रुमाल...पुस्तक! (ढिंग टांग!)

Editorial dhingtang
Editorial dhingtang

गहिवरून आले आहे, सद्‌गदित झाले आहे, भरून आले आहे. आता तुम्ही म्हणाल, या तिन्ही गोष्टी एकच. पण मित्रों, तसे नाही. या तीन गोष्टी स्टेप बाय स्टेप होतात, (पण वाटतात एकच.) सध्या आमच्या ह्या हळुवार अवस्थेला (ही चौथी स्टेप!) कारणीभूत आहे, आमच्या एकमेव आदर्शाचा, याने की थोर प्रधानसेवक श्रीश्री नमोजी ह्यांचा नवा फतवा. "भारताच्या प्रधानसेवकाला यापुढे एक फूल, खादीचा रुमाल आणि/किंवा एखादे पुस्तक भेट द्यावे, पुष्पगुच्छाचा बडिवार नको' असे फर्मान त्यांनी जारी केल्याचे वाचले आणि आम्हाला हुंदका फुटला. (ही पाचवी स्टेप आहे हं!) काय ही दूरदृष्टी! किती सात्त्विक हा विचार!! किती उदात्त ही भावना!! आमचेही मत वेगळे नाही, हे काय सांगावयाचे? 

वाचकहो, आपण ह्या जगात काय घेऊन आलो? काहीही नाही. मग गमावण्यासारखे तरी काय आहे? काहीही नाही! तुम क्‍या लाये थे, जो तुमने खोया? कुछ नहीं. मग पुष्पगुच्छ स्वीकारून त्याचे करावयाचे काय, अं? फुले ही तर चार दिवसांची पाहुणी. सौंदर्य हे क्षणभंगुर असते, असे स्वत:चे निर्माल्य करून सांगणारी रंगीन प्रजाती. पण आपण? आपण अनाकोंडा अजगरायेवढे (संदर्भ : डिस्कव्हरी च्यानल) जाडजूड हार गळ्यात घालतो. नानाविध फुलांचा पोर्टेबल बगीच्याच वाटावा, असे भलेथोरले पुष्पगुच्छ सादर अर्पण करतो. पुष्पगुच्छ कसले? फुलांचा भाराच तो!! त्याचा का येवढा अट्‌टहास? 
पुष्पगुच्छाचे टिकणे ही एक जटिल प्रक्रिया आहे. पहिल्या दिवशी हा पुष्पगुच्छ बैठकीच्या खोलीत (आल्यागेल्यास दिसेल असा) ठेवावा लागतो. दुसऱ्या दिवशी त्यातील बऱ्या फुलांच्या दांड्या कापून त्यांची फ्लावरपॉटात बदली करावी लागते. तिसऱ्या दिवशी त्यात भांडेभर पाणी घालून ऍस्प्रोची गोळी टाकावी लागते. चौथ्या दिवशी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळाला करताना ह्या फुलांचे काय करावे? असा यक्षप्रश्‍न पडतो. असो. 
त्यापरीस (आम्हांस) एकच एक फूल द्यावे. -तेही गुलाबाचे!! गुलाबाचे फूल पहिल्याच दिवशी (सायंकाळी) बरणीत जाते. त्यावर साखरपेरणी केली की काही दिवसांत गुलकंद तय्यार!! गुलकंदाने नवतारुण्याचे वरदान प्राप्त होते. अंगात जोम येऊन शक्‍तीचे वर्धन होते आणि...जाऊ दे. 

खादीचा रुमाल ही तर बहुमोल वस्तू आहे. दिवस पावसाळ्याचे असोत वा उन्हाळ्याचे, रुमाल हा लागतोच. विशेष म्हणजे ह्या वस्तूस सदोदित विस्मृतीत जाण्याची खोड असते. रुमाल विसरणाऱ्या माणसाचे किती हाल होतात म्हणून सांगू? तेव्हा न विसरता (आम्हांस) रुमाल भेट देणे केव्हाही श्रेयस्कर. तथापि, तो देताना कोरा किंवा स्वच्छ धुतलेला द्यावा ही कळकळीची विनंती!! खादीच्या कोऱ्या रुमालाने गळके नाक पुसताना चक्‍क खरचटते, असाही अनुभव आहे. कालांतराने तो खरखरीत रुमाल मेणाहुनि मऊ होतो. हेही जाऊ दे.

 ग्रंथ हा तर गुरू! ज्ञानाचे भांडार! वाचाल तर वाचाल, असे कोणीतरी म्हटल्याचे आम्ही कुठल्याश्‍या पुस्तकातच वाचले आहे. पुस्तके ही लायब्रीतून आणल्यावर वेळेत परत केल्यास दंड भरण्याची तरतूद असलेली जोखमीची वस्तू अशी विनाकारण बदनामी समाजात झाली आहे. दंड भरणे नकोसा झाल्यास (वाटल्यास) लायब्रीत परत जाऊच नये!! पण म्हणून पुस्तके का बरे वाईट? तेव्हा आल्यागेल्यास (पक्षी : आम्हांस) एखादे पुस्तक भेट दिले की ते कसे छान वाटेल. नाकांशी एखादे फूल, कॉलरीत एक रुमाल आणि हातात एखादे पुस्तक असा त्रिवेणी संगम जमला की समजावे, आयुष्यातील सर्वांत आनंदाची घडी ती हीच!! "संपूर्ण चातुर्मास' हे पुस्तक भेट दिल्यास सर्वांनाच (सध्या) बरे पडेल, असे वाटते!! जाऊ दे. 
आम्हांस विचाराल तर मिर्झा गालिब ह्यांच्या एका शेरात किंचित बदल करून आम्ही म्हणू की... 

चंद फूल-ओ-रुमाल, चंद किताबों के खिताब, 
के बाद मेरे घरसे ये सामां निकला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com