कुत्ते की पूंछ! (ढिंग टांग)

Dog
Dog

वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब नमोजीसाहब, अत्यंत दुखभऱ्या दिलाने आपल्याला हे खत लिखत आहे. हे खत पढून झाल्यावर तुम्ही फाडून टाकणार हेही मला मालूम आहे. जनाब, बहोत बडे अरमानों के साथ मी आपणांला दोस्तीचा पैगाम भेजला होता. -पण आपण तो बेदर्दीने ठुकरलात! मेरे दिल के टुकडे हजार हुए, कुछ इधर गिरे, कुछ इधरही गिरे!! उधर गिरायला जागा कुठे आहे? आमच्या थोड्याशा कुरापतींमुळे तुम्ही थेट अबोलाच धरता, हे काही ठीक नाही. कसेही असलो तरी आपण पडोसी आहो. एकमेकांची दु:खे वाटून घेतली तर पडोसीचा मजहब (तुमच्या जुबानमध्ये धर्म) बर्करार राहातो, असे मला वाटते.

आपण दोस्तीचा पैगाम नाकारल्यावर मी पैगाम-ए-ट्‌विट केला होता. त्यात मी म्हटले होते : छोटे दिल के लोग बडे बडे ओहदे हासिल करतात तेव्हा असेच होते! त्यामुळे आपण घुस्सा झालात का? पण हे वाक्‍य मी माझ्याबद्दलच बोललो होतो. माझे दिल खूप मोठे आहे, जनाब! छोटे दिलवाले लोग चार चार बेगमा नाही करू शकत. उसके लिए शेर का दिल चाहिए. उलट छोटे दिलवाले लोग शादीपासून दूर पळतात. तुम्हाला वाटले की...जाने दो. 
वाटले होते की आपल्या दोन्ही मुल्कांचे आला अधिकारी एक दूसरेसे भेटतील. थोडा सलामशवरा होईल. मग अमन और महोब्बत का एक नया दौर आयेगा...आणि ही तर नुसती शुरुआत-ए्‌-रिश्‍ता असेल. दोन्ही मुल्कांमध्ये अमन पैदा करण्यासाठी आपण दोघेही जोडीने काम करू, असे मला वाटले होते. पहले अफसरोंवाली बात, मग थोडीबहुत खतोखत (याने की पत्रापत्री), मग आपल्या दोघांमध्ये हॉटलाइन टेलिफोनवर बातचीत...असा सिलसिला शुरू झाला की मग एकदम इंडिया- पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच!! त्यात तुम्ही बड्या दिलाने आम्हाला जिंकू देणार...असे मी ख्वाब बघितले होते. (दुबईत आमची टीम-ए-पाक मार-ए-बेमुदत खाताना बघूनही दिलाच्या धज्जियां उडत आहेत, जनाब!) आमचे आधीचे वझीरेआझम जनाब नवाझ शरीफ ह्यांच्या लडकीला शादीची मुबारकबात देण्यासाठी आपण असेच अचानक आमच्या मुल्कात आला होता. शरीफसाहेबांशी आपली चांगली दोस्ती असणार..! (हल्ली जनाब शरीफ जेलखान्यात आराम फर्मावत असून त्यांची तबियत एकदम तंदुरुस्त झाली आहे. रोज अर्धा टन खडी फोडल्यावर चांगली वर्जिशही होते...) जनाब शरीफ ह्यांना तुम्ही जशी अचानक भेट दिली, तशी तुम्ही माझ्या गरीबखान्यावर येऊन कधी तशरीफ रखणार? ह्याचा मी इंतजार करत होतो. होतो कशाला? अजूनही इंतजार करत आहे.

तुम्ही येणार असाल, तर इन्शाल्ला, मी चौथी (की पाचवी? माझ्याच लक्षात राहात नाही...प्लीज रिफर गुगल!!) शादी रचायलाही तय्यार आहे!! येता का? 
तुम्हाला प्यारभरे खत भेजले, तेव्हाच नेमका तुमचा एक जवान आमच्या लष्करेपाकच्या जवानांच्या हातून अल्लाहला प्यारा झाला. काही पोलिसांना भगाकर नेऊन त्यांचा खात्मा करण्यात आला. मला ह्या गोष्टींचा बहोत अफसोस आहे. लेकिन क्‍या करे? हम लोग आदतसे मजबूर आहोत. आमच्या असल्या करतूतकडे लक्ष-ए- दुर याने की दुर्लक्ष करा, अशी माझी इत्तला आहे. 

नमोजीसाहब, तुम्ही कधी क्रिकेट खेळला आहात का? तेज गोलंदाजी करताना बॉल जोरात टाकताना अचानक उंगलियांमधून सटकतो, आणि थेट कीपर-ए-विकेटच्याही पलिकडे जाऊन पडतो. धड ना नोबॉल, धड ना वाईड!! माझी अशीच हालत झाली आहे. तेव्हा आम्ही असेच बर्ताव करणार, हे ध्यान-ए-मन घेऊन दोस्तीचा हात स्वीकारावा, ही रिक्‍वेस्ट. आपला मुरीद. इम्रान पाजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com