अजूनही) लागतील तितक्‍या नोटा गुमान काढून देते, हा अनुभव आम्हाला अंतर्मुख करणारा आहे. असो. नमो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com